ग्रामगीता अध्याय सत्ताविसावा

संत तुकडोजी महाराज

ग्रामगीता अध्याय सत्ताविसावा

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

मूर्तिपूजा नामजप । यांचीं मूळतत्त्वें उज्जवलरूप । परंतु त्यांचा विपर्यास खूप । जाहला लोकीं ॥१॥
देवीदेव दिसती जिकडे तिकडे । सांदी-बिदींचे गोटे खडे । कोणी न बघती तयांकडे । आवडीने ॥२॥
नेमकी प्रभावशाली मूर्ति । जी बघतांचि देई स्फूर्ति । होईल तात्त्विकतेची पूर्ति । ऐसी दिसे क्वचितचि ॥३॥
तेथेहि भाविकतेचा अतिरेक । जेणें बुध्दिमान होती नास्तिक । म्हणती हा गोंधळ असे घातक । भक्तीच्या नांवें ॥४॥
मूर्ति जयाचें स्मारक । त्याच्या गुणाकर्मांची नाही भूक । मूर्तीच देव ठरवोनि लोक । करिती अति वेडेचार ॥५॥
कोठे काकडआरती शेजारती । चाले पंचपदी पूजा पोथी । नाही शिस्त गांभीर्य शांति । सात्विक वृत्ति स्फुरेचि ना ॥६॥
एक जाती एक येती । मधेच वाकडे उभे राहती । फुलें अक्षता कशाहि फेकती । मंत्रपुष्पांजलीच्या ॥७॥
नगारा जातो एकीकडे । टाळ-घंटयांचा गोंधळ उडे । टाळया कसल्या, गारपीट पडे । ऐसेंचि वाटे ॥८॥
असल्या बाजाराने कांही । उपासनातत्त्व साधत नाही । तेथे शिस्त शांति सात्विकता येई । तरीच लाभ सर्वांसि ॥९॥
याचसाठी सामुदायिक प्रार्थना । हा मार्ग दाविला जना । हीच आजची उपासना । सर्वांचिया हिताची ॥१०॥
श्रोतीं विचारिला होता प्रश्न । पंथ भेद मिटाया उपाय कोण ? कैसें राहील ग्रामजीवन । एकजुटीचें ? ॥११॥
नाना पंथ असती गांवीं । भिन्न देव-पूजक वैष्णव-गोसावी । नाना जाती-जमाती एकत्वीं । कैशापरीं वागतील ? ॥१२॥
त्यासीहि सामुदायिक प्रार्थना । हाचि उपाय असे जाणा । जेथे धर्म-पंथ-संत-देव नाना । एकासनीं विराजती ॥१३॥
हा झरा राहिला नित्य शुध्द । तरि गांव होईल सदा सुबुध्द । आणि सामुदायिकतेने समृध्द । सर्व प्रकारें ॥१४॥
यावरि श्रोतीं प्रश्न केला । कैसें करावें सामुदायिक प्रार्थनेला ? जेणें सामुदायिकता गांवाला । प्राप्त होय ॥१५॥
सदभावें गांवांतील जन । करोनिया एक मन । कैसे करितील कार्य पूर्ण । सामुदायिक प्रार्थनेचें ? ॥१६॥
प्रार्थनीं कोणता देव योजावा । जो सर्वांसीच मान्य बरवा ? गांवाचा जेणें समन्वय व्हावा । कैसा ठेवावा पाठ तेथे ? ॥१७॥
मित्रा ! ऐकिले तुझे प्रश्न । तूं बोललासि विचार करून । वेगळेपणाची आहे अडचण । गांवोगांवीं सर्वांच्या ॥१८॥
वस्तुत: छोटीं देव-देवळें । वगळोनि सर्वांनी एके वेळे । एकाच देवुळीं जमावें भावबळें । प्रशांत ऐशा ॥१९॥
विसरोनि आपुला वेगळेपणा । करावी तेथे उपासना । परि हें नये बहुतांच्या मना । म्हणती आमुचें तेंचि थोर ॥२०॥
अनेक मंदिरें अनेक देवता । विचारें लोकां न पटे एकता । त्यांतूनि एक निवडाल कोणता । प्रश्नचि पडे ॥२१॥
हाचि प्रश्न संतांपुढती । पूर्वीहि होता जंव पंथ लढती । म्हणोनीच विठ्ठल ब्रह्ममूर्ति । ठेविला त्यांनी सर्वांपुढे ॥२२॥
सर्व पंथांच्या संतसज्जनीं । केली एकी तये स्थानीं । ज्ञानप्रेमज्योति पेटविली भुवनीं । महाराष्ट्राच्या ॥२३॥
बंगालीं तामस भक्तिप्रथा । सुधाराया उजळिली कृष्णकथा । चैतन्यप्रभूने भाविकां-पंडितां । विविध पंथां एक केलें ॥२४॥
धकाधकीचा काळ पाहिला । संतीं उपास्यांत बदल केला । तुलसीदासें रामदासें दाविला । राम कोदंडधारी ॥२५॥
यापरी देश-कालप्रसंगें । संघटनकेंद्र निवडावें लागे । आजच्या काळीं जुळवाया धागे । कोणतें रूप निवडावें ? ॥२६॥
याचा मागे मीं विचार केला । अधिकाधिक अनुभव घेतला । शेवटीं निश्चयाने निवडला । गुरुदेव माझा ॥२७॥
मीं जरी ’ गुरुदेव माझा ’ म्हटला । तरी तो नव्हे माझाचि भला । तो सर्व प्राणिमात्राचा झाला । कल्याणकारी ॥२८॥
त्यास नाही पंथपक्ष । सर्वदेशी तो सर्वसाक्ष । सर्व देवादिकांचा अध्यक्ष । सदगुरुराजा ॥२९॥
त्यासि सर्वचि मानव सखे । देश-विदेशींचे एकसारखे । नाही धर्म भिन्न त्यांचे निके । एकचि सत्य सर्वांमाजीं ॥३०॥
जैसा आत्मा नाही भिन्न झाला । तैसाचि गुरुदेव संचला । कोणी आकाशाचा तुकडा पाडिला । ऐसें नाही ॥३१॥
सत्य सर्वांचेंचि सत्य असतें । असत्य तें असत्यचि होतें । तैसेचि गुरुदेव सर्वांचे ते । एकचि राहती सर्वस्वी ॥३२॥
वैदिक असो वा त्याहूनि इतर । सर्वचि पंथीं गुरुदेवाचा आदर । इस्लाम, ख्रिस्तादि धर्मींहि थोर । गुरुदेव-भक्ति ॥३३॥
पंथ-प्रचारक गुरु वेगळे । त्यांत असतें द्वैताचें काळें । स्वतंत्र अनुभवी गुरु निराळे । ते पावती ज्ञानयोगें ॥३४॥
गुरु हाडामासांचा नोहे । गुरु नव्हे जाति-संप्रदाय । गुरु शुध्द ज्ञानतत्त्वचि आहे । अनुभवियाचें ॥३५॥
हें ज्ञान ज्यासि लाभलें । ज्याचें मन विश्वाकार झालें । पंथ-पक्ष-धर्म संपले । ज्याच्या ठायीं सर्वचि ॥३६॥
तो सर्वाचा झाला सखा । मानवमात्राचा पाठीराखा । कोणत्याहि भाषेने पारखा । तरी पावे तयासि ॥३७॥
करी सदभावना उत्पन्न । दीनदु:खितांचें पालन । मलीन मार्गाचे करी खंडण । कायावाचामनाने ॥३८॥
म्हणोनीच थोरांनी कथिलें । गुरुचि ब्रह्मा विष्णु झाले । महेश्वरहि गुरुचि बोलिले । याच सामर्थ्यें ॥३९॥
गुरुचि साक्षात ब्रह्म कथिला । सर्वांस व्यापोनि गुरुचि उरला । ऐसा देव म्हणोनि प्रार्थिला । गुरुदेव माझा ॥४०॥
महापुरुष वेगळाले । परि गुरुत्वीं मिळोनि गुरुचि झाले । व्यक्तिपण धर्मपणहि मुरालें । गुरु-स्वरुपीं ॥४१॥
त्याचें पूजन गंधाने नोहे । त्याचें मंदिर विशाल आहे । विशालतेला मर्यादा राहे । परि गुरु त्याहुनि अमर्याद ॥४२॥
भूमंडळ ज्याचें क्षेत्र पूर्ण । सर्व पृथ्वी जयाचें आसन । चंद्रसूर्य नंदादीप जाण । गुरुदेवाचे ॥४३॥
त्यांतचि धर्म-पंथ सामावती । तोचि वेष्टिला सर्वांभवती । त्याचेवांचूनि नाही रिती । जागा कोणी ॥४४॥
त्याचें ज्ञान झालिया जीवा । कोठे द्वेष-कलह-हेवा ? सुखशांतीचा लाभे विसावा । सर्वांठायीं ॥४५॥
म्हणोनि हेंचि व्हावया ज्ञान । विशाल मनें रचिलें साधन । सामुदायिक प्रार्थनेचें स्थान । सामुदायिकपणास्तव ॥४६॥
तेथे सामुदायिक देव कल्पावा । पुढे कार्यातचि अनुभवीत जावा । मग विश्वाकार पहावा । गुरुदेव माझा ॥४७॥
हें झालें गुरुदेवांचें वर्णन । आता ऐका प्रार्थना-साधन । गांव व्हावया उन्नत पूर्ण । तैसेंचि स्थान शोधावें ॥४८॥
विशाल मंदिर या गुरुदेवचौक । जेथे बसतील जन सकळीक । महिला, पुरुष, मुले भाविक । सदभावाने सायंकाळीं ॥४९॥
प्रथम अधिकारी सेवकाने । घेवोनि हातामाजीं झाडणें । त्वरित करावें मैदान निर्दळवाणें । प्रार्थनेसाठी ॥५०॥
येतां प्रत्येक गुरुवार । जाऊनि फिरावें घरोघर । बोलवावी प्रार्थनास्थानीं सत्वर । जनता सारी ॥५१॥
आईबाई सकळ सज्जन । मुलेबाळें वृध्द-तरुण । देवोनिया निमंत्रण । बोलवावे प्रार्थनेसि ॥५२॥
गांवीं सर्वांसि निरोप द्यावा । परस्परें समाज सारा जुळवा । येतांना घोंगडी गोणपाट आणावा । आपापला म्हणोनि ॥५३॥
सकळांनी करावी बिछायत । सर्वांना रांगेंत बसवावें शांत । सदभावना वाढे सकळांच्या मनांत । प्रार्थनेची ॥५४॥
सात्विक असावें वातावरण । अतिशांत ऐसें गंभीरपण । सर्वांनी करावें बंद संभाषण । तया स्थानीं ॥५५॥
आधी पुढे मांडावें अधिष्ठान । त्यावरि आच्छादावें सुंदर आसन । आपुल्याच गांवीं केलेलें पूर्ण । कलाकुसरीने खादीचें ॥५६॥
वरि ठेवावा तकिया साजिरा । जैसा कोणी बसतोच आसनीं बरा । दिसावा ऐसा मोहक पसारा । सात्विकतेचा ॥५७॥
जवळचि बसावे सूचक, गायक । तिसरे भाषण देणारे भाविक । दुसर्‍या बाजूने पुजारी, पाठक । नामधून म्हणावया ॥५८॥
ऐसा प्रार्थनेचा संच झाला । चहुबाजूंनी सेवकगण बसला । पाठीमागे संरक्षक दिसला । उभा तेथे ॥५९॥
तयाचें काम शांतता राखणें । भोवताली गलबला थांबवणें । सर्वांना शिस्तीमाजीं बसवणें । हळुवारपणाने ॥६०॥
जे कोणी येतील मागाहून । त्यांना बसवावें क्रमाने पूर्ण । मग करावें घंटीवादन । दोनचि ठोके ॥६१॥
उभा राही अधिष्ठानापुढे पुजारी । लावी शांतिने धूपदीपिका बरी । मग सूचक उभा राहतो सामोरी । सूचना द्याया प्रार्थनेची ॥६२॥
सर्वामिळोनि पाठ करवी । एकस्वरें शांतता भरवी । ऐसी प्रार्थना लावील चवी । अंत:करण मोहावया ॥६३॥
सहज लागेल तिकडे ध्यान । ऐसें चालावें प्रार्थनीं गायन । पुढे होईल नामस्मरण । गुरुदेवाचें ॥६४॥
ज्यांत असेल कुणीहि नाम । निवारोनि भेदभ्रम । सर्व धर्मी भाव सम । राखावया सर्वांचा ॥६५॥
हें संपतां भाषणासाठी । देईल सूचक सूचना ओठीं । मग भाषणाधिकारी शेवटीं । देईल भाषण सदभावें ॥६६॥
” आपण सर्व एकचि आहों । मग भिन्नपण कासया पाहों ? सर्वांशीं सहकार्य करा हो ! कुटुंबापरी ॥६७॥
मानव विश्वकुटुंबाचा घटक । ऐसें समजोनि वर्तावें सम्यक । शक्ति द्यावया प्रार्थावी भाक । शक्तिवंतापुढे ॥६८॥
सर्व संत एकचि असती । सर्व देव एकचि निश्चितीं । सर्वांचे संदेश ऐकतां पावती । एकचि तत्त्व सर्वहि ॥६९॥
म्हणोनि सर्वांनी सहकार्य करावें । जैसें ज्याकडोनि बनेल बरवें । संसारा स्वर्गासमान बनवावें । आपुल्यापरीं ॥७०॥
हेंचि सांगावें प्रार्थनेवरि । यांतचि आहे सेवा ईश्वरी । याहूनि भिन्न नाही कुसरी । परमार्थाची ” ॥७१॥
हें भाषण  झालिया पूर्ण । मग शान्तिपाठ सर्वांनी करोन । करावें एकनिष्ठेने नमन । एकाच पध्दतीने ॥७२॥
सूचकाने सूचना द्यावी । सर्व मंडळी उभी करावी । जयजयघोषें दूमदुमवावी । ऊर्वि अवघी ॥७३॥
गुरुदेवाचा जयजयकार । त्यांत ये सर्वदेवनमस्कार । ऐसें प्रार्थनेचें तत्त्व सुंदर । बोलिलों तुम्हां ॥७४॥
चौकीं प्रार्थना संपल्यावरि । आपापली घोंगडी पासोडी बरी । उचलूनि न्यावी आपुल्या घरीं । सेवा पुरी करोनिया ॥७५॥
येथे प्रार्थनापाठ नाही बोलिला । तो विषय अन्य ग्रंथीं आला । म्हणोनि येथे नाही विवरिला । पहावा ’ सक्रियपाठीं ’ ॥७६॥
मित्रहो ! ऐका माझें वचन । जरि व्हावें वाटे गांवाचें कल्याण । तरि सामुदायिक प्रार्थना-साधन । सोडूं नका कधीहि ॥७७॥
एवढें अनुभवें सांगोनि ठेवितों । प्रार्थनाच मी गांवाचें धन समजतों । यानेच स्वर्ग मोक्षहि पावतो । समाज अपुला ॥७८॥
आमचा देव समाजीं वसतो । समाजाकरितां सर्व करतो । सर्वांस व्यापूनि राहतो । प्रार्थनेच्या आसनीं ॥७९॥
तो भेटतो जनकार्यांनी । आम्ही केली प्रार्थना म्हणोनि । भरली भावना आत्मा ओतोनि । प्रार्थनीं या ॥८०॥
आपण होता प्रश्न पुसला । म्हणोनि ऐसा विस्तार केला । प्रार्थनीं तल्लीन होतांचि देव कळला । विशाल स्वरूपी ॥८१॥
त्या मूलतत्त्वाचा जो अनुभव । ज्ञानगम्य विश्वात्मक देव । तोचि मानिला गुरुदेव । प्रार्थनीं आम्ही ॥८२॥
त्या गुरुदेवाच्या अधिष्ठानावरि । मूर्तीच हवी असेल जरि । कल्पावी आपापल्या इच्छेपरी । कोणत्याहि देवाची ॥८३॥
देव गुरुदेवांत सामावले । भक्त तेवढे प्रार्थनीं एक झाले । मानवतेचें मंदिर उघडलें । विश्वामाजीं या रूपें ॥८४॥
एकाची प्रार्थना अनेक मिळाया । अनेकांची प्रार्थना अनंत कळाया । अनंत तत्त्वीं एकत्व पावावया । प्रार्थना आहे ॥८५॥
हें समजोनीच हा मार्ग धरिला । आदर द्याया भिन्नधर्मपंथांला । पूज्य मानावया सर्व संतांला । प्रार्थनेमाजीं ॥८६॥
यासाठी व्यापक प्रार्थना मांडली । उपासकांची वेली गुंफली । कळावया सर्व धर्मांची खोली । मूळरूपें ॥८७॥
वेदउपनिषदांची प्रार्थना । ’ सुख हो सर्वचि प्राणीजना ’ । सर्वांची उन्नति हीच धारणा । प्रार्थनेमाजीं ऋषींची ॥८८॥
येशूख्रिस्ताने प्रार्थना केली । सर्वांसाठी शांति मागितली । सहनशक्तीची देवता पावली । तयालागी ॥८९॥
महंमदाने केली प्रार्थना । विखुरला इस्लाम कराया शहाणा । संघटित केलें त्याने स्वजना । तया काळीं ॥९०॥
पावित्र्य शिकविलें झरतुष्ट्राने । संयम शिकविला महावीराने । अहिंसक संघ वाढविला बुध्दाने । प्रार्थनेद्वारें ॥९१॥
संतांचें नामसंकीर्तन । तें सामुदायिक प्रार्थनेचेंचि रूप जाण । सर्व देव-स्मरणें करोनि संघटन । दिलें ज्ञान सर्व जना ॥९२॥
कलियुगीं भक्ति-महिमान । भजन आणि नामसंकीर्तन । यज्ञांत श्रेष्ठ नामजपयज्ञ । प्रार्थनेंते आलें तें सारें ॥९३॥
मूर्तिउपासना आणि ध्यान । नवविधा भक्तीचा सार पूर्ण । प्रार्थनीं सर्वचि साधे साधन । सर्व जनांसि ॥९४॥
शिस्त, शांति, गांभीर्यादि गण । उठण्या-बसण्या-बोलण्याचें ज्ञान । लाभे मानव्याचें शिक्षण । प्रार्थनेमाजीं ॥९५॥
प्रार्थना मानव्यशिक्षणाची शाळा । ग्रामसंस्कृतीचा मुख्य जिव्हाळा । भेदकल्पना जाती रसातळा । प्रार्थनेच्या मुशीमाजीं ॥९६॥
’ सर्वचि आपण बंधुजन ’ हा भाव वाढ घे मनोमन । गांवाची स्वर्गीयता असे अवलंबून । याचवरि ॥९७॥
सकळांस कळाया ही संस्कृति । उपदेश द्यावा प्रार्थनेअंतीं । ही नित्य ठेवावी चालीरीति । गांवीं आपुल्या ॥९८॥
ही प्रार्थना गांवीं राही जागती । तरि जिवंत राहील गांवसंस्कृति । सामुदायिकतेची दीपज्योति । प्रकाशेल सर्वकाळ ॥९९॥
विश्वीं होऊं शकेल शांतता । तेथे गांवाची कोण कथा ? सामुदायिक प्रार्थनाच करील एकता । नित्यासाठी, तुकडया म्हणे ॥१००॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । कथिलीं प्रार्थना ग्रामोध्दारार्थ । सत्ताविसावा अध्याय संपूर्ण ॥१०१॥

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥


सविस्तर सारांश – देवदेवळे

ग्रामगीतेच्या सत्ताविसाव्या अध्यायाचे नाव “देवदेवळे” असे आहे. या अध्यायात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देव, देवळे, उपासना आणि धर्म यांचे खरे स्वरूप स्पष्ट केले आहे. समाजामध्ये देवळांना आणि धार्मिक स्थळांना महत्त्वाचे स्थान असले तरी त्यांचा उद्देश केवळ पूजा-अर्चा किंवा कर्मकांडापुरता मर्यादित नसावा. देवळे ही समाजजागृती, नैतिक शिक्षण आणि लोककल्याणाची केंद्रे बनली पाहिजेत, हा या अध्यायाचा मुख्य संदेश आहे.

तुकडोजी महाराज सांगतात की देव हा केवळ दगडाच्या मूर्तीत किंवा एखाद्या विशिष्ट स्थळी मर्यादित नसतो. परमेश्वर सर्वत्र आहे आणि प्रत्येक जीवामध्ये त्याचे अस्तित्व आहे. त्यामुळे देवाची उपासना करताना मानवतेची सेवा, सदाचार आणि प्रेमभाव यांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे.

या अध्यायात मंदिरांचे सामाजिक महत्त्व स्पष्ट केले आहे. पूर्वी देवळे ही केवळ धार्मिक स्थळे नव्हती, तर समाजजीवनाची केंद्रे होती. तेथे लोक एकत्र येत, विचारांची देवाणघेवाण होत असे, शिक्षण दिले जात असे आणि समाजहिताचे निर्णय घेतले जात असत. त्यामुळे देवळे समाजसंघटनाचे प्रभावी माध्यम होती.

तुकडोजी महाराज सांगतात की कालांतराने अनेक ठिकाणी मंदिरांचा मूळ हेतू विसरला गेला. काही ठिकाणी कर्मकांड, अंधश्रद्धा, दिखाऊपणा आणि आर्थिक स्वार्थ यांना अधिक महत्त्व मिळाले. यामुळे धर्माचा खरा संदेश मागे पडला. म्हणून मंदिरांना पुन्हा लोककल्याणाच्या कार्याशी जोडण्याची आवश्यकता आहे.

या अध्यायात बाह्य पूजा आणि अंतःकरणातील भक्ती यांतील फरक स्पष्ट केला आहे. केवळ फुले अर्पण करणे, प्रदक्षिणा घालणे किंवा विधी करणे यालाच भक्ती म्हणता येत नाही. सत्य, सेवा, करुणा, प्रामाणिकपणा आणि सदाचार यांचा स्वीकार केल्यासच उपासना अर्थपूर्ण ठरते.

तुकडोजी महाराज अंधश्रद्धा आणि चुकीच्या धार्मिक समजुतींवर टीका करतात. देवाला प्रसन्न करण्यासाठी अविवेकी प्रथा, खर्चिक विधी किंवा समाजहिताला बाधा आणणाऱ्या गोष्टी करणे योग्य नाही. धर्माने माणसाला विवेक, नैतिकता आणि मानवतेचा मार्ग दाखवला पाहिजे.

या अध्यायात मंदिरांच्या व्यवस्थापनाबद्दलही विचार मांडले आहेत. मंदिरांमध्ये जमा होणाऱ्या साधनसंपत्तीचा उपयोग शिक्षण, आरोग्य, समाजसेवा आणि गरजूंना मदत यांसारख्या लोकहिताच्या कार्यांसाठी केला पाहिजे. देवळे समाजाच्या उन्नतीची केंद्रे बनली तर त्यांचे महत्त्व अधिक वाढेल.

तुकडोजी महाराजांच्या मते मंदिर हे केवळ एका समाजघटकाचे किंवा वर्गाचे नसावे. सर्वांना समान अधिकाराने प्रवेश आणि सहभाग मिळाला पाहिजे. देवासमोर सर्व मानव समान आहेत. त्यामुळे भेदभाव, अस्पृश्यता किंवा अन्याय यांना धार्मिक स्थळांमध्ये स्थान नसावे.

या अध्यायात सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. लोकांनी एकत्र येऊन प्रार्थना, भजन, कीर्तन आणि सत्संग यांद्वारे समाजात नैतिक मूल्ये आणि बंधुभाव वाढवावा. सामूहिक उपासना समाजातील ऐक्य अधिक दृढ करते.

तुकडोजी महाराज सांगतात की खरे देवालय म्हणजे शुद्ध मन. मनात लोभ, द्वेष, मत्सर आणि अहंकार असेल तर बाह्य पूजा निरर्थक ठरते. मन शुद्ध, प्रेमळ आणि सेवाभावी असेल तर प्रत्येक ठिकाणी देवाचे दर्शन घडू शकते.

अध्यायाच्या शेवटी ते स्पष्ट करतात की देवळांचा उपयोग समाजजागृती, संस्कारवृद्धी आणि मानवसेवेसाठी झाला पाहिजे. धर्म आणि अध्यात्म यांचे अंतिम ध्येय मानवकल्याण आहे. त्यामुळे देवभक्ती आणि लोकसेवा यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे.

अध्यायाचा मुख्य संदेश

“देव सर्वत्र आहे आणि मानवसेवेतच त्याचे खरे दर्शन घडते. देवळे ही केवळ पूजा-अर्चेची स्थळे नसून समाजजागृती, संस्कार आणि लोककल्याणाची केंद्रे असली पाहिजेत. सदाचार, सेवा, समता आणि प्रेम यांवर आधारित भक्तीच खरी उपासना आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Scroll to Top