ज्ञानेश्वरी – अध्याय १२ (ओवी १–६२)

लेखक
संत ज्ञानेश्वर
काळ
१३ वे शतक (इ.स. १२९०)
अध्याय / भाग
अध्याय १२ · भाग १
भाषा
मराठी
॥ श्री गणेशाय नमः ॥

बाराव्या अध्यायाच्या या पहिल्या भागात ओवी १ ते ६२ आहेत, म्हणजे भक्तीची वाट समजून घेण्याची पहिली पायरी. अध्यायाचे नाव भक्तियोग. विश्वरूपाचे दर्शन घेऊन अर्जुन शांत झाला आहे, पण त्याच्या मनात एक प्रश्न उभा राहिला आहे, आणि त्याच प्रश्नातून हा संपूर्ण अध्याय उमलतो.

या ओव्यांत दोन गोष्टी घडतात. सुरुवातीच्या वीस ओव्यांत ज्ञानदेव गुरुकृपेला मातेच्या रूपात हाक मारतात, तिच्या कुशीत आपल्याला वाढू द्या आणि पुढचे निरूपण सिद्धीला जाऊ द्या, अशी विनवणी करतात. त्यानंतर अर्जुनाचा प्रश्न येतो: जे भक्त सगुण रूपाला भजतात आणि जे निराकार अक्षराची उपासना करतात, त्या दोघांत श्रेष्ठ योगी कोण? कृष्णाचे उत्तर सुरू होते आणि दोन्ही वाटांची तुलना ओव्यांमधून हळूहळू उलगडत जाते.

खाली ओव्या मूळ रूपात क्रमांकासह दिल्या आहेत आणि त्यानंतर माझ्या शब्दांत सार. ओव्यांच्या मधे येणारे गीतेचे संस्कृत श्लोक इथे घेतलेले नाहीत; फक्त ज्ञानदेवांच्या ओव्या आहेत. त्या सावकाश वाचल्या की प्रश्नाची तीव्रता आणि उत्तराची ओढ दोन्ही जाणवतात. आणि भक्ती हा शब्द इथे केवळ भावुकपणा नाही, तर पूर्ण समर्पणाचा मार्ग आहे, हेही हळूहळू स्पष्ट होत जाते.

ओवी १ ते ६२

जय जय वो शुद्धे
उदारे प्रसिद्धे
अनवरत आनंदे
वर्षतिये
॥ १ ॥

विषयव्याळें मिठी
दिधलिया नुठी ताठी
ते तुझिये गुरुकृपादृष्टी
निर्विष होय
॥ २ ॥

तरी कवणातें तापु पोळी
कैसेनि वो शोकु जाळी
जरी प्रसादरसकल्लोळीं
पुरें येसि तूं
॥ ३ ॥

योगसुखाचे सोहळे
सेवकां तुझेनि स्नेहाळे
सोऽहंसिद्धीचे लळे
पाळिसी तूं
॥ ४ ॥

आधारशक्तीचिया अंकीं
वाढविसी कौतुकीं
हृदयाकाशपल्लकीं
परीये देसी निजे
॥ ५ ॥

प्रत्यक्‌ज्योतीची वोवाळणी
करिसी मनपवनाचीं खेळणीं
आत्मसुखाची बाळलेणीं
लेवविसी
॥ ६ ॥

सतरावियेचें स्तन्य देसी
अनुहताचा हल्लरू गासी
समाधिबोधें निजविसी
बुझाऊनि
॥ ७ ॥

म्हणोनि साधकां तूं माउली
पिके सारस्वत तुझिया पाउलीं
या कारणें मी साउली
न संडीं तुझी
॥ ८ ॥

अहो सद्‌गुरुचिये कृपादृष्टी
तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी
तो सकलविद्यांचिये सृष्टीं
धात्रा होय
॥ ९ ॥

म्हणोनि अंबे श्रीमंते
निजजनकल्पलते
आज्ञापीं मातें
ग्रंथनिरूपणीं
॥ १० ॥

नवरसीं भरवीं सागरु
करवीं उचित रत्‍नांचे आगरु
भावार्थाचे गिरिवरु
निफजवीं माये
॥ ११ ॥

साहित्यसोनियाचिया खाणी
उघडवीं देशियेचिया क्षोणीं
विवेकवल्लीची लावणी
हों देई सैंघ
॥ १२ ॥

संवादफळनिधानें
प्रमेयाचीं उद्यानें
लावीं म्हणे गहनें
निरंतर
॥ १३ ॥

पाखांडाचे दरकुटे
मोडीं वाग्वाद अव्हांटे
कुतर्कांचीं दुष्टें
सावजें फेडीं
॥ १४ ॥

श्रीकृष्णगुणीं मातें
सर्वत्र करीं वो सरतें
राणिवे बैसवी श्रोते
श्रवणाचिये
॥ १५ ॥

ये मर्‍हाठियेचिया नगरीं
ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं
घेणें देणें सुखचिवरी
हों देईं या जगा
॥ १६ ॥

तूं आपुलेनि स्नेहपल्लवें
मातें पांघुरविशील सदैवें
तरी आतांचि हें आघवें
निर्मीन माये
॥ १७ ॥

इये विनवणीयेसाठीं
अवलोकिलें गुरु कृपादृष्टी
म्हणे गीतार्थेंसी उठी
न बोलें बहु
॥ १८ ॥

तेथ जी जी महाप्रसादु
म्हणोनि साविया जाहला आनन्दु
आतां निरोपीन प्रबंधु
अवधान दीजे
॥ १९ ॥

तरी सकलवीराधिराजु
जो सोमवंशीं विजयध्वजु
तो बोलता जाहला आत्मजु
पंडुनृपाचा
॥ २० ॥

कृष्णातें म्हणे अवधारिलें
आपण विश्वरूप मज दाविलें
तें नवल म्हणोनि बिहालें
चित्त माझें
॥ २१ ॥

आणि इये कृष्णमूर्तीची सवे
यालागीं सोय धरिली जीवें
तंव नको म्हणोनि देवें
वारिलें मातें
॥ २२ ॥

तरी व्यक्त आणि अव्यक्त
हें तूंचि एक निभ्रांत
भक्ती पाविजे व्यक्त
अव्यक्त योगें
॥ २३ ॥

या दोनी जी वाटा
तूंतें पावावया वैकुंठा
व्यक्ताव्यक्त दारवंठां
रिगिजे येथ
॥ २४ ॥

पैं जे वानी श्यातुका
तेचि वेगळिये व्याला येका
म्हणोनि एकदेशिया व्यापका
सरिसा पाडू
॥ २५ ॥

अमृताचिया सागरीं
जे लाभे सामर्थ्याची थोरी
तेचि दे अमृतलहरी
चुळीं घेतलिया
॥ २६ ॥

हे कीर माझ्या चित्तीं
प्रतीति आथि जी निरुती
परि पुसणें योगपती
तें याचिलागीं
॥ २७ ॥

जें देवा तुम्हीं नावेक
अंगिकारिलें व्यापक
तें साच कीं कवतिक
हें जाणावया
॥ २८ ॥

तरी तुजलागीं कर्म
तूंचि जयांचें परम
भक्तीसी मनोधर्म
विकोनि घातला
॥ २९ ॥

इत्यादि सर्वीं परीं
जे भक्त तूंतें श्रीहरी
बांधोनियां जिव्हारीं
उपासिती
॥ ३० ॥

आणि जें प्रणवापैलीकडे
वैखरीयेसी जें कानडें
कायिसयाहि सांगडें
नव्हेचि जें वस्तु
॥ ३१ ॥

तें अक्षर जी अव्यक्त
निर्देश देशरहित
सोऽहंभावें उपासित
ज्ञानिये जे
॥ ३२ ॥

तयां आणि जी भक्तां
येरयेरांमाजी अनंता
कवणें योगु तत्त्वतां
जाणितला सांगा
॥ ३३ ॥

इया किरीटीचिया बोला
तो जगद्‌बंधु संतोषला
म्हणे हो प्रश्नु भला
जाणसी करूं
॥ ३४ ॥

तरी अस्तुगिरीचियां उपकंठीं
रिगालिया रविबिंबापाठीं
रश्मी जैसे किरीटी
संचरती
॥ ३५ ॥

कां वर्षाकाळीं सरिता
जैसी चढों लागें पांडुसुता
तैसी नीच नवी भजतां
श्रद्धा दिसे
॥ ३६ ॥

परी ठाकिलियाहि सागरु
जैसा मागीलही यावा अनिवारु
तिये गंगेचिये ऐसा पडिभरु
प्रेमभावा
॥ ३७ ॥

तैसें सर्वेंद्रियांसहित
मजमाजीं सूनि चित्त
जे रात्रिदिवस न म्हणत
उपासिती
॥ ३८ ॥

इयापरी जे भक्त
आपणपें मज देत
तेचि मी योगयुक्त
परम मानीं
॥ ३९ ॥

आणि येर तेही पांडवा
जे आरूढोनि सोऽहंभावा
झोंबती निरवयवा
अक्षरासी
॥ ४० ॥

मनाची नखी न लगे
जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे
ते इंद्रियां कीर जोगें
कायि होईल ?
॥ ४१ ॥

परी ध्यानाही कुवाडें
म्हणोनि एके ठायीं न संपडे
व्यक्तीसि माजिवडें
कवणेही नोहे
॥ ४२ ॥

जया सर्वत्र सर्वपणें
सर्वांही काळीं असणें
जें पावूनि चिंतवणें
हिंपुटी जाहलें
॥ ४३ ॥

जें होय ना नोहे
जें नाहीं ना आहे
ऐसें म्हणोनि उपाये
उपजतीचि ना
॥ ४४ ॥

जें चळे ना ढळे
सरे ना मैळे
तें आपुलेनीचि बळें
आंगविलें जिहीं
॥ ४५ ॥

पैं वैराग्यमहापावकें
जाळूनि विषयांचीं कटकें
अधपलीं तवकें
इंद्रियें धरिलीं
॥ ४६ ॥

मग संयमाची धाटी
सूनि मुरडिलीं उफराटीं
इंद्रियें कोंडिलीं कपाटीं
हृदयाचिया
॥ ४७ ॥

अपानींचिया कवाडा
लावोनि आसनमुद्रा सुहाडा
मूळबंधाचा हुडा
पन्नासिला
॥ ४८ ॥

आशेचे लाग तोडिले
अधैर्याचे कडे झाडिले
निद्रेचें शोधिलें
काळवखें
॥ ४९ ॥

वज्राग्नीचिया ज्वाळीं
करूनि सप्तधातूंची होळी
व्याधींच्या सिसाळीं
पूजिलीं यंत्रें
॥ ५० ॥

मग कुंडलिनियेचा टेंभा
आधारीं केला उभा
तया चोजवलें प्रभा
निमथावरी
॥ ५१ ॥

नवद्वारांचिया चौचकीं
बाणूनि संयतीची आडवंकी
उघडिली खिडकी
ककारांतींची
॥ ५२ ॥

प्राणशक्तिचामुंडे
प्रहारूनि संकल्पमेंढे
मनोमहिषाचेनि मुंडें
दिधलीं बळी
॥ ५३ ॥

चंद्रसूर्यां बुझावणी
करूनि अनुहताची सुडावणी
सतरावियेचें पाणी
जिंतिलें वेगीं
॥ ५४ ॥

मग मध्यमा मध्य विवरें
तेणें कोरिवें दादरें
ठाकिलें चवरें
ब्रह्मरंध्र
॥ ५५ ॥

वरी मकारांत सोपान
ते सांडोनिया गहन
काखे सूनियां गगन
भरले ब्रह्मीं
॥ ५६ ॥

ऐसे जे समबुद्धी
गिळावया सोऽहंसिद्धी
आंगविताती निरवधी
योगदुर्गें
॥ ५७ ॥

आपुलिया साटोवाटी
शून्य घेती उठाउठीं
तेही मातेंचि किरीटी
पावती गा
॥ ५८ ॥

वांचूनि योगचेनि बळें
अधिक कांहीं मिळे
ऐसें नाहीं आगळें
कष्टचि तया
॥ ५९ ॥

जिहीं सकळ भूतांचिया हितीं
निरालंबीं अव्यक्तीं
पसरलिया आसक्ती
भक्तीवीण
॥ ६० ॥

तयां महेन्द्रादि पदें
करिताति वाटवधें
आणि ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें
पडोनि ठाती
॥ ६१ ॥

कामक्रोधांचे विलग
उठावती अनेग
आणि शून्येंसीं आंग
झुंजवावें कीं
॥ ६२ ॥

सार

ओवी १ ते १९ मध्ये ज्ञानदेव गुरुकृपादृष्टीला साद घालतात. विषयरूपी सर्पाचे विष उतरवणारी, भक्ताला कडेवर घेऊन झोके देणारी, त्याला आत्मसुखाची खेळणी देणारी अशी ती माउली आहे. तिच्या पायाशी सारस्वत पिकते, म्हणून मी तुझी सावली सोडणार नाही, असे ते म्हणतात. मग ग्रंथ सांगण्याची आज्ञा मागतात: माझ्या मराठीच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे आणि कुतर्काचे पाखंड मोडून पडू दे. या विनवणीने गुरू प्रसन्न होतात, आणि ज्ञानदेव निरूपणाला आरंभ करतात.

ओवी २० ते ३३ मध्ये संवाद सुरू होतो. विश्वरूप पाहून आपले चित्त घाबरले, म्हणून पुन्हा कृष्णमूर्तीचाच आश्रय हवा, असे अर्जुन सांगतो. तुझ्याकडे जाणाऱ्या दोन वाटा आहेत, व्यक्त आणि अव्यक्त; त्यांतून तुझ्यापर्यंत पोहोचणारे कोण आणि कसे, ते मला नीट कळू दे, अशी त्याची विचारणा आहे. जे सर्व कर्मे तुलाच अर्पण करून भजतात आणि जे वाणीच्या पलीकडच्या अक्षराला भजतात, त्यांत योगात श्रेष्ठ कोण, हा प्रश्न.

ओवी ३४ ते ३९ मध्ये कृष्ण प्रश्नाचे कौतुक करतो आणि सरळ उत्तर देतो. मावळत्या सूर्यबिंबात किरण परत जातात, तसे जे भक्त सर्व इंद्रियांसह चित्त माझ्यात ठेवतात, रात्र आणि दिवस असा भेद न मानता उपासना करतात, त्यांना मी सर्वांत योगयुक्त मानतो. ओवी ४० ते ५६ मध्ये अक्षराच्या उपासकांची वाट वर्णिली आहे. ती वस्तू मनाच्या नखालाही लागत नाही आणि बुद्धीच्या दृष्टीत येत नाही; ती सर्वत्र आणि सर्वकाळी असूनही कुठेच हाती सापडत नाही. तिच्याकडे जाण्यासाठी हे साधक वैराग्याच्या अग्नीत इंद्रिये जाळतात, मूळबंध आणि आसनांनी द्वारे बंद करतात, कुंडलिनीचा दिवा पेटवून ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचतात.

ओवी ५७ ते ६२ मध्ये कृष्ण स्पष्ट करतो की तेही शेवटी माझ्यापर्यंतच येतात, पण त्यांचा मार्ग केवळ कष्टाचा आहे. भक्तीशिवाय अव्यक्ताकडे धावणाऱ्यांना इंद्रादी पदांची आमिषे, ऋद्धिसिद्धींचे अडथळे आणि काम-क्रोधांची झुंज वाटेत भेटते. भक्तीची वाट मात्र सोपी असल्याचे पुढच्या ओव्यांत उघडेल, असा संकेत इथे मिळतो.

संसाधने (Resources)
Scroll to Top