ज्ञानेश्वरी – अध्याय ४ (ओवी ७६–१५१)

लेखक
संत ज्ञानेश्वर
काळ
१३ वे शतक (इ.स. १२९०)
अध्याय / भाग
अध्याय ४ · भाग २
भाषा
मराठी
॥ श्री गणेशाय नमः ॥

ज्ञानेश्वरीच्या चवथ्या अध्यायाचा, ज्ञानकर्मसंन्यासयोगाचा, हा दुसरा भाग आहे; ओवी ७६ ते १५१ इथे आहेत. मागच्या भागात कृष्णाने सांगितले होते की जो जसा भजतो, त्याला ते तसेच भजतात. आता तीच गोष्ट पुढे नेत ते वर्णव्यवस्था, कर्म आणि अकर्म यांचा खरा अर्थ उलगडतात.

या भागाचा गाभा एक कठीण प्रश्न आहे: कर्म म्हणजे नेमके काय, आणि कर्म करूनही माणूस कर्मापासून मुक्त कसा राहतो? ज्ञानेश्वर त्यासाठी डोळ्यांसमोर उभ्या राहणाऱ्या उपमा देतात: खोटे नाणे, पाण्यातले प्रतिबिंब, नावेतून दिसणारी पळती झाडे, पाण्यात न बुडणारे सूर्यबिंब. पुढे ओवी १२२ पासून यज्ञांची एक लांब मालिका येते, ज्यात इंद्रिये, प्राण आणि मन यांच्या साधनेलाच यज्ञाचे रूप दिले आहे.

भागाचा क्रम थोडक्यात असा: आधी वर्णांची आणि कर्माची ओळख, मग कर्मात राहूनही अलिप्त राहणाऱ्या ज्ञानी पुरुषाचे चित्र, आणि शेवटी यज्ञांचे विविध प्रकार. हे तीन टप्पे लक्षात ठेवून वाचले तर ओवींचा धागा तुटत नाही.

खाली ओवी क्रमांकांसह मूळ पाठ आहे, आणि त्यानंतर माझ्या शब्दांत सार. या भागातली भाषा थोडी अधिक तात्त्विक आहे, म्हणून एकेक उपमा थांबून पाहत वाचली तर अर्थ हळूहळू उमलत जातो.

ओवी ७६ ते १५१

तैसा समस्तां यां भजना
मी साक्षिभूतु पैं अर्जुना
एथ प्रतिफळे भावना
आपुलाली
॥ ७६ ॥

आतां याचिपरी जाण
चाऱ्ही हे वर्ण
सृजिलें म्यां गुण-
कर्मविभागें
॥ ७७ ॥

जे प्रकृतीचेनि आधारें
गुणाचेनि व्यभिचारें
कर्में तदनुसारें
विवंचिली
॥ ७८ ॥

एथ एकचि हे धनुष्यपाणी
परी जाहले गा चहूं वर्णीं
ऐसी गुणकर्मकडसणी
केली सहजें
॥ ७९ ॥

म्हणौनि आइकें पार्था
हे वर्णभेदसंस्था
मीं कर्ता नव्हें सर्वथा
याचिलागीं
॥ ८० ॥

हें मजचिस्तव जाहलें
परी म्यां नाहीं केलें
ऐसें जेणें जाणितलें
तो सुटला गा
॥ ८१ ॥

मागील मुमुक्षु जे होते
तिहीं ऐशिया जाणोनि मातें
कर्में केलीं समस्तें
धनुर्धरा
॥ ८२ ॥

परि तें बीजें जैसीं दग्धलीं
नुगवतींचि पेरिलीं
तैशीं कर्मेंचि परि तयां जाहलीं
मोक्षहेतु
॥ ८३ ॥

एथ आणिकही एक अर्जुना
हे कर्माकर्मविवंचना
आपुलिये चाडें सज्ञाना
योग्यु नोहे
॥ ८४ ॥

कर्म म्हणिपे तें कवण
अथवा अकर्मा काय लक्षण
ऐसें विचारितां विचक्षण
गुंफोनि ठेले
॥ ८५ ॥

जैसें कां कुडें नाणें
खऱ्याचेनि सारखेपणें
डोळ्यांचेंहि देखणें
संशयीं घाली
॥ ८६ ॥

तैसें नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें
गिंवसिजत आहाती कर्में
जे दुजी सृष्टी मनोधर्में
करूं सकती
॥ ८७ ॥

वांचूनि मूर्खाची गोठी कायसी
एथ मोहले गा क्रांतदर्शी
म्हणौनि आतां तेंचि परियेसीं
सांगेन तुज
॥ ८८ ॥

तरी कर्म म्हणजे स्वभावें
जेणें विश्वाकारु संभवे
तें सम्यक् आधीं जाणावें
लागे एथ
॥ ८९ ॥

मग वर्णाश्रमासि उचित
जें विशेष कर्म विहित
तेंही वोळखावें निश्चित
उपयोगेंसी
॥ ९० ॥

पाठीं जें निषिद्ध म्हणिपे
तेंही बुझावें स्वरूपें
येतुलेनि कांहीं न गुंफे
आपैसेंचि
॥ ९१ ॥

एऱ्हवीं जग हें कर्माधीन
ऐसी याची व्याप्ती गहन
परी तें असो आइकें चिन्ह
प्राप्तांचें गा
॥ ९२ ॥

जो सकळकर्मीं वर्ततां
देखैं आपुली नैष्कर्म्यता
कर्मसंगें निराशता
फळाचिया
॥ ९३ ॥

आणि कर्तव्यतेलागीं
जया दुसरें नाहीं जगीं
ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगीं
बोधला असे
॥ ९४ ॥

तरी क्रियाकलापु आघवा
आचरतु दिसे बरवा
तरी तो इही चिन्हीं जाणावा
ज्ञानिया गा
॥ ९५ ॥

जैसा कां जळापाशीं उभा ठाके
तो जरी आपणपें जळामाजिं देखे
तरी तो निभ्रांत वोळखे
म्हणे मी वेगळा आहें
॥ ९६ ॥

अथवा नावें हन जो रिगे
तो थडियेचें रुख जातां देखे वेगें
तेचि साचोकारें जों पाहों लागे
तंव रुख म्हणे अचळ
॥ ९७ ॥

तैसें सर्व कर्मीं असणें
ते फुडें मानूनि वायाणें
मग आपणया जो जाणे
नैष्कर्म्यु ऐसा
॥ ९८ ॥

आणि उदोअस्तुचेनि प्रमाणें
जैसें न चालतां सूर्याचें चालणें
तैसें नैष्कर्म्यत्व जाणें
कर्मींचि असतां
॥ ९९ ॥

तो मनुष्यासारिखा तरी आवडे
परी मनुष्यत्व तया न घडे
जैसें जळामाजीं न बुडे
भानुबिंब
॥ १०० ॥

तेणें न पाहतां विश्व देखिलें
न करितां सर्व केलें
न भोगितां भोगिलें
भोग्यजात
॥ १०१ ॥

एकेचि ठायीं बैसला
परि सर्वत्र तोचि गेला
हें असो विश्व जाहला
आंगेंचि तो
॥ १०२ ॥

जया पुरुषाच्या ठायीं
कर्माचा तरी खेदु नाहीं
परी फलापेक्षा कहीं
संचरेना
॥ १०३ ॥

आणि हें कर्म मी करीन
अथवा आदरिलें सिद्धी नेईन
येणें संकल्पेंहीं जयाचें मन
विटाळेना
॥ १०४ ॥

ज्ञानाग्नीचेनि मुखें
जेणें जाळिलीं कर्में अशेखें
तो परब्रह्मचि मनुष्यवेखें
वोळख तूं
॥ १०५ ॥

जो शरीरीं उदासु
फळभोगीं निरासु
नित्यता उल्हासु
होऊनि असे
॥ १०६ ॥

जो संतोषाचा गाभारा
आत्मबोधाचिये वोगरां
पुरे न म्हणेचि धनुर्धरा
आरोगितां
॥ १०७ ॥

कैसी अधिकाधिक आवडी
घेत महासुखाची गोडी
सांडोनियां आशा कुरोंडी
अहंभावेंसीं
॥ १०८ ॥

म्हणौनि अवसरें जें जें पावे
कीं तेणेंचि तो सुखावे
जया आपुलें आणि परावें
दोन्ही नाहीं
॥ १०९ ॥

तो दिठीं जें पाहे
तें आपणचि होऊनि जाये
आईके तें आहे
तोचि जाहला
॥ ११० ॥

चरणीं हन चाले
मुखें जें जें बोले
ऐसें चेष्टाजात तेतुलें
आपणचि जो
॥ १११ ॥

हें असो विश्व पाहीं
जयासि आपणपेंवांचूनि नाहीं
आतां कवण तें कर्म कायी
बाधी तयातें
॥ ११२ ॥

हा मत्सरु जेथ उपजे
तेतुलें नुरेचि जया दुजें
तो निर्मत्सरु काइ म्हणिजे
बोलवरी ?
॥ ११३ ॥

म्हणौनि सर्वांपरी मुक्तु
तो सकर्मुचि कर्मरहितु
सगुण परि गुणातीतु
एथ भ्रांति नाहीं
॥ ११४ ॥

तो देहसंगें तरी असे
परी चैतन्यासारिखा दिसे
पाहतां परब्रह्माचेनि कसें
चोखाळु भला
॥ ११५ ॥

ऐसाहि परी कौतुकें
जरी कर्में करी यज्ञादिकें
तरी तियें लया जाती निःशेखें
तयाच्याचि ठायीं
॥ ११६ ॥

अकाळींचीं अभ्रें जैशीं
उर्मीवीण आकाशीं
हारपती आपैशीं
उदयलीं सांती
॥ ११७ ॥

तैशीं विधिविधानें विहितें
जरी आचरे तो समस्तें
तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें
पावतीचि गा
॥ ११८ ॥

हें हवन मी होता
कां इयें यज्ञीं हा भोक्ता
ऐसिया बुद्धीसि नाहीं भिन्नता
म्हणौनियां
॥ ११९ ॥

जे इष्टयज्ञ यजावे
तें हविर्मंत्रादि आघवें
तो देखतसे अविनाशभावें
आत्मबुद्धि
॥ १२० ॥

म्हणौनि ब्रह्म तेंचि कर्म
ऐसें बोधा आलें जया सम
तया कर्तव्य तें नैष्कर्म्य
धनुर्धरा
॥ १२१ ॥

आतां अविवेकु कुमारत्वा मुकले
जयां विरक्तीचें पाणिग्रहण जाहलें
मग उपासन जिहीं आणिलें
योगाग्नीचें
॥ १२२ ॥

जे यजनशील अहर्निशीं
जिहीं अविद्या हविली मनेंसीं
गुरुवाक्य हुताशीं
हवन केलें
॥ १२३ ॥

तिहीं योगाग्निकीं यजिजे
तो दैवयज्ञु म्हणिजे
जेणें आत्मसुख कामिजे
पंडुकुमरा
॥ १२४ ॥

दैवास्तव देहाचें पाळण
ऐसा निश्चयो परिपूर्ण
जो चिंतीना देहभरण
तो महायोगी जाण दैवयोगें
॥ १२५ ॥

आतां अवधारी सांगैन आणिक
जे ब्रह्माग्नी साग्निक
तयांतें यज्ञचि यज्ञु देख
उपासिजे
॥ १२६ ॥

एक संयमाग्निहोत्री
ते युक्तित्रयाच्या मंत्रीं
यजन करिती पवित्रीं
इंद्रियद्रव्यीं
॥ १२७ ॥

एकां वैराग्य रवि विवळे
तंव संयती विहार केले
तेथ अपावृत जाहले
इंद्रियानळ
॥ १२८ ॥

तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली
तंव विकारांचीं इंधनें पळिपली
तेथ आशाधूमें सांडिलीं
पांचही कुंडें
॥ १२९ ॥

मग वाक्यविधीचिया निरवडी
विषय आहुती उदंडीं
हवन केलें कुंडीं
इन्द्रियाग्नीच्या
॥ १३० ॥

एकीं ययापरी पार्था
दोषु क्षाळिले सर्वथा
आणिकीं हृदयारणीं मंथा
विवेकु केला
॥ १३१ ॥

तो उपशमें निहटिला
धैर्येंवरी दाटिला
गुरुवाक्यें काढिला
बळकटपणें
॥ १३२ ॥

ऐसें समरसें मंथन केलें
तेथ झडकरी काजा आलें
जें उज्जीवन जाहलें
ज्ञानाग्नीचें
॥ १३३ ॥

पहिला ऋद्धिसिद्धींचा संभ्रमु
तो निवर्तोनि गेला धूमु
मग प्रगटला सूक्ष्मु
विस्फुलिंगु
॥ १३४ ॥

तया मनाचें मोकळें
तेंचि पेटवण घातले
जें यमनियमीं हळुवारलें
आइतें होतें
॥ १३५ ॥

तेणें सादुकुपणे ज्वाळा समृद्धा
मग वासनांतराचिया समिधा
स्नेहेंसीं नानाविधा
जाळिलिया
॥ १३६ ॥

तेथ सोहंमंत्रें दीक्षितीं
इंद्रियकर्मांच्या आहुती
तियें ज्ञानानळीं प्रदीप्तीं
दिधलिया
॥ १३७ ॥

पाठीं प्राणक्रियेचिये स्रुवेनिशीं
पूर्णाहुती पडली हुताशीं
तेथ अवभृत समरसीं
सहजें जहालें
॥ १३८ ॥

मग आत्मबोधींचें सुख
जें संयमाग्नीचें हुतशेष
तोचि पुरोडाशु देख
घेतला तिहीं
॥ १३९ ॥

एक ऐशिया इहीं यजनीं
मुक्त ते जाहले त्रिभुवनीं
या यज्ञक्रिया तरी आनानीं
परि प्राप्य तें एक
॥ १४० ॥

एक द्रव्युयज्ञु म्हणिपती
एक तपसामग्रीया निपजविती
एक योगयागुही आहाती
जे सांगितलें
॥ १४१ ॥

एकीं शब्दीं शब्दु यजिजे
तो वाग्यज्ञु म्हणिजे
ज्ञानें ज्ञेय गमिजे
तो ज्ञानयज्ञु
॥ १४२ ॥

हें अर्जुना सकळ कुवाडें
जे अनुष्ठितां अतिसांकडें
परी जितेंद्रियासीचि घडे
योग्यतावशें
॥ १४३ ॥

ते प्रवीण तेथ भले
आणि योगसमृद्धि आथिले
म्हणौनि आपणपां तिहीं केलें
आत्महवन
॥ १४४ ॥

मग अपानाग्नीचेनि मुखीं
प्राणद्रव्यें देखीं
हवन केलें एकीं
अभ्यासयोगें
॥ १४५ ॥

एक अपानु प्राणीं अर्पिती
एक दोहींतेंही निरुंधिती
ते प्राणायामी म्हणिपती
पंडुकुमरा
॥ १४६ ॥

एक वज्रयोगक्रमें
सर्वाहारसंयमें
प्राणीं प्राणु संभ्रमें
हवन करिती
॥ १४७ ॥

ऐसें मोक्षकाम सकळ
समस्त हे यजनशीळ
जिहीं यज्ञद्वारां मनोमळ
क्षाळण केले
॥ १४८ ॥

जया अविद्याजात जाळितां
जें उरलें निजस्वभावता
जेथ अग्नि आणि होता
उरेचिना
॥ १४९ ॥

जेथ यजितयाचा कामु पुरे
यज्ञींचें विधान सरे
मागुतें जेथूनि वोसरें
क्रियाजात
॥ १५० ॥

विचार जेथ न रिगे
हेतु जेथ न निगे
जें द्वैतदोषसंगें
सिंपेचिना
॥ १५१ ॥

सार

ओवी ७६ मध्ये कृष्ण सांगतात की ज्याच्या त्याच्या भावनेप्रमाणे फळ मिळते आणि ते स्वतः केवळ साक्षी आहेत. त्याच ओघात ते म्हणतात की चार वर्ण गुण आणि कर्मांच्या विभागाने निर्माण झाले, पण त्यांचा कर्ता आपण नाही; हे जो जाणतो तो सुटतो. आधीच्या मुमुक्षूंनी हेच जाणून कर्मे केली, आणि भाजलेली बीजे उगवत नाहीत तशी त्यांची कर्मे बंधनाऐवजी मोक्षाकडे नेणारी ठरली.

मग कर्म आणि अकर्म यांचा विचार येतो. खऱ्या नाण्यासारखे दिसणारे खोटे नाणे डोळ्यांनाही फसवते, तसे ज्ञानी लोकही इथे गोंधळतात. म्हणून कृष्ण तीन गोष्टी ओळखायला सांगतात: कर्माचे स्वरूप, वर्णाश्रमाला योग्य असे विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. ज्ञानी माणसाची खूण अशी की तो सर्व कर्मे करतानाही फळाची आशा धरत नाही, आणि कर्मात राहूनही अकर्म पाहतो. पाण्याकाठी उभ्या माणसाला आपले प्रतिबिंब दिसते, पण तो जाणतो की मी वेगळा आहे; नावेतून जाताना किनाऱ्यावरची झाडे पळताना दिसतात, पण ती स्थिर असतात. असा पुरुष माणसासारखा दिसतो, तरीही सूर्यबिंब पाण्यात बुडत नाही तसा कर्मात बुडत नाही.

त्याला कर्माचा खेद नसतो, आणि हे मी करीन असा संकल्पही त्याच्या मनाला डाग लावत नाही. ज्ञानाच्या अग्नीत त्याने कर्मे जाळली आहेत; तो माणसाच्या रूपातील परब्रह्मच आहे. आपले आणि परके असा भेद त्याच्यापाशी उरत नाही, म्हणून तो जे पाहतो ते स्वतःच होतो. त्याने यज्ञादी कर्मे केली तरी ती अवकाळी ढगांसारखी आकाशातच विरून जातात.

ओवी १२२ पासून यज्ञांचे प्रकार येतात. कोणी योगाग्नीत उपासना करतात. जो देहाच्या पोषणाची चिंता न करता दैवयोगाने जे मिळेल त्यात निश्चिंत राहतो, तोही महायोगी ठरतो. कोणी संयमाच्या अग्नीत इंद्रियांची आहुती देतात. वैराग्याची ज्वाळा पेटली की विकारांची लाकडे जळतात, आणि हृदयाच्या अरणीतून विवेकाचे मंथन होऊन ज्ञानाग्नी प्रकटतो. त्यात वासनांच्या समिधा, इंद्रियकर्मांच्या आहुती आणि प्राणक्रियेच्या स्रुवेने पूर्णाहुती पडते; शेवटी आत्मबोधाचे सुख हाच प्रसाद ठरतो.

द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, वाग्यज्ञ आणि ज्ञानयज्ञ असे अनेक मार्ग सांगून ज्ञानेश्वर म्हणतात की साधने वेगळी असली तरी पोहोचायचे एकाच ठिकाणी आहे. कोणी अपान प्राणात अर्पण करतात, कोणी दोघांना रोखतात, कोणी आहारावर संयम ठेवून प्राणात प्राण हवन करतात. भाग संपताना ते त्या अवस्थेकडे बोट दाखवतात जिथे अविद्या जळून जाते, यज्ञकर्त्याची कामना पुरी होते आणि द्वैताचा दोष स्पर्श करू शकत नाही.

संसाधने (Resources)
Scroll to Top