ज्ञानेश्वरी – अध्याय १८ (ओवी ३६६–४३८)

लेखक
संत ज्ञानेश्वर
काळ
१३ वे शतक (इ.स. १२९०)
अध्याय / भाग
अध्याय १८ · भाग ६
भाषा
मराठी
॥ श्री गणेशाय नमः ॥

अठराव्या अध्यायाचा हा सहावा भाग आहे, म्हणजे अध्यायातल्या तत्त्वचर्चेचा एक महत्त्वाचा टप्पा. ओवी ३६६ ते ४३८ अशा त्र्याहत्तर ओव्या यात येतात. मागच्या भागात माउलींनी कर्माची पाच कारणे उलगडली होती. आता ती कारणे शास्त्राच्या मार्गाने चालली तर कर्म न्यायाचे ठरते, आणि मार्ग सोडला तर तेच कर्म अन्यायाचे होते, हे सांगून ते चर्चा आत्म्याकडे वळवतात. पाच कारणांच्या या सगळ्या पसाऱ्यात आत्मा नेमका कुठे आहे, हा प्रश्न इथे समोर येतो. याचे उत्तर ऐकताना वाचकालाही स्वतःकडे पाहण्याची संधी मिळते.

उत्तर देताना ज्ञानेश्वर महाराज रोजच्या अनुभवातली उदाहरणे घेतात: डबक्यातले सूर्याचे प्रतिबिंब, दोरीला साप समजून घाबरणे, कावीळ झालेल्याला पिवळा दिसणारा चंद्र, कुंभाराचे फिरते चाक, शेतातला गवताचा पुतळा. देहालाच आपले रूप मानणारा माणूस स्वतःला कर्ता समजतो, तर जागा झालेला माणूस कर्माच्या मध्येही अलिप्त राहतो, हे ते अगदी साध्या दृष्टांतांनी पटवतात. हा भाग गीतेच्या सोळाव्या आणि सतराव्या श्लोकांवर आधारित आहे; पाठात मात्र फक्त ज्ञानेश्वरांच्या ओव्या दिल्या आहेत. ओव्या सावकाश, मोठ्याने वाचा, प्रत्येक दृष्टांताचे चित्र मनात उभे करा, मग खालचे सार पाहा.

ओवी ३६६ ते ४३८

आणि देहादिकीं कारणीं
देहादि हेतु मिळणीं
होय जया उभारणी
कर्मजातां
॥ ३६६ ॥

तें शास्त्रार्थेंं मानिलेया
मार्गा अनुसरे धनंजया
तरी न्याय तो न्याया
हेतु होय
॥ ३६७ ॥

जैसा पर्जन्योदकाचा लोटु
विपायें धरी साळीचा पाटु
तो जिरे परी अचाटु
उपयोगु आथी
॥ ३६८ ॥

कां रोषें निघालें अवचटें
पडिलें द्वारकेचिया वाटे
तें शिणे परी सुनाटें
न वचिती पदें
॥ ३६९ ॥

तैसें हेतुकारण मेळें
उठी कर्म जें आंधळें
तें शास्त्राचें लाहे डोळे
तैं न्याय म्हणिपे
॥ ३७० ॥

ना दूध वाढिता ठावो पावे
तंव उतोनि जाय स्वभावें
तोही वेंचु परी नव्हे
वेंचिलें तें
॥ ३७१ ॥

तैसें शास्त्रसाह्येंवीण
केलें नोहे जरी अकारण
तरी लागो कां नागवण
दानलेखीं
॥ ३७२ ॥

अगा बावन्ना वर्णांपरता
कोण मंत्रु आहे पंडुसुता
कां बावन्नही नुच्चारितां
जीवु आथी ?
॥ ३७३ ॥

परी मंत्राची कडसणी
जंव नेणिजे कोदंडपाणी
तंव उच्चारफळ वाणी
न पवे जेवीं
॥ ३७४ ॥

तेवीं कारणहेतुयोगें
जें बिसाट कर्म निगे
तें शास्त्राचिये न लगे
कांसे जंव
॥ ३७५ ॥

कर्म होतचि असे तेव्हांही
परी तें होणें नव्हे पाहीं
तो अन्यायो गा अन्यायीं
हेतु होय
॥ ३७६ ॥

एवं पंचकारणा कर्मा
पांचही हेतु हे सुमहिमा
आतां एथें पाहें पां आत्मा
सांपडला असे ?
॥ ३७७ ॥

भानु न होनि रूपें जैसीं
चक्षुरूपातें प्रकाशी
आत्मा न होनि कर्में तैसीं
प्रकटित असे गा
॥ ३७८ ॥

पैं प्रतिबिंब आरिसा
दोन्ही न होनि वीरेशा
दोहींतें प्रकाशी जैसा
न्याहाळिता तो
॥ ३७९ ॥

कां अहोरात्र सविता
न होनि करी पंडुसुता
तैसा आत्मा कर्मकर्ता
न होनि दावी
॥ ३८० ॥

परी देहाहंमान भुली
जयाची बुद्धि देहींचि आतली
तया आत्मविषयीं जाली
मध्यरात्री गा
॥ ३८१ ॥

जेणें चैतन्या ईश्वरा ब्रह्मा
देहचि केलें परमसीमा
तया आत्मा कर्ता हे प्रमा
अलोट उपजे
॥ ३८२ ॥

आत्माचि कर्मकर्ता
हाही निश्चयो नाहीं तत्वतां
देहोचि मी कर्मकर्ता
मानितो साचे
॥ ३८३ ॥

जे आत्मा मी कर्मातीतु
सर्वकर्मसाक्षिभूतु
हे आपुली कहीं मातु
नायकेचि कानीं
॥ ३८४ ॥

म्हणौनि उमपा आत्मयातें
देहचिवरी मविजे एथें
विचित्र काई रात्रि दिवसातें
डुडुळ न करी ?
॥ ३८५ ॥

पैं जेणें आकाशींचा कहीं
सत्य सूर्यु देखिला नाहीं
तो थिल्लरींचें बिंब काई
मानू न लाहे ?
॥ ३८६ ॥

थिल्लराचेनि जालेपणें
सूर्यासि आणी होणें
त्याच्या नाशीं नाशणें
कंपें कंपू
॥ ३८७ ॥

आणि निद्रिस्ता चेवो नये
तंव स्वप्न साच हों लाहे
रज्जु नेणतां सापा बिहे
विस्मो कवण ?
॥ ३८८ ॥

जंव कवळ आथि डोळां
तंव चंद्रु देखावा कींं पिंवळा
काय मृगींहीं मृगजळा
भाळावें नाहीं ?
॥ ३८९ ॥

तैसा शास्त्रगुरूचेनि नांवे
जो वाराही टेंकों नेदी सिवें
केवळ मौढ्याचेनिचि जीवें
जियाला जो
॥ ३९० ॥

तेणें देहात्मदृष्टीमुळें
आत्मया घापे देहाचें जाळें
जैसा अभ्राचा वेगु कोल्हें
चंद्रीं मानीं
॥ ३९१ ॥

मग तया मानणयासाठीं
देहबंदीशाळे किरीटी
कर्माच्या वज्रगांठी
कळासे तो
॥ ३९२ ॥

पाहे पां बद्ध भावना दृढा
नळियेवरी तो बापुडा
काय मोकळेयाही पायाचा चवडा
न ठकेचि पुंसा
॥ ३९३ ॥

म्हणौनि निर्मळा आत्मस्वरूपीं
तो प्रकृतीचें केलें आरोपी
तो कल्पकोडीच्या मापीं
मवीचि कर्में
॥ ३९४ ॥

आता कर्मामाजीं असे
परी तयातें कर्म न स्पर्शे
वडवानळातें जैसें
समुद्रोदक
॥ ३९५ ॥

तैसेंनि वेगळेपणें
जयाचें कर्मीं असणें
तो कीर वोळखावा कवणें
तरी सांगो
॥ ३९६ ॥

जे मुक्तातें निर्धारितां
लाभे आपलीच मुक्तता
जैसी दीपें दिसें पाहतां
आपली वस्तु
॥ ३९७ ॥

नातरी दर्पणु जंव उटिजे
तंव आपणपयां आपण भेटिजे
कां तोय पावतां तोय होईजे
लवणें जेंवीं
॥ ३९८ ॥

हें असो परतोनि मागुतें
प्रतिबिंब पाहे बिंबातें
तंव पाहणें जाउनी आयितें
बिंबचि होय
॥ ३९९ ॥

तैसें हारपलें आपणपें पावे
तैं संतांतें पाहतां गिंवसावें
म्हणौनि वानावे ऐकावे
तेचि सदा
॥ ४०० ॥

परी कर्मीं असोनि कर्में
जो नावरे समेंविषमें
चर्मचक्षूंचेनि चामें
दृष्टि जैसी
॥ ४०१ ॥

तैसा सोडवला जो आहे
तयाचें रूप आतां पाहें
उपपत्तीची बाहे
उभऊनि सांगों
॥ ४०२ ॥

तरी अविद्येचिया निदा
विश्वस्वप्नाचा हा धांदा
भोगीत होता प्रबुद्धा
अनादि जो
॥ ४०३ ॥

तो महावाक्याचेनि नांवें
गुरुकृपेचेनि थांवें
माथां हातु ठेविला नव्हे
थापटिला जैसा
॥ ४०४ ॥

तैसा विश्वस्वप्नेंसीं माया
नीद सांडूनि धनंजया
सहसा चेइला अद्वया-
नंदपणें जो
॥ ४०५ ॥

तेव्हां मृगजळाचे पूर
दिसते एक निरंतर
हारपती कां चंद्रकर
फांकतां जैसे
॥ ४०६ ॥

कां बाळत्व निघोनि जाय
तैं बागुला नाहीं त्राय
पैं जळालिया इंधन न होय
इंधन जेवीं
॥ ४०७ ॥

नाना चेवो आलिया पाठीं
तैं स्वप्न न दिसे दिठी
तैसी अहं ममता किरीटी
नुरेचि तया
॥ ४०८ ॥

मग सूर्यु आंधारालागीं
रिघो कां भलते सुरंगीं
परी तो तयाच्या भागीं
नाहींचि जैसा
॥ ४०९ ॥

तैसा आत्मत्वें वेष्टिला होये
तो जया जया दृश्यातें पाहें
तें दृष्य द्रष्टेपणेंसीं होत जाये
तयाचेंचि रूप
॥ ४१० ॥

जैसा वन्हि जया लागे
तें वन्हिचि जालिया आंगें
दाह्यदाहकविभागें
सांडिजे तें
॥ ४११ ॥

तैसा कर्माकारा दुजेया
तो कर्तेपणाचा आत्मया
आळु आला तो गेलिया
कांहीं बाहीं जें उरे
॥ ४१२ ॥

तिये आत्मस्थितीचा जो रावो
मग तो देहीं इये जाणेल ठावो ?
काय प्रलयांबूचा उन्नाहो
वोघु मानी ?
॥ ४१३ ॥

तैसी ते पूर्ण अहंता
काई देहपणें पंडुसुता
आवरे काई सविता
बिंबें धरिला ?
॥ ४१४ ॥

पैं मथूनि लोणी घेपे
तें मागुती ताकीं घापे
तरी तें अलिप्तपणें सिंपे
तेणेंसी काई ?
॥ ४१५ ॥

नाना काष्ठौनि वीरेशा
वेगळा केलिया हुताशा
राहे काष्ठाचिया मांदुसा
कोंडलेपणें ?
॥ ४१६ ॥

कां रात्रीचिया उदराआंतु
निघाला जो हा भास्वतु
तो रात्री ऐसी मातु
ऐके कायी ?
॥ ४१७ ॥

तैसें वेद्य वेदकपणेंसी
पडिलें कां जयाचे ग्रासीं
तया देह मी ऐसी
अहंता कैंची ?
॥ ४१८ ॥

आणि आकाशें जेथें जेथुनी
जाइजे तेथ असे भरोनी
म्हणौनि ठेलें कोंदोनी
आपेंआप
॥ ४१९ ॥

तैसें जें तेणें करावें
तो तेंचि आहे स्वभावें
मा कोणें कर्मीं वेष्टावें
कर्तेपणें ?
॥ ४२० ॥

नुरेचि गगनावीण ठावो
नोहेचि समुद्रा प्रवाहो
नुठीचि ध्रुवा जावों
तैसें जाहालें
॥ ४२१ ॥

ऐसेनि अहंकृतिभावो
जयाचा बोधीं जाहला वावो
तऱ्ही देहा जंव निर्वाहो
तंव आथी कर्में
॥ ४२२ ॥

वारा जरी वाजोनि वोसरे
तरी तो डोल रुखीं उरे
कां सेंदें द्रुति राहे कापुरें
वेंचलेनी
॥ ४२३ ॥

कां सरलेया गीताचा समारंभु
न वचे राहवलेपणाचा क्षोभु
भूमी लोळोनि गेलिया अंबु
वोल थारे
॥ ४२४ ॥

अगा मावळलेनि अर्कें
संध्येचिये भूमिके
ज्योतिदीप्ति कौतुकें
दिसे जैसी
॥ ४२५ ॥

पैं लक्ष भेदिलियाहीवरी
बाण धांवेचि तंववरी
जंव भरली आथी उरी
बळाची ते
॥ ४२६ ॥

नाना चक्रीं भांडें जालें
तें कुलालें परतें नेलें
परी भ्रमेंचि तें मागिले
भोवंडिलेपणें
॥ ४२७ ॥

तैसा देहाभिमानु गेलिया
देह जेणें स्वभावें धनंजया
जालें तें अपैसया
चेष्टवीच तें
॥ ४२८ ॥

संकल्पेंवीण स्वप्न
न लावितां दांगीचें बन
न रचितां गंधर्वभुवन
उठी जैसें
॥ ४२९ ॥

आत्मयाचेनि उद्यमेंवीण
तैसें देहादिपंचकारण
होय आपणयां आपण
क्रियाजात
॥ ४३० ॥

पैं प्राचीनसंस्कारवशें
पांचही कारणें सहेतुकें
कामवीजती गा अनेकें
कर्माकारें
॥ ४३१ ॥

तया कर्मामाजीं मग
संहरो आघवें जग
अथवा नवें चांग
अनुकरो
॥ ४३२ ॥

परी कुमुद कैसेनि सुके
कैसें तें कमळ फांके
हीं दोन्ही रवी न देखे
जयापरी
॥ ४३३ ॥

कां वीजु वर्षोनि आभाळ
ठिकरिया आतो भूतळ
अथवा करूं शाड्वळ
प्रसन्नावृष्टी
॥ ४३४ ॥

तरी तया दोहींतें जैसें
नेणिजेचि कां आकाशें
तैसा देहींच जो असे
विदेहदृष्टी
॥ ४३५ ॥

तो देहादिकीं चेष्टीं
घडतां मोडतां हे सृष्टी
न देखे स्वप्न दृष्टी
चेइला जैसा
॥ ४३६ ॥

येऱ्हवीं चामाचे डोळेवरी
जे देखती देहचिवरी
ते कीर तो व्यापारी
ऐसेंचि मानिती
॥ ४३७ ॥

कां तृणाचा बाहुला
जो आगरामेरें ठेविला
तो साचचि राखता कोल्हा
मानिजे ना ?
॥ ४३८ ॥

सार

ओवी ३६६ ते ३७६ मध्ये शास्त्राचे महत्त्व सांगितले आहे. पाच कारणे मिळून घडणारे कर्म शास्त्राच्या वाटेने गेले तर न्यायाचे होते. पावसाचे पाणी शेतात मुरून पीक देते; रागाच्या भरात भलत्या वाटेने निघालेला थकतो, पण पोहोचत नाही. मंत्राचे मर्म न कळता केलेला उच्चार निष्फळ ठरतो, तसे शास्त्राधार नसलेले कर्म आंधळे राहते.

ओवी ३७७ ते ३८४ मध्ये आत्मा कुठे आहे, हा प्रश्न येतो. सूर्य स्वतः रूपे न होता सर्व रूपे प्रकाशित करतो, तसा आत्मा कर्म न होता कर्मांना प्रकट करतो. मात्र ज्याची बुद्धी देहातच अडकली, त्याच्यासाठी आत्म्याच्या बाबतीत मध्यरात्रच असते; तो देहालाच कर्ता मानतो.

ओवी ३८५ ते ३९४ मध्ये भ्रमाची उदाहरणे येतात. खरा सूर्य न पाहिलेला डबक्यातल्या प्रतिबिंबालाच सूर्य मानतो; झोपलेल्याला स्वप्न खरे वाटते, दोरीला साप वाटतो, कावीळ झालेल्याला चंद्र पिवळा दिसतो. तसाच देहालाच आत्मा मानणारा माणूस स्वतःभोवती कर्माच्या गाठी बांधून देहाच्या बंदीशाळेत अडकतो.

ओवी ३९५ ते ४०२ मध्ये उलट चित्र दिसते. आत्मस्वरूपात स्थिर झालेल्याला कर्मांच्या मध्ये असूनही कर्म स्पर्श करत नाही. दिव्याच्या उजेडात आपलीच वस्तू सापडावी, मीठ पाण्यात मिसळून पाणीच व्हावे, तसा तो आपल्या स्वरूपाशी एकरूप होतो.

ओवी ४०३ ते ४१२ मध्ये अज्ञानाच्या झोपेतला जीव महावाक्य आणि गुरुकृपेच्या थापटीने जागा होतो. चांदणे पसरताच मृगजळ नाहीसे व्हावे, तशी अहंता आणि ममता उरत नाही. आग ज्याला लागते ते आगच होते, तसे तो जे पाहतो ते त्याचेच रूप होते.

ओवी ४१३ ते ४२१ मध्ये सांगितले आहे की असा पुरुष देहात बांधला जात नाही. काढलेले लोणी ताकात परत मिसळत नाही, लाकडातून निघालेला अग्नी लाकडात राहत नाही, रात्रीतून उगवलेला सूर्य रात्रीचे ऐकत नाही.

ओवी ४२२ ते ४३८ मध्ये देह असेपर्यंत कर्मे कशी चालतात ते येते. वारा थांबला तरी झाड काही काळ हलते, सूर्य मावळला तरी संधिप्रकाश टिकतो, कुंभाराचे चाक फिरत राहते. पाच कारणे जुन्या संस्कारांनी आपोआप काम करतात. जागा झालेला स्वप्न पाहत नाही, तसा विदेहदृष्टीचा पुरुष जगाच्या उलथापालथीत अलिप्त राहतो. सामान्य डोळ्यांना तो कर्ता वाटतो, जसा कोल्हा शेतातल्या गवताच्या पुतळ्याला खरा राखणदार समजतो.

अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग
इतर अध्याय
ज्ञानेश्वरी – सूची आणि परिचय
संसाधने (Resources)
अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग
इतर अध्याय
ज्ञानेश्वरी – सूची आणि परिचय
संबंधित संत
Scroll to Top