ग्रामगीता अध्याय सव्वीसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ईश्वर सर्वांठायीं व्यापला । तो पंथीं नाही विभागला । मग उणें-अधिक कोणाला । कां म्हणावें ? ॥१॥
ऐसें ऐकोनि निरूपण । एक श्रोता करी प्रश्न । देव विशाल व्यापक पूर्ण । मग कां समर्थन मूर्तीचें ? ॥२॥
असो कोणाहि धर्माची खूण । परि मूर्ति मानवांनी केली निर्माण । तिथे कोठलें देवपण ? तिचें पूजन कशाला ? ॥३॥
देव कुणाची पूजा नेघे । त्यास नको हें वाउगें । स्वयें बोलला भक्तासंगें । ’ मज हवें शुध्द प्रेम ’ ॥४॥
याचें ऐकावें उत्तर । प्रेम निर्मावें एका मूर्तीवर । तेंचि क्रमाने करावें विश्वाकार । हाच हेतु पूजनाचा ॥५॥
देवाची स्मरणमूर्ति बघतां । त्याचें जीवनकार्य ध्यानीं आणतां । शक्ति येते मनासि तत्त्वता । मानसिक संयोगें ॥६॥
मनासि लावावया चिंतन । लागावया मार्गाचें आकर्षण । नेमिलें असे प्रतिमापूजन । साधुसंतीं ॥७॥
मनास पाहिजे कांही आधार । म्हणोनि आरंभीं मानिले साकार । देवें व्यापिलें चराचर । तेथे मूर्ति तद्रुपचि ॥८॥
परि जो सिध्दान्ताचा पुरस्कर्ता झाला । त्यासहि जन देव बोलला । त्याचीहि प्रतिमा पूजूं लागला । भोळेपणाने ॥९॥
जरी पूजिली व्यक्तिमूर्ति । तरी चुकलें मी न म्हणे चित्तीं । परि सिध्दांत वाउगे राखिती । हें तों आहे अज्ञानपण ॥१०॥
सुखासाठी आखिली दिशा । रेखिला घराचा नकाशा । परि लाभली शेवटीं निराशा । नकाशाचि राखतां ॥११॥
घर राहाया नाही मिळालें । नकाशे नकाशेच राहिले । तेणें समाधान भंगलें । जाणीव होतां पुढे पुढे ॥१२॥
तैसेंचि झालें मूर्तिपूजेचें । जे जे पंथ दिसती आजचे । तेथील साधक मूर्तिपूजेपुढचें । कांहीच नेणे ॥१३॥
तो मूर्ति धरोनीच बसला । मूर्खचि समजतो पुढचियाला । म्हणतो भ्रष्टाचार झाला । मूर्तिपूजेवांचोनि ॥१४॥
त्यासि कळला नाही धर्म । मूर्तिपूजेचें काय वर्म । उगीच वाढवूनि घेतला भ्रम । बिचार्याने अंतरीं ॥१५॥
घरीं देवाचा कट्टर पुजारी । असत्य करीत असे बाजारीं । व्यवहार करितां झाला वैरी । ज्याचा त्याचा ॥१६॥
देवळामाजीं कान घरी । नाक धरोनि प्राणायाम करी । बाहेर येतां शिवी दे, कावरी । ज्यासि त्यासि ॥१७॥
देवाद्वारीं हवन करी । बाहेर भिकार्यासि मारी । पोटा न दे चूनभाकरी । उपाशीयाच्या कधीहि ॥१८॥
आमचा देव सत्यचि बोले । परि आम्हीं पाहिजे खोटें केलें । ऐसें असोनि भक्त झाले । म्हणती आम्ही ॥१९॥
स्वयें म्हणवी रामभक्त । नाही एकपत्नीव्रत । नित्य पूजितो हनुमंत । व्यसनें झाला प्रेताऐसा ॥२०॥
देव दुर्जनासि संहारी । कष्ट करितो भक्तांघरीं । भक्त बघा हा व्यभिचारी । आळसे घरीं झोपतसे ॥२१॥
देव म्हणे ’ मी सर्वत्र । दीनरंक माझे पुत्र ’ । उपासक त्यांसि दिवसरात्र । पिळोनि चैन भोगितसे ॥२२॥
’ प्रभु आमुचा पतितपावन ’ । म्हणोनि कंठरवें करी गायन । मानवासि अस्पृश्य हीन । मानून डौल मिरवितो ॥२३॥
देवाचिया मूर्तीसाठी । सोने हिरे बैसवी मुकुटीं । न दे श्रमिकासि लंगोटी । मंदिर बांधतां मेला तरी ॥२४॥
कसलें हें देवपूजन ? मूर्तिपूजेचें विडंबन । केवढें शिरलें आहे अज्ञान । आपणांमाजीं ! ॥२५॥
देवळामाजीं करी भजन । बाहेर येतां खोटें भाषण । ऐशा पुजार्या पुसेल कोण ? सांगा तरी ॥२६॥
म्हणोनि हें वाईट विसरावें । पूजेने पूज्यासि ओळखीत जावें । अभ्यासाने पाऊल टाकावें । पुढे पुढे ॥२७॥
जैसी ज्याची भावना । त्याने तैसीच मानावी देवता मनां । परि न चुकावी उपासना । सत्कर्मांची ॥२८॥
मूर्तिपूजेचा अर्थ एक । आपण मूर्तीच व्हावें सम्यक । म्हणजे करावी तैसी वागणूक । अभ्यासाने ॥२९॥
जयाची मूर्ति उपासावी । तयाची चरित्रकथा वाचावी । पुढे कामेंहि करीत जावीं । आपणहि तैसीं ॥३०॥
काय केलें माझिया देवें । मजसी मुळीच नाही ठावें । फक्त मूर्तीच धरोनि बसावें । हें वेडेपणाचें ॥३१॥
ऐसी असावी उपासना । उपासनीं वाढवावें कर्तव्यगुणा । कर्तव्यपूर्तीने मोठेपणा । अंगीं घ्यावा मिळवोनि ॥३२॥
संकटें येतां कार्यामाझारीं । चिंतनीं घ्यावें चारित्र्य अंतरीं । अभ्यासाचें तेज वृत्तीवरि । वाढवावें सर्वकाळ ॥३३॥
चुकलिया संतां विचारावें । पुढे कार्य करावयासि धजावें । आपुल्या परीने सुख देत जावें । जीवांलागीं ॥३४॥
यासाठीच मूर्तिस्थापना । ठायींठायीं केली जाणा । आठवण राहावी साधकांना । म्हणोनिया ॥३५॥
पदोपदीं हो पवित्र वृत्ति । म्हणोनि स्थळोस्थळीं स्थापिली मूर्ति । वृक्षपशुपक्षी ठरविल्या विभूति । सदभावासाठी ॥३६॥
मनोभावें मूर्तीसि पुजावें । श्रवण, कथन, स्मरणादि करावें । मूर्तीप्रमाणे सत्कर्म घडावें । आपुलिया अंगें ॥३७॥
सर्व सोडोनि भिन्न भावना । हृदयीं धरावी उपसना । जेणें प्रसन्नता येई मना । तेंचि उत्तम समजावें ॥३८॥
मन जेथे समाधान पावे । तेथूनि शक्तीचें तेज घ्यावें । मग कार्यासि लागावें । सदगुणी ऐशा ॥३९॥
सदभावें करावें पूजन । विनम्र करोनिया देहमन । निर्मळ असावें वातावरण । ध्यान धराया देवाचें ॥४०॥
येथे मानसिक पूजेचेंच महत्त्व । विचारसामर्थ्य हें मूलतत्त्व । तेणेंचि पावे ईश्वरत्व । जीवालागी प्रयत्नें ॥४१॥
जीवासि मूळतत्त्व कळावें । सर्वांभूतीं आत्मरूप समजावें । ऐसेचि पूजनाचे गोडवे । वर्णिले संतीं ॥४२॥
संतीं बोलिलें हरिनांम घ्यावें । हेंहि वाटे साधन बरवें । परि अर्थ समजोनि जपावें । तरीच सार्थक जीवाचें ॥४३॥
नाम ईश्वराची शब्दमूर्ति । ’ मुखीं नाम हातीं मोक्ष ’ म्हणती । यज्ञाहूनि थोर जपावी महती । ठाऊक हें सर्वां ॥४४॥
परि कासयासि जपावें नाम । साधावयाचें तें कोण काम । या ध्येज्ञानावांचोनि सर्व कर्म । निरर्थक ॥४५॥
कितीतरी जन नाम घेती । माळा-मणी ओढीत राहती । परि क्षणहि त्यांची मति । रामीं न रंगे ॥४६॥
मुखें नाम उच्चारिती । व्यवहार अधोगामी करिती । पापें करोनि शपथ घेती । देवधर्मांची ॥४७॥
कसलें हें नाम जपणें ? स्वार्थें विश्वासघात करणें । आशातृष्णा न सोडणें । इंद्रियविषायांची ॥४८॥
येथे तारतम्यचि पाहिजे । नामजपीं व्रतस्थ होइजे । तरी जीवास सुखाचें साजे । स्थान जीवनीं ॥४९॥
मुखीं नामाचें चिंतन । हातीं सेवाकर्य पूर्ण । करील चारित्र्य संपादन । तोचि भक्त ॥५०॥
नामें शक्ति येते अंगीं । संकटें निवारण्याची प्रसंगीं । परि पुरुषार्थ असावा जंगी । तरीच फळे ॥५१॥
दुराचार सज्जन-विरोध । ऐसे दोष आणिती बाध । काया-वाचा-मनें टाळिले अपराध । तरीच फळे ॥५२॥
मग तें नाम मंदिरीं जपावें । अथवा शेतीमाजीं घ्यावें । चालतां बोलतांहि गावें । तरी तो यज्ञ ॥५३॥
मुख्य नामाचें अधिष्ठान । कर्तव्य करावें संपादन । हेंचि साधावया संतजन । नामजप सांगती ॥५४॥
जे पुरुषार्थ सोडोनि जपती नाम । त्यांसि कैसा पावेल आराम ? हें तों झालें आंधळें काम । देवाद्वारीं ॥५५॥
आमुचा राम कामें करी । आम्ही मागावी भाकरी । होवोनि फिरावें भिकारी । ही भक्ति कैची ? ॥५६॥
रामें असुरांसि मर्दावें । आम्हीं पूजापात्र अवलंबावें । निर्बल होवोनि शरण जावें । ही भक्ति कैची ? ॥५७॥
भक्त म्हणजे विभक्त नव्हे । एकरूपचि होवोनि जावें । देवें लोकांचें दु:ख हरावें । आम्हीं का करावें देवदेव ? ॥५८॥
ऐसा जप जयाने केला । तो शेवटीं मूर्खचि राहिला । बोल देवोनिया देवाला । काय होतें ? ॥५९॥
पापक्षालनासि नाम घ्यावें । पुढती पाप करीतचि जावें । ऐसें कोण वदलें बरवें । सांगा मज ॥६०॥
ऐसी आहे ज्यांची स्थिति । त्यांसि नामजपी म्हणती । मी म्हणेन कलंक लाविती । नामादिकासि ते ॥६१॥
याहूनि न जपे तो पुरवला । उत्तम राहणी ठेवी जो भला । दु:ख न देईच कोणाला । कोण्या प्रसंगीं ॥६२॥
व्यवहार करीतसे कष्टून । जोडोनिया उद्योगें धन । सदा राहतो प्रसन्न । खेळींमेळीं प्रेमभावें ॥६३॥
असेल तें गरजूंना देणें । कोणा उत्तम-वाईट न म्हणे । आपणा ऐसें सर्वांचें जाणे । सुखदु:ख सज्जन ॥६४॥
हेंचि शिकावयासाठी । नामजप सांगितला उठाउठी । सदा राहणी गोमटी । प्रेमळपणाची सर्वांशीं ॥६५॥
प्रथम नाम दुजें चिंतन । तिजें निश्चयीं लावावें मन । मग होवोनि सत्कार्यप्रवण । समाजसेवा साधावी ॥६६॥
ऐसें सत्कर्म जरी नाचरवें । सदगुण विसरोनि नामचि गावें । तरी तें पूर्णतेस न पावे । आत्मोन्नतीच्या ॥६७॥
म्हणोनि संतांचिया वचना । निरीक्षोनि ठेवावी धारणा । तरीच ग्रंथीं कथिल्या त्या खुणा । पावती रामनामाच्या ॥६८॥
देव बोलला ’ कामें करा । निर्भय होवोनि देशीं विचरा ’ । सकळ देवाचाचि पसारा । सेवाभाव साधा ॥६९॥
जनता ज्याला देवरूप कळली । त्याचीच भक्ति देवा पावली । साक्षात्कारें वृत्ति वळली । विश्वात्मभावीं ॥७०॥
तें साधाया बोलिलें नाम । लाभावया जीवास आराम । तुटावया अज्ञानभ्रम । दु:खमूळ जो ॥७१॥
आपण तरूनि जग तारावें । शक्तियुक्तीने विश्व भरावें । नामें लोकांसि जागवावें । ऐसा आदेश संतांचा ॥७२॥
संतमुकुटमणि तुकाराम । त्यांनी अभंग कथिले अति सुगम । मार्ग केला व्यवहारक्षम । भोळयाभाळया जनांसाठी ॥७३॥
अत्यंत साधी गर्जली वाणी । गेली वेदादिकांस भेदोनि । भ्रमचि निवारिला तत्क्षणीं । अज्ञानी जडजीवांचा ॥७४॥
हजारो मुखांतूनि गरजला । ’ वेदान्त आम्हांसीच कळला ’ । ’ ज्याने पंढरीराज वंदिला । सर्व पावला शास्त्रगुह्य ’ ॥७५॥
म्हणे ’ नको ब्रह्मज्ञानादि भाव । आत्मस्थितीचा गौरव । आम्ही भक्त तूं चहूकडे देव । ऐसें करी आम्हांसि ’ ॥७६॥
’ कोठोनि आणावी विद्वत्ता ? सेवेंचें काम आमुच्या हातां । नाम गाऊं कष्ट करितां । पंढरीनाथा पावाया ’ ॥७७॥
प्रभूने ऐकिली त्यांची सेवा । संकटीं आला ऐकोनि धांवा । त्यांच्या शब्देंहि लोक तरावा । ऐसा केला चमत्कार ॥७८॥
ऐसे झाले संत अनेक । मूर्तिभक्त बहु नामधारक । जे सेव्यचि झाले असोनि सेवक । हनुमंतापरी ॥७९॥
सर्वचि पंथांचे भक्तिप्रकार । तत्त्व साधतां असती सार । हा आचरोनि दाविला समन्वय सुंदर । रामकृष्ण परमहंसें ॥८०॥
नाम जपोनि मूर्ति पूजितां । देवचि झाले देवा भजतां । पूजूं लागले विश्वा समस्ता । स्त्रीपुरुष-भेद विसरोनि ॥८१॥
मूर्तिपूजा जपतप कांही । तत्त्व साधतां बाधक नाही । हें सिध्दचि केलें अनुभवें पाही । संतजनांनी ॥८२॥
उत्तम भाकरी करितां यावी । म्हणोनि मुलीने मातीची करावी । तैसी अमूर्त देवाचा मार्ग दावी । मूर्तिपूजा ही ॥८३॥
देव आहे मूळचा अंतरीं । त्याची साधना करावी लागे बाहेरी । ओळख पटतां विचारें पुरी । भिन्नपणा राहीना ॥८४॥
सत्कर्मांचें ज्ञान झालें । सत्कर्म करणें अंगीं आलें । मूर्तिपूजेचें साधन संपलें । साधकाचें ॥८५॥
राहिलें जीवनांत तैसे वागणें । देव भजतां देवचि होणें । देव होण्याचीं कारणें । अनुभवोनिया ॥८६॥
माझा देव दयावंत । पुरवी हीनदीनांचे मनोगत । मजसी पाहिजे निष्ठावंत । तेंचि केलें ॥८७॥
ऐसा जप जाले अंतरीं । हातीं व्यवस्थेची चाकरी । लागला रंग याचिपरीं । अहोरात्रीं देहाला ॥८८॥
आता परोपकारचि उरला । देव अंतरी-बाहेरी भरला । पाहणेंचि नाही दुसर्या कोणाला । कोणे ठायीं ॥८९॥
विसरोनि गेले व्यक्तिपण । झाले कार्यरूपचि आपण । ऐसें होतां देवपण । अंगीं आलें धांवोनि ॥९०॥
नाना विरोधकांस तोंड दिलें । नाना कष्ट सहन केले । शेवटी सर्वांनी ठरविलें । हेंचि खरें म्हणोनि ॥९१॥
पूर्वी मूर्तीस शृंगार करी । तैसेंचि मानवांसि शृंगारी । ’ कष्ट नसो कोण तिळभरी । गांवीं माझ्या ’ म्हणोनि ॥९२॥
हीच खरी देवपूजा । याविण नाही मार्ग दुजा । संतदेव बोलिले माझ्या । हृदयामाजीं येवोनि ॥९३॥
देव जैसा जैसा आकळला । तैसा देह-अंहकार मावळला । लवणकण सागरीं मिळाला । सागर झाला एकत्वें ॥९४॥
यापरी पुढची आहे पायरी । जैसी वृत्ति धरोनि चढाल वरी । तैसा जीव ब्रह्म होवोनि अंतरीं । अनुभव घेई आपणचि ॥९५॥
म्हणे मीचि सर्व आता झालों । विश्वीं विश्वाकार होवोनि ठेलों । सर्वचि कार्ये करूं लागलों । आपणाचि साठी ॥९६॥
माझ्याविरहित कोणी नुरला । अणुरेणूमाजीं मीचि संचला । ऐसा अनुभव येतां झाला । पूर्ण योगी ॥९७॥
प्रथम पाहिली देवुळीं मूर्ति । पुढे पाहिलें जीवजनाप्रति । पूर्णता होतां सर्वत्र व्याप्ति । आपुल्याचि रूपाची ॥९८॥
ऐसी लाभावया आनंद-ठेव । पूजावयासि मांडिला देव । द्रष्टा-दृश्य-दर्शनभाव । एकतत्त्वी दिसावया ॥९९॥
हाचि धरोनि निर्धार । केलिया नवविध पूजाप्रकार । पावेल सर्वोत्तम सार । ईश्वरभक्तीचा ॥१००॥
एरव्ही कितीहि पूजिली मूर्ति । तरी वाढचि घेईल भ्रांति । न मिळेल कदाकाळीं शांति । जनामनासि ॥१०१॥
नसता वाढेल अहंकार । ’ आमची प्रतिमा अधिक थोर ’ । न मिटेल पंथद्वेष साचार । व्यापक ईश्वर जाणल्याविण ॥१०२॥
म्हणोनि प्रतिमा धरोनीच न बसावें । पायरीने वाढत जावें । क्रियाशीलपणें विश्वीं पाहावें । विश्वंभरासि ॥१०३॥
सर्व लोकचि आमुचा ईश्वर । सर्व गांवचि आमुचें मंदिर । सेवा करणें निरंतर । पूजा आमुची ॥१०४॥
प्रामाणिकतेने करणें काम । हेंचि आमुचें ईश्वरनाम । सर्व जीवमात्राशीं ऐक्यप्रेम । धर्म हा आमुचा ॥१०५॥
हाचि दृढ धरितां निर्धार । परमार्थ याहूनि नाही थोर । किंबहुना हाचि परमार्थ-सार । अनुभवियांचा ॥१०६॥
अंगीकारोनि या तत्वांसि । एक करावें सर्व भक्तांसि । लावावें पूजाया ग्राममंदिरासि । तुकडया म्हणे ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । पूजनस्मरण-रहस्य कथित । सहविसावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
सविस्तर सारांश – यात्रा-मेळे
ग्रामगीतेच्या सव्विसाव्या अध्यायाचे नाव “यात्रा-मेळे” असे आहे. या अध्यायात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी यात्रा, जत्रा आणि मेळ्यांचे सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले आहे. भारतीय ग्रामीण जीवनात यात्रा आणि मेळ्यांना विशेष स्थान आहे. ते केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून लोकांना एकत्र आणणारे, सांस्कृतिक देवाणघेवाण घडविणारे आणि समाजजागृतीचे प्रभावी माध्यम आहेत. मात्र त्यांचा उपयोग योग्य दिशेने झाला पाहिजे, हा या अध्यायाचा मुख्य संदेश आहे.
तुकडोजी महाराज सांगतात की प्राचीन काळापासून यात्रा आणि मेळे हे लोकजीवनाचा अविभाज्य भाग राहिले आहेत. विविध गावांतील आणि प्रदेशांतील लोक एकत्र येऊन धार्मिक श्रद्धा व्यक्त करतात, परस्पर भेटतात आणि सांस्कृतिक संबंध दृढ करतात. त्यामुळे समाजात एकात्मतेची भावना निर्माण होते.
या अध्यायात यात्रांचा मूळ उद्देश स्पष्ट केला आहे. यात्रा म्हणजे केवळ देवदर्शनासाठी केलेला प्रवास नव्हे, तर आत्मशुद्धी, सत्संग, ज्ञानप्राप्ती आणि समाजाशी संवाद साधण्याची संधी आहे. यात्रेमुळे व्यक्तीला व्यापक समाजजीवनाचा परिचय होतो आणि तिची दृष्टी अधिक व्यापक बनते.
तुकडोजी महाराजांच्या मते मेळे आणि जत्रा हे लोकशिक्षणाचे प्रभावी साधन ठरू शकतात. मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येत असल्यामुळे आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि सामाजिक सुधारणा यांविषयी जनजागृती करण्यासाठी या संधींचा उपयोग केला पाहिजे. लोकांपर्यंत विचार पोहोचविण्याचे हे प्रभावी व्यासपीठ आहे.
या अध्यायात धार्मिक श्रद्धेचा आदर राखत अंधश्रद्धेवर टीका करण्यात आली आहे. अनेकदा यात्रांच्या निमित्ताने काही चुकीच्या समजुती, अवैज्ञानिक प्रथा आणि अनिष्ट रूढी वाढीस लागतात. तुकडोजी महाराज सांगतात की श्रद्धा विवेकपूर्ण असावी. धर्मामुळे ज्ञान, सदाचार आणि मानवकल्याण वाढले पाहिजे.
तुकडोजी महाराज अनावश्यक खर्च आणि दिखाऊपणाविरोधातही भूमिका मांडतात. काही लोक यात्रांच्या नावाखाली मोठा खर्च करतात, कर्जबाजारी होतात किंवा बाह्य प्रदर्शनाला महत्त्व देतात. अशा प्रवृत्तीमुळे यात्रेचा खरा हेतू हरवतो. साधेपणा, भक्ती आणि समाजहित यांवर भर दिला पाहिजे.
या अध्यायात स्वच्छतेचे महत्त्व विशेषतः अधोरेखित केले आहे. यात्रा आणि मेळ्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा होत असल्यामुळे स्वच्छता, आरोग्य आणि शिस्त यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरू शकते. त्यामुळे सामूहिक जबाबदारीची भावना आवश्यक आहे.
तुकडोजी महाराज सांगतात की यात्रा आणि मेळ्यांमधून आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळते. स्थानिक उत्पादने, हस्तकला, ग्रामोद्योग आणि विविध व्यवसायांना बाजारपेठ उपलब्ध होते. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात बळकटी मिळू शकते. परंतु आर्थिक लाभाबरोबर नैतिकता आणि प्रामाणिकता राखणेही आवश्यक आहे.
या अध्यायात सांस्कृतिक जतनाचे महत्त्वही स्पष्ट केले आहे. भजन, कीर्तन, लोककला, लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून समाजाचा सांस्कृतिक वारसा जपला जातो. यात्रा आणि मेळे हे सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवणारे महत्त्वाचे माध्यम आहेत.
तुकडोजी महाराज युवकांना आवाहन करतात की त्यांनी यात्रा आणि मेळ्यांचा उपयोग समाजसेवा, लोकजागृती आणि संस्कारवृद्धीसाठी करावा. केवळ मनोरंजन किंवा गर्दी यापुरते मर्यादित न राहता त्यांना लोककल्याणाचे साधन बनवावे.
अध्यायाच्या शेवटी ते स्पष्ट करतात की यात्रा आणि मेळे हे समाजजीवनाचे महत्त्वाचे घटक आहेत. योग्य दृष्टीकोनातून त्यांचे आयोजन आणि सहभाग झाला तर ते समाजाच्या नैतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी प्रभावी साधन ठरू शकतात.
अध्यायाचा मुख्य संदेश
“यात्रा आणि मेळे हे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजजागृती, सांस्कृतिक संवर्धन आणि लोकशिक्षणाची प्रभावी साधने आहेत. श्रद्धा, विवेक, स्वच्छता, शिस्त आणि समाजहित यांचा समन्वय साधून यात्रा-मेळ्यांचा उपयोग लोककल्याणासाठी केला पाहिजे. योग्य प्रकारे साजरे केलेले मेळे समाजाला अधिक जागरूक आणि एकसंघ बनवतात.”

