दासबोध – दशक ८ समास १० (ओवी १–८२)

लेखक
समर्थ रामदास स्वामी
काळ
१७ वे शतक
अध्याय / भाग
दशक ८ · भाग १०
भाषा
मराठी
॥ श्री गणेशाय नमः ॥

आठव्या दशकाच्या या शेवटच्या दहाव्या समासात समर्थ रामदास स्वामी जगाच्या आणि साधकांच्या विविध मतांचा एक अद्भुत कोलाहल आपल्यासमोर उभा करतात. ब्याऐंशी ओव्यांच्या या शून्यत्वनिरसन समासात, कोणी म्हणतो संसार करावा तर कोणी म्हणतो वैराग्य घ्यावे, कोणी तीर्थयात्रा तर कोणी कीर्तन, कोणी तंत्र-मंत्र तर कोणी केवळ पोटाची भाकरी श्रेष्ठ मानतो—असे समाजातील चाळीस ओव्यांइतके विविध प्रवाह समर्थ मांडतात.

त्यानंतर ज्ञानियांच्या तीन मुख्य अनुभवांची ते चर्चा करतात: पहिला साक्षी व द्रष्टा होण्याचा अनुभव, दुसरा सर्व काही ब्रह्मच आहे हा अभेद अनुभव, आणि तिसरा म्हणजे सर्व दृश्य बाजूला सारून काहीच नाही तेच ब्रह्म मानण्याचा अनुभव—म्हणजेच शून्यत्व! अनेक साधक या शून्यत्वालाच परब्रह्म मानून तिथेच अडकतात.

राजा न ओळखता सेवकालाच राजा मानणे जसे व्यर्थ आहे, तसे शून्यत्वाला ब्रह्म मानणे चूक आहे; शून्यत्व आणि मूळमाया ओलांडून स्वतः वस्तुरूप होणे हाच खरा ज्ञानदशकाचा शेवट होय, असा मोलाचा, सखोल आणि अनुभवसिद्ध संदेश समर्थ या समासातून सर्व मुमुक्षू व साधकांना प्रेमाने देतात.

॥ श्रीराम ॥

जनाचे अनुभव पुसतां । कळहो उठिल अवचिता ।
हा कथाकल्लोळ श्रोतां । कौतुकें ऐकावा ॥ १॥

येक म्हणती हा संसारु । करितां पाविजे पैलपारु ।
आपला नव्हे कीं जोजारु । जीव देवाचे ॥ २॥

येक म्हणती हें न घडे । लोभ येऊन आंगीं जडे ।
पोटस्तें करणें घडे । सेवा कुटुंबाची ॥ ३॥

येक म्हणती स्वभावें । संसार करावा सुखें नावें ।
कांहीं दान पुण्य करावें । सद्ग तीकारणें ॥ ४॥

येक म्हणती संसार खोटा । वैराग्यें घ्यावा देशवटा ।
येणें स्वर्ग्यलोकींच्या वाटा । मोकळ्या होती ॥ ५॥

येक म्हणती कोठें जावें । वेर्थचि कासया हिंडावें ।
आपुलें आश्रमी असावें । आश्रमधर्म करूनी ॥ ६॥

येक म्हणती कैंचा धर्म । अवघा होतसे अधर्म ।
ये संसारीं नाना कर्म । करणें लागे ॥ ७॥

येक म्हणती बहुतांपरी । वासना असावी वरी ।
येणेंचि तरिजे संसारीं । अनायासें ॥ ८॥

येक म्हणती कारण भाव । भावेंचि पाविजे देव ।
येर हें अवघेंचि वाव । गथागोवी ॥ ९॥

येक म्हणती वडिलें जीवीं । अवघीं देवचि मानावीं ।
मायेबापें पूजीत जावीं । येकाभावें ॥ १०॥

येक म्हणती देवब्राह्मण । त्यांचें करावें पूजन ।
मायेबाप नारायेण । विश्वजनाचा ॥ ११॥

येक म्हणती शास्त्र पाहावें । तेथें निरोपिलें देवें ।
तेणें प्रमाणेंचि जावें । परलोकासी ॥ १२॥

येक म्हणती अहो जना । शास्त्र पाहातां पुरवेना ।
याकारणें साधुजना । शरण जावें ॥ १३॥

येक म्हणती सांडा गोठी । वायांचि करिता चाउटी ।
सर्वांस कारण पोटीं । भूतदया असावी ॥ १४॥

येक म्हणती येकचि बरवें । आपुल्या आचारें असावें ।
अंतकाळीं नाम घ्यावें । सर्वोत्तमाचें ॥ १५॥

येक म्हणती पुण्य असेल । तरीच नाम येईल ।
नाहीं तरी भुली पडेल । अंतकाळीं ॥ १६॥

येक म्हणती जीत असावे । तंवचि सार्थक करावें ।
येक म्हणती फिरावें । तिर्थाटण ॥ १७॥

येक म्हणती हे अटाटी । पाणीपाषाणाची भेटी ।
चुबकळ्या मारितां हिंपुटी । कासाविस व्हावें ॥ १८॥

येक म्हणती सांडी वाचाळी । अगाध महिमा भूमंडळीं ।
दर्शनमात्रें होय होळी । माहापातकाची ॥ १९॥

येक म्हणती तीर्थ स्वभावें । कारण मन अवरावें ।
येक म्हणती कीर्तन करावें । सावकास ॥ २०॥

येक म्हणती योग बरवा । मुख्य तोचि आधीं साधावा ।
देहो अमरचि करावा । अकस्मात ॥ २१॥

येक म्हणती ऐसें काये । काळवंचना करूं नये ।
येक म्हणती धरावी सोये । भक्तिमार्गाची ॥ २२॥

येक म्हणती ज्ञान बरवें । येक म्हणती साधन करावें ।
येक म्हणती मुक्त असावें । निरंतर ॥ २३॥

येक म्हणती अनर्गळा । धरीं पापाचा कंटाळा ।
येक म्हणती रे मोकळा । मार्ग आमुचा ॥ २४॥

येक म्हणती हें विशेष । करूं नये निंदा द्वेष ।
येक म्हणती सावकास । दुष्टसंग त्यागावा ॥ २५॥

येक म्हणती ज्याचें खावें । त्या सन्मुखचि मरावें ।
तेणें तत्काळचि पावावें । मोक्षपद ॥ २६॥

येक म्हणती सांडा गोठी । आधीं पाहिजे ते रोटी ।
मग करावी चाउटी । सावकास ॥ २७॥

येक म्हणती पाउस असावा । मग सकळ योग बरवा ।
कारण दुष्काळ न पडावा । म्हणिजे बरें ॥ २८॥

येक म्हणती तपोनिधी । होतां वोळती सकळ सिद्धी ।
येक म्हणती रे आधीं । इंद्रपद साधावें ॥ २९॥

येक म्हणती आगम पाहावा । वेताळ प्रसन्न करून घ्यावा ।
तेणें पाविजे देवा । स्वर्गलोकीं ॥ ३०॥

येक म्हणती अघोरमंत्र । तेणें होईजे स्वतंत्र ।
श्रीहरी जयेचा कळत्र । तेचि वोळे ॥ ३१॥

ती लागले सर्व धर्म । तेथें कैंचें क्रियाकर्म ।
येक म्हणती कुकर्म । तिच्या मदे ॥ ३२॥

येक म्हणती येक साक्षप । करावा मृत्यंजयाचा जप ।
तेणें गुणें सर्व संकल्प । सिद्धीतें पावती ॥ ३३॥

येक म्हणती बटु भैरव । तेणें पाविजे वैभव ।
येक म्हणती झोटिंग सर्व । पुर्वितसे ॥ ३४॥

येक म्हणती काळी कंकाळी । येक म्हणती भद्रकाळी ।
येक म्हणती उचिष्ट चांडाळी । साहें करावी ॥ ३५॥

येक म्हणती विघ्नहर । येक म्हणती भोळा शंकर ।
येक म्हणती सत्वर । पावे भगवती ॥ ३६॥

येक म्हणती मल्लारी । सत्वरचि सभाग्य करी ।
येक म्हणती माहा बरी । भक्ति वेंकटेशाची ॥ ३७॥

येक म्हणती पूर्व ठेवा । येक म्हणती प्रेत्न करावा ।
येक म्हणती भार घालावा । देवाच वरी ॥ ३८॥

येक म्हणती देव कैंचा । अंतचि पाहातो भल्यांचा ।
येक म्हणती हा युगाचा । युगधर्म ॥ ३९॥

येक आश्चीर्य मानिती । येक विस्मयो करिती ।
येक कंटाळोन म्हणती । काये होईल तें पाहावें ॥ ४०॥

ऐसे प्रपंचिक जन । लक्षणें सांगतां गहन ।
परंतु कांहीं येक चिन्ह । अल्पमात्र बोलिलों ॥ ४१॥

आतां असो हा स्वभाव । ज्ञात्यांचा कैसा अनुभव ।
तोहि सांगिजेल सर्व । सावध ऐका ॥ ४२॥

येक म्हणती करावी भक्ती । श्रीहरी देईल सद्गती ।
येक म्हणती ब्रह्मप्राप्ती । कर्मेंचि होये ॥ ४३॥

येक म्हणती भोग सुटेना । ज्न्ममरण हें तुटेना ।
येक म्हणती उर्मी नाना । अज्ञानाच्या ॥ ४४॥

येक म्हणती सर्व ब्रह्म । तेथें कैंचें क्रियाकर्म ।
येक म्हणती हा अधर्म । बोलोंचि नये ॥ ४५॥

येक म्हणती सर्व नासें । उरलें तेंचि ब्रह्म असे ।
येक म्हणती ऐसें नसे । समाधान ॥ ४६॥

सर्वब्रह्म केवळ ब्रह्म । दोनी पूर्वपक्षाचे भ्रम ।
अनुभवाचें वेगळें वर्म । म्हणती येक ॥ ४७॥

येक म्हणती हें न घडे । अनुर्वाच्य वस्तु घडे ।
जें बोलतां मोन्य पडे । वेदशास्त्रांसी ॥ ४८॥

तव श्रोता अनुवादला । म्हणे निश्चये कोण केला ।
सिद्धांतमतें अनुभवाला । उरी कैंची ॥ ४९॥

अनुभव देहीं वेगळाले । हें पूर्वीच बोलिलें ।
आतां कांहीं येक केलें । नवचे कीं ॥ ५०॥

येक साक्षत्वें वर्तती । साक्षी वेगळाचि म्हणती ।
आपण दृष्टा ऐसी स्थिती । स्वानुभवाची ॥ ५१॥

दृश्यापासून द्रष्टा वेगळा । ऐसी अलिप्तपणाची कळा ।
आपण साक्षत्वें निराळा । स्वानुभवे ॥ ५२॥

सकळ पदार्थ जाणतां । तो पदार्थाहून पर्ता ।
देहीं असोनी अलिप्तता । सहजचि जाली ॥ ५३॥

येक ऐसें स्वानुभवें । म्हणती साक्षत्वें वर्तावें ।
दृश्य असोनि वेगळें व्हावें । द्रष्टेपणें ॥ ५४॥

येक म्हणती नाहीं भेद । वस्तु ठाईंची अभेद ।
तेथें कैंचा मतिमंद द्रष्टा आणिला ॥ ५५॥

अवघी साकरचि स्वभावें । तेथें कडु काय निवडावें ।
द्रष्टा कैंचा स्वानुभवें । अवघेंचि ब्रह्म ॥ ५६॥

प्रपंच परब्रह्म अभेद । भेदवादी मानिती भेद ।
परी हा आत्मा स्वानंद । आकारला ॥ ५७॥

विघुरलें तुप थिजलें । तैसें निर्गुणचि गुणा आलें ।
तेथें काय वेगळें केलें । द्रष्टेपणें ॥ ५८॥

म्हणौनि द्रष्टा आणी दृश्य । अवघा येकचि जगदीश ।
द्रष्टेपणाचे सायास । कासयासी ॥ ५९॥

ब्रह्मचि आकारलें सर्व । ऐसा येकांचा अनुभव ।
ऐसे हे दोनी स्वभाव । निरोपिले ॥ ६०॥

अवघा आत्मा आकाराअ । आपण भिन्न कैंचा उरला ।
दुसरा अनुभव बोलिला । ऐसियापरी ॥ ६१॥

ऐक तिसरा अनुभव । प्रपंच सारूनियां सर्व ।
कांहीं नाहीं तोचि देव । ऐसें म्हणती ॥ ६२॥

दृश्य अवघें वेगळें केलें । केवळ अदृश्यचि उरलें ।
तेंचि ब्रह्म अनुभविलें । म्हणती येक ॥ ६३॥

परी तें ब्रह्म म्हणों नये । उपायासारिखा अपाये ।
सुन्यत्वास ब्रह्म काये । म्हणों येईल ॥ ६४॥

दृश्य अवघें वोलांडिलें । अदृश्य सुन्यत्वीं पडिलें ।
ब्रह्म म्हणौनि मुरडलें । तेथुनिच मागे ॥ ६५॥

इकडे दृश्य तिकडे देव । मध्यें सुन्यत्वाचा ठाव ।
तयास मंदबुद्धिस्तव । प्राणी ब्रह्म म्हणे ॥ ६६॥

रायास नाहीं वोळखिलें । सेवकास रावसें कल्पिलें ।
परी तें अवघें वेर्थ गेलें । राजा देखतां ॥ ६७॥

तैसें सुन्यत्व कल्पिलें ब्रह्म । पुढें देखतां परब्रह्म ।
सुन्यत्वचा अवघा भ्रम । तुटोन गेला ॥ ६८॥

परी हा सूक्ष्म आडताळा । वारी विवेकें वेगळा ।
जैसें दुग्ध घेऊन जळा । राजहंस सांडी ॥ ६९॥

आधीं दृश्या सोडिलें । मग सुन्यत्व वोलांडिलें ।
मूळमायेपरतें देखिलें । परब्रह्म ॥ ७०॥

वेगळेपणें पाहाणें घडे । तेणें वृत्ति सुन्यत्वीं पडे ।
पोटीं संदेह पवाडे । सुन्यत्वाचा ॥ ७१॥

भिन्नपणें अनुभविलें । तयास सुन्य ऐसें बोलिलें ।
वस्तु लक्षितां अभिन्न जालें । पाहिजे आधीं ॥ ७२॥

वस्तु आपणचि होणें । ऐसें वस्तुचें पाहाणें ।
निश्चयेंसीं भिन्नपणें । सुन्यत्व लाभे ॥ ७३॥

याकारणें सुन्य कांहीं । परब्रह्म होणार नाहीं ।
वस्तुरूप होऊन पाहीं । स्वानुभवें ॥ ७४॥

आपण वस्तु सिद्धचि आहे । मन मी ऐसें कल्पूं नये ।
साधु सांगती उपाये । तूंचि आत्मा ॥ ७५॥

मन मी ऐसें नाथिलें । संतीं नाहीं निरोपिलें ।
मानावें कोणाच्या बोलें । मन मी ऐसें ॥ ७६॥

संतवचनीं ठेवितां भावे । तोचि शुद्ध स्वानुभव ।
मनाचा तैसाच स्वभाव । आपण वस्तु ॥ ७७॥

जयाचा घ्यावा अनुभव । तोचि आपण निरावेव ।
आपुला घेती अनुभव । विश्वजन ॥ ७८॥

लोभी धन साधूं गेले । तंव ते लोभी धनचि जाले ।
मग भाग्यपुरुषीं भोगिलें । सावकास ॥ ७९॥

तैसें देहबुद्धी सोडितां । साधकास जालें तत्वता ।
अनुभवाची मुख्य वार्ता । ते हे ऐसी ॥ ८०॥

आपण वस्तु मुळीं येक । ऐसा ज्ञानाचा विवेक ।
येथून हा ज्ञानदशक । संपूर्ण जाला ॥ ८१॥

आत्मज्ञान निरोपिलें । येथामतीनें बोलिलें ।
न्यूनपर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ८२॥

समासाचा सार

समासाच्या एक ते बेचाळीसाव्या ओवीत समर्थ प्रपंचिक लोकांच्या मतांची मोठी मालिका मांडतात. कोणी देव-ब्राह्मण पूजतात, कोणी भूतदया मानतात, कोणी तीर्थाटनाला दगडपाण्याची भेट म्हणतात तर कोणी ते पावन मानतात; कोणी अघोर मंत्र-जपाची आशा धरतात तर कोणी चांगला पाऊस पडून दुष्काळ टळावा एवढेच मागतात.

त्रेचाळीस ते एकसष्टाव्या ओवीत समर्थ ज्ञानियांच्या मतांतील फरक दाखवतात. कोणी स्वतःला दृश्यापासून वेगळा साक्षी द्रष्टा मानतात; तर कोणी साखरेत कडू काय निवडायचे, असे म्हणत सर्व ब्रह्मच असल्याचा अभेद अनुभव घेतात. बासष्ट ते बहात्तराव्या ओवीत तिसऱ्या अनुभवाचे खंडन येते: सर्व दृश्य बाजूला सारल्यावर जे अदृश्य शून्य उरते, त्यालाच मंदबुद्धीने लोक ब्रह्म मानतात; पण ते परब्रह्म नसून मधला अडथळा आहे. राजहंस जसा दुधातून पाणी वेगळे करतो, तसे विवेकाने दृश्य आणि शून्यत्व दोन्ही ओलांडून मूळमायेपलीकडचे परब्रह्म पाहावे.

तेहत्तर ते ब्याऐंशीव्या ओवीत समर्थ अंतिम बोध देतात. वेगळेपणाने पाहिल्यामुळे शून्यत्व येते; पण मी मन नसून स्वतः वस्तुरूप आत्मा आहे, हा संतांचा विश्वास धरला की साधक स्वतःच वस्तुरूप होतो. लोभी माणसे धन साधायला जाऊन जशी धनवान होतात आणि भाग्यवंत ते भोगतात, तसे देहबुद्धी सोडताच साधक आत्मस्वरूप होतो. आपण मुळात एकच वस्तू आहोत, या ज्ञानाच्या विवेकाने इथे हा आठवा ज्ञानदशक पूर्ण होतो. शेवटी समर्थ श्रोत्यांना अत्यंत नम्रपणे विनंती करतात की, यथामतीने सांगितलेले हे आत्मज्ञान ऐकून त्यातील न्यूनपूर्ण क्षमा करावे आणि स्वतः अखंड व निश्चळ स्वानुभव घ्यावा. या दशकाच्या परिशीलनाने सर्व संशयांचा नाश होऊन मुमुक्षूंना सत्य परमात्मतत्त्वाची स्पष्ट व अचूक दिशा मिळते.

संसाधने (Resources)
Scroll to Top