ग्रामगीता अध्याय पंधरावा

ग्रामगीता

ग्रामगीता अध्याय पंधरावा

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

एका श्रोतियाने प्रश्न केला । दुधाचा तर दुष्काळचि पडला । कुठलें ताकलोणी सकळांला । गोमातेचें ? ॥१॥
दूध देणारे लबाडी करिती । म्हशीच्या दुधांत पाणी घालती । गायीचें म्हणोन विकती । अधिक भाव घेवोनि ॥२॥
कोठे गायी राहिल्या आता ? तुरळक दिसती विकतां वाचतां । वधती चपलाजोडयांकरिता । वासरेंहि करोडो ॥३॥
गोपालांचा देश भारत । आला गायीगुरें पूजीत । परंतु गायी झाल्या खात । लक्षचि नाही तयांकडे ॥४॥
त्यांतील कांही कसाब घेती । कांही दुसरीकडे नेती । उरल्या त्या कचरा असती । गायी सार्‍या ॥५॥
चारापाणी अति महाग । नाही व्यवस्थेसाठी मार्ग । मानवचि अर्धपोटी, मग । गायी कैशा पाळाव्या ? ॥६॥
ऐकोनि त्याचें विशद विवरण । म्हणालों तुमचें म्हणणें मान्य । परि यांत आपुलाचि संपूर्ण । दोष आहे ॥७॥
भारत कृषिप्रधान देश । शेतीसाठी हवा गोवंश । गोरसा इतुका नसे सत्वांश । अन्यत्र शुध्द ॥८॥
म्हणोनि गोवंश सुखी होता । तोंवरि नव्हती दरिद्रता । नव्हती ऐसी विपुलता । रोगराईची ॥९॥
गोमय गोमूत्र मिळोनि रात्रंदिस । कायम होता भूमीचा कस । पेवें भरती गांवागांवास । धान्याचीं तेव्हा ॥१०॥
भूमि आणि जनावरें । हींच उत्पत्तीचीं कोठारें । एकाचीं अनेक होतीं खिल्लारें । जोडधंदा हा घरोघरीं ॥११॥
घरोघरीं दूधदुभतें । अन्नधान्यासि सहायक तें । आबालवृध्द राहत होते । सशक्त आणि निरोगी ॥१२॥
म्हणोनि गायीगुरां ’ गोधन ’ । ऐसें सत्य नामाभिधान । सुखी होता भारत संपूर्ण । गोवंशा सुखवोनिया ॥१३॥
परि पुढे झालें दुर्लक्ष । कांही भोवला राज्यपक्ष । गायी होऊनि बसल्या भक्ष्य । वाढलें दुर्भिक्ष त्यागुणें ॥१४॥
आपण दुधाळ म्हशीकडे गेलों । चहाकॉफी आदि पिऊं लागलों । म्हणोनि गायीसमेत मुकलों । सर्वस्वासि ॥१५॥
प्राणी खावोन एकदा तोषला । तो नित्यासाठी त्यास मुकला । मग कुठलें दुभतें, संतान, खतादि त्याला ? ऐसें केलें वेडयापरी ॥१६॥
गायी विकोनि पोट भरलें । मग नित्यासाठी खाईल कुठलें ? पोट बांधोनि गायीस पोषिलें । त्यासि लाभलें सौख्य पुढे ॥१७॥
’ गोरक्षणीं स्वरक्षण ’ । ऐसें पूर्वजांचें कथन । म्हणोनीच गायींकरितां प्राण । दिले अनेक शूरांनी ॥१८॥
श्रीकृष्ण आणि शिवशंकर । वसिष्ठ आणि दत्तदिगंबर । दिलीप, शिवाजी गोसेवा-तत्पर । संत अपार गोभक्त ॥१९॥
ज्यांनी त्यागिलें सर्वस्वास । करतलीं भिक्षा तरुतलीं वास । ऐसे निष्काम गुरुहि गोसेवेस । न विसंबती कदापि ॥२०॥
गायीच्या शरीरांत सर्व । कल्पिले जे देवीदेव । तयांचा हाचि असे भाव । गाय अधिष्ठान देशाचें ॥२१॥
तिच्या शेणाने पिके शेती । शेती देई सुखसंपत्ति । म्हणोनिच शेणामाजी लक्ष्मीची वसती । वर्णिली असे ॥२२॥
गोरसाने आरोग्य शरीरीं । मग कोठे राहिला धन्वंतरी ? सत्वांश मिळतां बुध्दि गोजिरी । सरस्वती ही गोदुग्धीं ॥२३॥
उदररोगांचें नाशक । सत्वांश देई गायीचें ताक । तुपाने शांत डोळे मस्तक । चंद्रसूर्य जणूं नेत्रीं ॥२४॥
गाय जिवंत आरोग्यधाम । तिचे पुत्र प्रत्यक्ष परिश्रम । राष्ट्रसुखाचा मार्ग सुगम । गोसेवेयोगें ॥२५॥
म्हणोनि सकलांचें कर्तव्य आहे । जेणें गोवंश सुधारणा होय । ऐसा करावा कांही उपाय । सर्वतोपरीं ॥२६॥
कसाब आपुल्या गांवांतूनि । गायी नेती बघतां नयनीं । दु:ख व्हावें सकलांच्या मनीं । परतवाव्या त्या गायी ॥२७॥
ऐसे दलाल हाकोनि द्यावे । अथवा अन्य कामीं लावावे । परोपरीने सुमार्गी वळवावे । घेते-देते सर्वचि ॥२८॥
विकणारासि समजावावें । एवढयाने का श्रीमंती पावे ? मरे तों घरीं खतमूत घ्यावें । तरी फळे सेवा गायीची ॥२९॥
द्वारीं सकाळीं गाय हंबरली । गोमूत्र देवोनिया उठली । म्हणजे समजावी पवित्रता झाली । जागेमाजी ॥३०॥
ज्याचे घरीं शेती आहे । त्याने अवश्यचि पाळावी गाय । मळमूत्र सर्व उपयोगी राहे । ऐसी गाय माऊली ती ॥३१॥
गाय माऊली आईसमान । तिची निगा असावी पूर्ण । न करावी गोमाशांची खाण । अथवा सांपळा हाडांचा ॥३२॥
घालोनि चारा पेंड चुरी । गाय करावी हत्तीपरी । प्रेमें गोंजारोनि घरोघरीं । गाय प्रसन्न ठेवावी ॥३३॥
गांवीं असावा आदर्श सांड । बैल निपजावया धिप्पाड । सुंदर होईल शेतीसि जोड । वाहावया बैलांची ॥३४॥
उत्तम गायी सुंदर सांड । पाहतां आनंद वाटे उदंड । दूध पिवोनि मुलें प्रचंड । शक्ति दाविती ॥३५॥
तेंचि खरें सात्विक सौंदर्य । मुलें गोंजारिती वत्स गाय । दूध पूवोनि राहती तन्मय । खेळींमेळीं ॥३६॥
गोवंशाचें दूध वाढे । तरीच संतान उन्नतीस चढे । खाऊं घालोनि लाडू पेढें । उगीच पोटें वाढती ॥३७॥
कृत्रिम दूध-लोणी कांही । गोरसतुल्य ठरणार नाही । नाना रोग वाढती देहीं । न कळतां कृत्रिमतेने ॥३८॥
सर्वथैव यंत्रांनीच कांही । शेती सुखकर होणार नाही । गांवची संपत्ति गांवीं राही । सुगम तो मार्ग उत्तम ॥३९॥
यासाठी गायीगुरांची जोपासना । घरोघरीं ठेवावा गोवत्सठाणा । प्रसन्न दिसावे पशू नाना । उत्तम लाभावें दूधदही ॥४०॥
दुधादह्याची योग्य पूर्ति । व्हावी आपुल्या गांवाप्रति । घरोघरीं गायीवासरें असती । तेंचि गांव भाग्यशाली ॥४१॥
जो आपुल्या घरीं गाय न ठेवी । तयासाठी गोरक्षणें असावीं । गरीबांची तेथे सोय व्हावी । उत्तम लाभावा गोरस ॥४२॥
कांही ठिकाणीं गोरक्षणें करिती । मरतुकडया गायी जमविती । त्यांच्या नांवाने पैसे खाती । गायी मारती उपवासी ॥४३॥
ऐसें नको गोरक्षण । जें दुखवी मानवी मन । राहावी गायी-सांड पाहोन । प्रसन्न जनता सर्वदा ॥४४॥
गोरक्षणें दहीदुधाची सोय व्हावी । लोकीं सुखसंपन्नता यावी । कोरडी गोपूजाच न करावी । घरोघरीं अथवा गांवीं ॥४५॥
उत्तम चारापेंड देऊन । वाढवावें गायींचें वजन । आदर्श गायी वळू ठेवोन । उत्तम गोधन वाढवावें ॥४६॥
गांवीं सुंदर गायींचा तांडा । चराया गोचरभूमि उदंडा । नदी तळें विहिरीचा आखाडा । भव्य जैसा ॥४७॥
उत्तम ऐसा देवसांड । मुबलक चरावा चारा-बिवड । बीजारोपणीं दूधकावड । देती गायी ॥४८॥
हेंचि खरें गोरक्षण । नाहीतरि कसाबभुवन । उगीच गायी वाडयांत कोंडून । गोरक्षण का होई ? ॥४९॥
गायीस नसे चराऊ जमीन । तरि मोकळी पाडावी सरकाराकडोन । अथवा गांवीं करावी अर्पण । जमीनदारांनी ॥५०॥
गोरक्षणाचा व्हावा अभ्यास । नाना प्रयोग सावकाश । कैसे पुढे गेले अन्य देश । ती माहिती द्यावी सर्वां ॥५१॥
गोवंशाच्या रोगनिवारणा । गांवीं ठेवावा दवाखाना । लाभ मिळावा सर्वांना । प्रतिबंधकता समजावी ॥५२॥
गांवोगांवीं व्हावी गो-उपासना । गोसेवा गोदुग्धमंदिर स्थापना । रुचि लावावी थोरांलहानां । गोदुग्धाची परोपरीं ॥५३॥
सर्व करावें जें जें करणें । परि सुधारावें सात्विक खाणें । त्यावांचोनि सदबुध्दि येणें । कठिणचि वाटे ॥५४॥
सात्विक खाद्यपेयांविण कांही । गांवीं आरोग्य येणार नाही । उत्तम शक्ति नसतां देहीं । संपत्तिहि कैची ? ॥५५॥
उत्तम दूध उत्तम सांड । उत्तम शेती उत्तम बिवड । उत्तम कामगार प्रचंड । शक्तिशाली ॥५६॥
ऐसें ज्यांनी गांव केलें । तेचि आज प्रतिष्ठा पावले । एरव्ही तोरा करोनि मेले । निकामी ते ॥५७॥
निकामियाची व्यर्थ संपत्ति । निकामियाची व्यर्थ शक्ति । नाना मार्गे संपोनि अंतीं । दु:ख देई जीवासि ॥५८॥
खूप सत्वमय खावोनि अन्न । मेद घेतला वाढवोन । तेथे रोगांची फौज निर्माण । होतसे दु:ख द्यावया ॥५९॥
म्हणोनि केलें पाहिजे काम । आरोग्यदायी कुणी व्यायाम । अंगांतोनि निघतां घाम । नष्ट होती रोगजंतु ॥६०॥
व्यायाम आरोग्यदायी मित्र । हें ध्यानीं ठेवावें सूत्र । आळस वैरी मानिला सर्वत्र । सर्वतोपरीं ॥६१॥
व्यायामाविण सात्विक भोजन । तेंहि मारी विकारी होऊन । व्यायामें होय अग्निदीपन । अन्नपचन सहजचि ॥६२॥
व्यायामें जडत्व जाई दुरी । व्यायामें अंगीं राहे तरतरी । रक्तव्यवस्था उत्तम शरीरीं । वाढे विचारीं सजीवपण ॥६३॥
व्यायामाने सशक्त स्नायु । व्यायामें मानव होय दीर्घायु । व्यायामहीना पित्त कफ वायु । जर्जर करिती अत्यंत ॥६४॥
व्यायामें वाढे प्रतिकारशक्ति । स्वावलंबनाची प्रवृत्ति । व्यायामें अंगीं वाढे स्फूर्ति । कार्य करण्याची ॥६५॥
ऐसा व्यायाम सर्वांकरितां । असे उपयुक्त पाहतां । ही नव्हे केवळ एकांगी संथा । पहिलवानांची ॥६६॥
कोणी व्यायामामागेच लागले । ते मल्ल-पहिलवान झाले । लोकां दिपवोनि सामर्थ्य दाविलें । देह-शक्तीचें ॥६७॥
त्यांत कोणी बक्षिसासाठी । करिती जीवनाची आटाआटी । पैशांसाठीं मारापिटी । करिती कोणी ॥६८॥
देह झिजवावा सेवेस्तव । सत्यमार्गे रक्षावें गांव । दुर्बळासि उचलावें हेंचि वैभव । मल्लविद्येचें ॥६९॥
परि इकडे नाही ध्यान । नष्ट करोनिया मिष्टान्न । शक्ति खर्चिती दुष्कर्मी पूर्ण । ऐसे व्यायामी कितीतरी ॥७०॥
कोणाच्या भरदार देहावरि । कपडे मुलायम जरतारी । आपुल्याच खाद्य खुराकीची करी । सर्वदा चिंता ॥७१॥
गांवसेवेचें काम आलें । तेथे पुढारीपण दिलें । तरि तोंडचि त्याचें चाले । स्वयें न करी एकहि ॥७२॥
कपडयास न पडावी वळी । म्हणोनि दुरुनीच सांभाळी । कामें करिती माणसें सगळी । परि तो जागचा हालेना ॥७३॥
असेल कुस्तीमाजी बरवा । परि जो प्रसंगीं कामीं न यावा । तो मल्ल म्हणोनि गौरवावा । कोणत्या न्यायें ? ॥७४॥
तोचि खरा पहिलवान । जो देह-उन्नति साधूनि पूर्ण । सेवेसाठी अर्पितो जीवन । हनुमंतापरी ॥७५॥
नुसतें दंडमोंढे मारणें । कुस्ती जिंकणें, चणे पचविणें । थोरालहानांस तंबी देणें । नव्हती लक्षणें व्यायामाचीं ॥७६॥
साधाया सेवेचा उपक्रम । कराया जीवनाचें काम । जो शक्ति दे तोच व्यायाम । आवश्यक सर्वां ॥७७॥
व्यायाममंदिरांतचि कांही । व्यायाम होतो ऐसें नाही । उत्पादनासि सहायक होई । तो व्यायाम श्रेष्ठ ऐसा ॥७८॥
हाते घेवोनि दंड मारणें । त्याहूनि उत्तम पाणी ओढणें । दळणें, फोडणें, जमीन खोदणें । आरोग्यदायी ॥७९॥
जीवनाचा अमोल वेळ । घालवोनि खेळती तकलादी खेळ । त्यापेक्षा परिश्रमाचें फळ । उत्तम सर्वतोपरीं ॥८०॥
दळणकांडणादिकें उत्तम । मिळे आरोग्यकारी व्यायाम । देह विशेष राही कार्यक्षम । ऐसा सत्वांशहि लाभे ॥८१॥
वाचेल बरीचशीं संपत्ति । देशांत वाढेल श्रमाची  शक्ति । सर्व कार्यांचीं होईल पूर्ति । गांवींच या मार्गाने ॥८२॥
होवोनिया लोकसेवा । आरोग्याचा लाभेल मेवा । गांवास लाभे सुखाचा ठेवा । अडचण कोठे कशाची ? ॥८३॥
आपुली शेती आपुल्या कष्टें । शेणमूत्रादि घालोनि गोमटे । करिता ऐसी आदर्श नेटे । उत्पन्नासी वाण नुरे ॥८४॥
आबालवृध्द नरनारी । यासाठी झटतील घरोघरीं । तरि सर्व सुखें संसारीं । लाभतील त्यांना ॥८५॥
लाभेल व्यायामाचें फळ कामामाजींच सकळ । निसर्गचि देईल आरोग्यबळ । सर्व लोकां ॥८६॥
वनस्पति आदींचा सहवास । सूर्यकिरणांतील सत्वांश । शुध्द हवेंतील श्रम सर्वांस । अमृतापरी लाभदायी ॥८७॥
मग गांव असो की शहर । तेथे रोगांचा न राहे संचार । एक-एक व्यक्ति करील आचार । ऐसा जरी ॥८८॥
व्यसनें आळस दुराचार । यांपासोनि राहिला दूर । ऐसा एकेक घटक सुंदर । पाहिजे गांवीं ॥८९॥
सदगुण जेथे जेथे दिसती । ते उचलोनि आणावे अनुभवाप्रति । यानेच उन्नत होईल व्यक्ति । जीवन सुधारेल गांवाचें ॥९०॥
जीवन लाभावें उज्जवलतेचें । तरि सर्व कामधाम असावें सोयीचें । जें जें कराल तें चालावें साचें । त्याच मार्गी ॥९१॥
भोजनस्थानीं निद्रास्थानीं । सभास्थानीं उधोगस्थानीं । विशेष प्रसंगीं सहजस्थानीं । सदविचारेंचि वर्तावें ॥९२॥
संस्कार आणि शुध्दबुध्दता । आरोग्य आणि पवित्रता । यांवरि लक्ष ठेवोनि सात्विकता । बिंबवावी जीवनीं ॥९३॥
यांकरितां बोललों कांही दिनचर्या । आहारविहारादि कार्या । ग्रामस्थांनी अनुभवोनिया । उध्दार करावा जीवनाचा ॥९४॥
ऐसें करावें एकेक कार्य । जेणें गांवीं नांदेल सात्विक सौंदर्य । यांतचि स्वर्गीय सुखाचें माधुर्य । तुकडया म्हणे ॥९५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । गोरसव्यायामसेवन कथित । पंधरावा अध्याय संपूर्ण ॥९६॥

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥


सविस्तर सारांश – गोवंश सुधार

ग्रामगीतेच्या पंधराव्या अध्यायाचे नाव “गोवंश सुधार” असे आहे. या अध्यायात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामीण जीवनात गोवंशाचे महत्त्व, पशुधन संवर्धनाची आवश्यकता आणि शेती व ग्रामअर्थव्यवस्थेत जनावरांचे स्थान यांचे सविस्तर वर्णन केले आहे. भारतीय ग्रामीण संस्कृतीमध्ये गाय, बैल आणि इतर पाळीव जनावरे ही केवळ पशुधन नसून शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, असा विचार या अध्यायात मांडला आहे.

तुकडोजी महाराज सांगतात की भारत हा कृषिप्रधान देश असून शेती ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीच्या विकासासाठी सक्षम आणि निरोगी गोवंश आवश्यक असतो. बैलांच्या साहाय्याने शेतीची कामे पार पडतात, तर गायी दूध, शेण आणि इतर उपयुक्त साधने उपलब्ध करून देतात. त्यामुळे गोवंशाचे संरक्षण आणि संवर्धन हे ग्रामविकासाचे महत्त्वाचे अंग आहे.

या अध्यायात गोवंशाकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीवर टीका करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी जनावरांना योग्य आहार, निवारा आणि वैद्यकीय सेवा मिळत नाही. परिणामी त्यांची उत्पादकता कमी होते आणि शेतकऱ्यांचेही नुकसान होते. म्हणून पशुधनाची योग्य काळजी घेणे हे प्रत्येक शेतकऱ्याचे कर्तव्य आहे.

तुकडोजी महाराज सांगतात की चांगल्या जातींचे संवर्धन करणे आवश्यक आहे. निरोगी, सशक्त आणि उत्पादक जनावरांमुळे शेती आणि दुग्धव्यवसाय दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रगती साधता येते. यासाठी नियोजनबद्ध प्रजनन, योग्य संगोपन आणि पशुवैद्यकीय सेवांचा उपयोग करणे गरजेचे आहे.

या अध्यायात जनावरांच्या आहाराचे महत्त्व स्पष्ट केले आहे. अपुरा किंवा निकृष्ट दर्जाचा चारा दिल्यास जनावरे अशक्त होतात. हिरवा चारा, पौष्टिक खाद्य आणि स्वच्छ पाणी यांची उपलब्धता असल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे पशुपालनाकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज तुकडोजी महाराज अधोरेखित करतात.

गोवंश सुधारामध्ये गोठ्यांच्या स्वच्छतेलाही महत्त्व दिले आहे. अस्वच्छ गोठे आणि दूषित वातावरणामुळे जनावरांमध्ये रोगराई पसरते. त्यामुळे नियमित स्वच्छता, हवेशीर निवारा आणि आरोग्यविषयक काळजी यांचा अवलंब करणे आवश्यक आहे. निरोगी पशुधनामुळेच ग्रामआरोग्य आणि आर्थिक विकासाला बळ मिळते.

तुकडोजी महाराज शेण आणि गोमूत्राच्या उपयुक्ततेवरही प्रकाश टाकतात. शेणाचा वापर सेंद्रिय खत म्हणून केल्यास जमिनीची सुपीकता वाढते. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधनाचे योगदान केवळ दूध किंवा श्रमापुरते मर्यादित नसून शेतीच्या उत्पादनक्षमतेशीही त्याचा थेट संबंध आहे.

या अध्यायात पशुपालन आणि ग्रामस्वावलंबन यांचा संबंध स्पष्ट केला आहे. ज्या गावात पशुधनाची योग्य काळजी घेतली जाते, ते गाव आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनते. दुग्धव्यवसाय, शेती आणि इतर पूरक व्यवसाय यांमधून ग्रामस्थांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.

तुकडोजी महाराज जनावरांबद्दल करुणा आणि संवेदनशीलतेची भावना निर्माण करतात. पशू हेही सजीव आहेत आणि मानवाच्या सेवेत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्याशी प्रेमाने वागणे, त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांना अनावश्यक त्रास न देणे ही मानवाची नैतिक जबाबदारी आहे.

अध्यायाच्या शेवटी ते स्पष्ट करतात की गोवंश सुधार हा केवळ पशुधनाचा विषय नसून ग्रामसमृद्धीचा विषय आहे. निरोगी आणि सक्षम पशुधनामुळे शेती, दुग्धव्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते. त्यामुळे गोवंश संवर्धन हे ग्रामविकासाच्या व्यापक कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.

अध्यायाचा मुख्य संदेश

“गोवंश हा ग्रामीण जीवनाचा आणि कृषी अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. पशुधनाचे संरक्षण, योग्य संगोपन, चांगल्या जातींचे संवर्धन आणि वैज्ञानिक पशुपालन यांमुळे शेती व ग्रामसमृद्धीला चालना मिळते. जनावरांबद्दल करुणा बाळगून त्यांची काळजी घेणे हे आर्थिक आणि नैतिक दोन्ही दृष्टिकोनातून आवश्यक आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Scroll to Top