दासबोध – दशक ८ समास ७ (ओवी १–६६)

लेखक
समर्थ रामदास स्वामी
काळ
१७ वे शतक
अध्याय / भाग
दशक ८ · भाग ७
भाषा
मराठी
॥ श्री गणेशाय नमः ॥

सहाव्या समासाच्या शेवटी श्रोत्याने विचारले होते की, मोक्ष नेमका कसा असतो आणि सत्संगाने तो कसा मिळतो? आठव्या दशकाच्या या सातव्या समासात समर्थ रामदास स्वामी मोक्षाचे अत्यंत स्पष्ट आणि अनुभवसिद्ध लक्षण सांगतात. सहासष्ट ओव्यांच्या आणि दोन संस्कृत श्लोकांच्या या समासाचे नाव मोक्षलक्षण असे आहे.

माणसाला दुसरे कोणीही बांधलेले नाही, तर मी जीव आहे, मला पाप-पुण्य भोगावे लागेल आणि जन्म-मरण चुकेना, या स्वतःच्याच संकल्पाने तो बद्ध झाला आहे, हे समर्थ समजावतात. अनेक जण सकाम दानाचा ढीग लावून पुढच्या जन्मी चांगले सुख मिळावे अशी दुराशा धरतात; पण आत्मज्ञानाशिवाय हा नरदेह सुटल्यावर पुन्हा चौऱ्यांशी लक्ष योनींतच भटकावे लागते, असा गंभीर इशारा समर्थ देतात.

जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा हे चार आत्मे घटाकाश-मठाकाशाच्या उपमेने एकच कसे आहेत, हे दाखवून समर्थ सिद्ध करतात की, स्वप्नातले बंधन जसे जागे झाल्यावर तुटते, तसेच आत्मज्ञानाने तत्काळ मोक्ष मिळतो. आपण स्वतःच अलिप्त आणि निर्मळ आत्मा आहोत, हा साक्षात्कार इथे सहजपणे होतो.

॥ श्रीराम ॥

मागां श्रोतयांचा पक्ष । कितां दिवसां होतो मोक्ष ।
तेचि कथा श्रोते दक्ष । होऊन ऐका ॥ १॥

मोक्षास कैसें जाणावें । मोक्ष कोणास म्हणावें ।
संतसंगें पावावें । मोक्षास कैसें ॥ २॥

तरी बद्ध म्हणिजे बांधला । आणि मोक्ष म्हणिजे मोकळा जाला ।
तो संतसंगें कैसा लाधला । तेंचि ऐका ॥ ३॥

प्राणी संकल्पें बांधला । जीवपणें बद्ध जाला ।
तो विवेकें मुक्त केला । साधुजनीं ॥ ४॥

मी जीव ऐसा संकल्प । दृढ धरितां गेले कल्प ।
तेणें प्राणी जाला अल्प । देहबुद्धीचा ॥ ५॥

मी जीव मज बंधन । मज आहे जन्ममरण ।
केल्या कर्माचें फळ आपण । भोगीन आतां ॥ ६॥

पापाचें फळ तें दुःख । आणी पुण्याचें फळ तें सुख ।
पापपुण्य अवश्यक । भोगणें लागे ॥ ७॥

पापपुण्य भोग सुटेना । आणी गर्भवासहि तुटेना ।
ऐसी जयाची कल्पना । दृढ जाली ॥ ८॥

तया नाव बांधला। जीवपणें बद्ध जाला ।
जैसा स्वयें बांधोन कोसला । मृत्यु पावे ॥ ९॥

तैसा प्राणी तो अज्ञान । नेणें भगवंताचें ज्ञान ।
म्हणे माझें जन्ममरण । सुटेचिना ॥ १०॥

आतां कांहीं दान करूं । पुढिलया जन्मास आधारु ।
तेणें सुखरूप संसारु । होईल माझा ॥ ११॥

पूर्वीं दान नाहीं केलें । म्हणोन दरिद्र प्राप्त जालें ।
आतां तरी कांहीं केलें । पाहिजे कीं ॥ १२॥

म्हणौनी दिलें वस्त्र जुनें । आणी येक तांब्र नाणें ।
म्हणे आतां कोटिगुणें । पावेन पुढें ॥ १३॥

कुशावर्तीं कुरुक्षेत्रीं । महिमा ऐकोन दान करी ।
आशा धरिली अभ्यांतरीं । कोटिगुणांची ॥ १४॥

रुका आडका दान केला । अतितास टुक्डा घातला ।
म्हणे माझा ढीग जाला । कोटि टुकड्यांचा ॥ १५॥

तो मी खाईन पुढिलिये जन्मीं । ऐसें कल्पीं अंतर्यामीं ।
वासना गुंतली जन्मकर्मीं । प्राणीयांची ॥ १६॥

आतां मी जें देईन । तें पुढिले जन्मीं पावेन ।
ऐसें कल्पी तो अज्ञान । बद्ध जाणावा ॥ १७॥

बहुतां जन्माचे अंतीं । होये नरदेहाची प्राप्ती ।
येथें न होतां ज्ञानें सद्गेती । गर्भवस चुकेना ॥ १८॥

गर्भवास नरदेहीं घडे । ऐसें हें सर्वथा न घडे ।
अकस्मात भोगणें पडे । पुन्हा नीच योनी ॥ १९॥

ऐसा निश्चयो शास्त्रांतरीं । बहुतीं केला बहुतांपरीं ।
नरदेह संसारीं । परम दुल्लभ असे ॥ २०॥

पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे ।
येरवीं हा जन्म न घडे । हें व्यासवचन भागवतीं ॥ २१॥

नरदेह दुल्लभ । अल्प संकल्पाचा लाभ ।
गुरु कर्णधारी स्वयंभ । सुख पाववी ॥ २२॥

दैव अनुकुळ नव्हे जया । स्वयें पापी तो प्राणीया ।
भवब्धी न तरवे तया । आत्महत्यारा बोलिजे ॥ २३॥

ज्ञानेंविण प्राणीयांसी । जन्ममृत्य लक्ष चौयासी ।
तितुक्या आत्महत्या त्यासी । म्हणोन आत्महत्यारा ॥ २४॥

नरदेहीं ज्ञानेंविण । कदा न चुके जन्ममरण ।
भोगणें लागती दारुण । नाना नीच योनी ॥ २५॥

रीस मर्कट श्वान सूकर । अश्व वृषभ म्हैसा खर ।
काक कुर्कूट जंबुक मार्जर । सरड बेडुक मक्षिका ॥ २६॥

इत्यादिक नीच योनी । ज्ञान नस्तां भोगणें जनीं ।
आशा धरी मुर्ख प्राणी ॥ पुढिलिया जन्माची ॥ २७॥

हा नरदेह पडतां । तोंचि पाविजे मागुतां ।
ऐसा विश्वास धरिजां । लाज नाहीं ॥ २८॥

कोण पुण्याच संग्रहू । जे पुन्हा पाविजे नरदेहो ।
दुराशा धरिली पाहो । पुढिलिया जन्माची ॥ २९॥

ऐसा मुर्ख अज्ञान जन । केलें संकल्पें बंधन ।
शत्रु आपणासि आपण । होऊन ठेला ॥ ३०॥

ऐसे संकल्पाचें बंधन । संतसंगे तुटे जाण ।
ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३१॥

पांचा भूतांचें शरीर । निर्माण जालें सचराचर ।
प्रकृतिस्वभावें जगदाकार । वर्तों लागे ॥ ३२॥

देह अवस्ता अभिमान । स्थानें भोग मात्रा गुण ।
शक्ती आदिकरुन लक्षण । चौपुटी तत्वांचें ॥ ३३॥

ऐसी पिंडब्रह्मांड रचना । विस्तारें वाढली कल्पना ।
निर्धारितां तत्वज्ञाना । मतें भांबावलीं ॥ ३४॥

नाना मतीं नाना भेद । भेदें वाढती वेवाद ।
परी तो ऐक्यतेचा संवाद । साधु जाणती ॥ ३५॥

तया संवादाचे लक्षण । पंचभूतिक देह जाण ।
त्या देहामधें कारण । आत्मा वोळखावा ॥ ३६॥

देह अंती नासोन जाये । त्यास आत्मा म्हणों नये ।
नाना तत्वांचा समुदाय । देहामधें आला ॥ ३७॥

अंतःकर्ण प्राणादिक । विषये इंद्रियें दशक ।
हा सूक्ष्माच विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ ३८॥

घेतां सूक्ष्माची शुद्धी । भिन्न अंतःकरण मन बुद्धी ।
नाना तत्वांचे उपाधी । वेगळा आत्मा ॥ ३९॥

स्थूळ सूक्ष्म कारण । माहाकारण विराट हिरण्य ।
अव्याकृत मूळप्रकृति जाण । ऐसे अष्टदेह ॥ ४०॥

च्यारी पिंडी च्यारी ब्रह्मांडीं । ऐसी अष्टदेहाची प्रौढी ।
प्रकृती पुरुषांची वाढी । दशदेह बोलिजे ॥ ४१॥

ऐसें तत्वांचे लक्षण । आत्मा साक्षी विलक्षण ।
कार्य कर्ता कारण । दृश्या तयाचें ॥ ४२॥

जीवशिव पिंडब्रह्मांड । मायेअविद्येचें बंड ।
हें सांगता असे उदंड । परी आत्मा तो वेगळा ॥ ४३॥

पाहों जातां आत्मे च्यारी । त्यांचे लक्षण अवधारीं ।
हें जाणोनि अभ्यांतरीं । सदृढ धरावें ॥ ४४॥

एक जीवात्मा दुसरा शिवात्मा । तिसरा परमात्मा जो विश्वात्मा ।
चौथा जाणिजे निर्मळात्मा । ऐसे च्यारी आत्मे ॥ ४५॥

भेद उंच नीच भासती । परी च्यारी एकचि असती ।
येविषीं दृष्टांत संमती। सावध ऐका ॥ ४६॥

घटाकाश मठाकाश । महदाकाश चिदाकाश ।
अवघे मिळोन आकाश । येकचि असे ॥ ४७॥

तैसा जीवात्मा आणि शिवात्मा । परमात्मा आणी निर्मळाता ।
अवघा मिळोन आत्मा । येकचि असे ॥ ४८॥

घटीं व्यापक जें आकाश । तया नाव घटाकाश ।
पिंडी व्यापक ब्रह्मांश । त्यास जीवात्मा बोलिजे ॥ ४९॥

मठीं व्यापक जें आकाश । तया नाव मठाकाश ।
तैसा ब्रह्मांडीं जो ब्रह्मांश । त्यास शिवात्मा बोलिजे ॥ ५०॥

मठाबाहेरील आकाश । तयाअ नांव महदाकाश ।
ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश । त्यास परमात्मा बोलिजे ॥ ५१॥

उपधीवेगळें आकाश । तया नाव चिदाकाश ।
तैसा निर्मळात्मा परेश । तो उपधिवेगळा ॥ ५२॥

उपाधियोगें वाटे भिन्न । परी तें आकाश अभिन्न ।
तैसा अत्मा स्वानंदघन । येकचि असे ॥ ५३॥

दृश्या सबाह्य अंतरीं । सूक्ष्मात्मा निरंतरीं ।
त्याचि वर्णावया थोरी । शेष समर्थ नव्हे ॥ ५४॥

ऐसे आत्म्याचें लक्षण । जाणतां नाहीं जीवपण ।
उपाधी शोधतां अभिन्न । मुळींच आहे ॥ ५५॥

जीवपणें येकदेसी । अहंकारें जन्म सोसी ।
विवेक पाहतां प्राणीयांसी । जन्म कैंचा ॥ ५६॥

जन्ममृत्यापासून सुटला । या नाव जाणिजे मोक्ष जाला ।
तत्वें शोधितां पावला । तत्वता वस्तु ॥ ५७॥

तेचि वस्तु ते आपण । हें माहावाक्याचें लक्षण ।
साधु करीती निरूपण । आपुलेन मुखें ॥ ५८॥

जेचि क्षणी अनुग्रह केला । तेचि क्षणीं मोक्ष जाला ।
बंधन कांहीं आत्मयाला । बोलोंचि नये ॥ ५९॥

आतां आशंका फिटली । संदेहवृत्ती मावळली ।
संतसंगें तत्काळ जाली । मोक्षपदवी ॥ ६०॥

स्वप्नामधें जो बांधला । तो जागृतीनें मोकळा केला ।
ज्ञानविवेकें प्राणीयाला । मोक्षप्राप्ती ॥ ६१॥

अज्ञाननिसीचा अंतीं । संकल्पदुःखें नासती ।
तेणें गुणें होये प्राप्ती । तत्काळ मोक्षाची ॥ ६२॥

तोडावया स्वप्नबंधन । नलगे आणिक साधन ।
तयास प्रेत्न जागृतीवीण । बोलोंचि नये ॥ ६३॥

तैसा संकल्पें बांधला जीव । त्यास आणिक नाही उपाव ।
विवेक पाहतां वाव । बंधन होये ॥ ६४॥

विवेक पाहिल्याविण । जो जो उपाव तो तो सीण ।
विवेक पाहातां आपण । आत्माच असे ॥ ६५॥

आत्मयाचा ठांई कांहीं । बद्ध मोक्ष दोनी नाहीं ।
जन्ममृत्य हें सर्वहि । आत्मत्वीं न घडे ॥ ६६॥

समासाचा सार

समासाच्या एक ते तिसाव्या ओवीत समर्थ बद्ध जीवाची मानसिकता उलगडतात. अज्ञानी माणूस जुने वस्त्र आणि तांब्याचे नाणे देऊन पुढच्या जन्मी कोटिपट सुख मिळेल अशी आशा बाळगतो. पण सद्गुरूंशिवाय या नरदेहाचा भवसागर न तरणारा जीव आत्महत्यारा ठरतो, असे भागवतातील श्लोकाचा आधार देऊन समर्थ सांगतात. ज्ञान नसेल तर रानडुक्कर, कुत्रा, गाढव, कावळा अशा नीच योनींत जन्म घ्यावा लागतो; तरीही माणूस पुढच्या जन्माची दुराशा धरतो आणि स्वतःच स्वतःचा शत्रू बनतो.

एकतीस ते छप्पन्नाव्या ओवीत या संकल्पाचे बंधन तोडण्यासाठी तत्त्वविवेक सांगितला आहे. चार पिंडीचे आणि चार ब्रह्मांडाचे असे आठ देह, किंवा दहा देह असूनही आत्मा त्या सर्वांहून वेगळा साक्षी आहे. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा हे जणू घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश यांसारखे उपाधीमुळे वेगळे भासतात, पण मुळात एकच आहेत. जीवपणाची अहंता सोडली की जन्म-मरण उरत नाही.

सत्तावन्न ते सहासष्टाव्या ओवीत समर्थ मोक्षाचा थेट अनुभव सांगतात. सद्गुरूंनी तत्त्वमसि महावाक्याचा अनुग्रह दिला की त्याच क्षणी मोक्ष होतो. झोपेतला कैदी जागे झाल्यावर जसा मुक्त होतो, तसा विवेक जागताच संकल्पाचे बंधन गळून पडते. स्वप्नातले बंधन तोडायला जागे होण्याशिवाय जसा दुसरा उपाय नाही, तसा संकल्प सोडण्याशिवाय मोक्षाचा अन्य मार्ग नाही. विवेकाविना केलेले सर्व उपाय केवळ श्रम ठरतात. आत्म्याच्या ठिकाणी बद्धताही नाही आणि मोक्षही नाही; जन्म-मृत्यू ही केवळ अज्ञानाची कल्पना आहे, या निश्चयाने हा सातवा समास पूर्ण होतो आणि साधकाच्या मनातील सर्व भीती व संदेह कायमचा नाहीसा होतो.

संसाधने (Resources)
Scroll to Top