ग्रामगीता अध्याय तेरावा

ग्रामगीता

ग्रामगीता अध्याय तेरावा

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे । हें सूत्र ध्यानीं ठेवोनि खरें । आपुलें ग्रामचि करावें गोजिरें । शहराहूनि ॥१॥
हें गांवीचे लोक विसरले । आळसाद्वारें दुर्दैव शिरलें । दैन्य दारिद्रय सर्वत्र भरलें । गांवामाजीं ॥२॥
शहरीं यंत्रादिकें आलीं । गांवची उद्योगकला मेली । कुशल माणसें शहरीं गेलीं । उद्योगासाठी ॥३॥
शहरीं गेली गांवची बुध्दि । शहरीं गेली गांवची समृध्दि । कष्टाळू शक्ति, हस्तकलासिध्दि । तेहि गेली ॥४॥
गांवीं उरली मुख्यत: शेती । ती कशीबशी चालविती । विशेष बुध्दि, शक्ति, संपत्ति । यांचा ओघ दुसरीकडे ॥५॥
उत्तम शिक्षित, सामर्थ्यवान । ते नोकरीसाठी फिरती वणवण । उद्योगधंदे वा शेती कोठून । होईल उन्नत गांवची ? ॥६॥
हे सर्व जरि लक्ष पुरविती । तरि छोटे उद्योग आणि शेती । निश्चयें सर्वांसि पोषिती । बेकार दीन कोणी नुरे ॥७॥
कारण, गांवींच कच्चा माल । ज्यावरि जगतां येई खुशाल । तो गांवीं पक्का नोहे म्हणोनि हाल । गांवाचे आमुच्या ॥८॥
कच्चा माल मातीच्या भावें । तो पक्का होतां चौपटीने घ्यावें । मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे ? पिकवोनीहि ते उपाशी ॥९॥
त्यांच्या सुखाचें मुख्य साधन । सर्वतोपरी स्वावलंबन । शहरावरि न राहतां अवलंबून । काम करावें सर्वांनी ॥१०॥
उत्तम बुध्दि कौशल्य ज्ञान । शक्ति सामर्थ्य इकडे योजून । गांवीं वाढवावें स्वावलंबन । आळस झाडून सर्वांचा ॥११॥
जिकडे तिकडे स्वावलंबनप्रेम । घरोघरीं चालावें कांही काम । आपुलें करोनि दुसर्‍यासि निष्काम । मदत करावी मानवांनी ॥१२॥
घरीं मुलाबाळांनीहि राबावे । शेतीं कामधंदे हस्तें करावे । बायकापोरांसहित सुखी व्हावें । कष्ट करोनिया ॥१३॥
हातीं उद्योगाचें साधन । मुखीं रामनामाचें चिंतन । हाचि धर्म आहे महान । गांवकरी लोकांचा ॥१४॥
गांवचा एकेक घटक । बनवावा कलावंत सेवक । जो आपुलें घर सुरेख । करोनि गांवा शोभवी ॥१५॥
कष्ट करणाराचें जीवन । शोभा देतें देवाप्रमाण । स्वत: स्वावलंबी होऊन । सहकार्य करी जो गांवाशीं ॥१६॥
पहिलें पाऊल घरचा धंदा । दुसरें पाऊल दारच्या प्रबंधा । पुढे ग्रामसफाईच्या छंदा । लावोनि घ्यावें आनंदें ॥१७॥
असें हें कष्टाचें स्वरूप । वाढवीत जावें आपोआप । नाना कलांचें देणें रूप । कष्टालागी शिकावें ॥१८॥
कला असे मानवासि भूषण । परि पाहिजे जीवनाचें त्यांत स्मरण । जगावें सुखसमाधान । धरोनिया अंतरीं ॥१९॥
ऐसी असावी सर्व कला । नाहीतरि वाया गेला । प्राणी जन्मला आणि मेला । नाहकचि ॥२०॥
कलेनेच माणसाची ओळख । एरव्ही कोण पुसतो आणिक ? तुम्ही आहांत रांव की रंक । आता कोणी पुसेना ॥२१॥
जरी असले कोणी धनवान । तरी व्हावें त्यांनी कलापूर्ण । यांतचि आहे शहाणपण । श्रीमंतांचें ॥२२॥
नाहीतरि घरचे सर्वचि बेताल । समजेना गाणें-वाजवणें समकाल । परि गाणारे आणोनि खुशाल । जागरण करविती प्रयासें ॥२३॥
म्हणती आमुचा उत्सव महान । करावें कांही नवरात्र म्हणोन । यासाठी आणिले गाणारे कलावान । देवापाशी ॥२४॥
आम्हांस कांहीच कळेना । म्हणोनि बोलाविलें ऐकणारांना । त्यांनी ऐकाव्या गाण्याच्या ताना । आम्ही हसावें पाहोनि ॥२५॥
काय करावी ऐसी रीति ? आपणासि नसे ज्याची मति । त्यापेक्षा आपणहि शिकावी कोणतीं । कला अंगीं ॥२६॥
दुसर्‍याचा राजहंसा बरवा । आपला असेनाका पारवा । परि स्वावलंबी कलेचा रावा । बोलवावा प्रत्येकाने ॥२७॥
अहो ! जीवनाची एक तरी कला । असावी लागते मानवाला । तरीच तो ’ मानव ’ शोभला । नाहीतरि कल्ला जीवनाचा ॥२८॥
गोड बोलण्याची कला । नेटकें राहण्याची कला । अंग-मेहनतीची कला । आवश्यक आहे जीवनासि ॥२९॥
सुंदर लिहिणें अक्षरओळी । स्पष्ट वाचणें पुस्तकें सगळीं । जरा न दिसे टाळाटाळी । कोठेहि कलावंताची ॥३०॥
जीवनांत यावा सरळपणा । साधा सात्विकतेचा बाणा । हृदय-निर्मळतेचा निशाणा । कलावंताचा धर्म हा ॥३१॥
एरव्ही कला सर्वांनाच येते । कलेवांचून नाही रिते । परि तारतम्य पाहिजे तेथे । लोकांपुढे न्यावया ॥३२॥
कष्ट करोनि आपुल्या हातें । आदर्श करावें घरातें । असेल जरी झोपडी ते । भासवावी नंदनवन ॥३३॥
माती मिळवोनि घरें बांधलीं । परि चुन्यापेक्षाहि सुंदरता आली । थोडके पैसे लावोनि केली । रचना सगळी घराची ॥३४॥
आपुल्या गांवींच विटा केल्या । मडकीं-सुरया ओतल्या भाजल्या । कवेलू-कुंडयांसहित निर्मिल्या । आपुल्या गांवीं ॥३५॥
लाकडें तासोनि सरळ केलीं । त्यांत सात्विकतेची प्रतिभा भरली । गांवाच्या सुताराला आली । कला आमुच्या ॥३६॥
गांवींच केले हातोडे-खिळे । ऐरणी-कुर्‍हाडी सापळे-विळे । पावडे-कुदळया शिंके आदि सगळें । सामान जीवनाचें ॥३७॥
दगड फोडोनि फाडी केली । सरळ चिरेदार टापोनि छाटली । इमारतीस बसवितां दिसली । सुंदर सगळी ॥३८॥
फडे झाडणी चटई नवार । पलंग पायपूस मोटसंदोर । सुंदर केले डवरे वखर । नव्या धर्तीचें ॥३९॥
कापूस पिंजोनि सूत कातलें । सुंदर वस्त्र स्वेटर विणलें । बेरडया मुसके दोर बनविले । जाळें उतारीसहित ॥४०॥
कोणी केली शेतीची रचना । धुरेबंधारे वाफे नाना । पाहतां दिसती सरळ लैना । शेतीमाजीं ॥४१॥
झाडें दिसती ओळींत बध्द । सरळ सुंदर हिरवीं शुध्द । घरमालकचि करी खुद्द । काम आपुल्या हातांनी ॥४२॥
घराभोंवती बाग केली । सांडपाण्यावरि झाडें वाढलीं । फळाफुलांचीं रोपें वेली । भाजीपाला नित्याचा ॥४३॥
घरांतूनि बाहेर दिसेना पाणी । प्रवाह करीतसे आंतूनि । धूर जातसे धुराडयांतूनि । गोठयांत गोमूत्र न साचे ॥४४॥
घरामाजीं निर्मळपण । टापटिपीचें वर्तन । प्रत्येक वस्तु ठेविल्याचें स्थान । सरळ दिसे पाहतांचि ॥४५॥
सर्व वस्तूंचीं लिहिलीं नांवें । सामान घेतां नलगे सांगावें । घरीं येताचि दिसतें बरवें । काय आहे ॥४६॥
दारासमोर जें जें दिसलें । तें तें कलेनेचि सुंदर सजलें । आपुल्याच गांवीं निर्मिलें । कलाकारांनी ॥४७॥
जरा न दिसते उसनी ऐट । परकीयांकडोन करविला थाट । सामान आणलें भरमसाट । परदेशींचें ॥४८॥
जें दिसलें तें आपुल्याच गांवींचें । अथवा प्रांतींचें देशींचें । तेणें कौतुकचि आमुचें । सर्व करिती ॥४९॥
ऐसी घरादारांची सुंदरता । आपणचि आणावी स्वता । कोणीहि डोळे भरोनि पाहतां । प्रसन्न होती अंतरीं ॥५०॥
ऐसी कला असावी कष्टार्जित । स्वावलंबी उद्योगें उन्नत । नखशिखान्त ओजहि त्यांत । जो जीवन जागवी देशाचें ॥५१॥
कुणाची कला शरीर भूषवी । कुणाची घरीं टापटीप दर्शवी । कुणाची कला गांवचि सजवी । हौसेने आपल्या ॥५२॥
मानवी कला गांव शोभवी । गांवाची कला प्रांत जागवी । प्रांताची कला देश भूषवी । वैशिष्टयाने ॥५३॥
ही सर्व कलाकुसरी । मानवासचि साधे बरी । परि योजकता असावी अंतरीं । कलावंताच्या ॥५४॥
नाहीतरि टोप शिरीं विदेशी । आणि खादीपंचा कटीसि । मारूतीचें तोंड लंबोदरासि । ऐसें होतें ॥५५॥
एकाने दिवाणखाना सुंदर केला । पाहतांना आनंद झाला । परि शौचकूपचि बिघडला । होता त्याचा ॥५६॥
परिचय घेणारा आला घरीं । प्रथमचि चढला शौचगृहाभीतरी । आंत पसरली घाणचि सारी । स्वच्छता खरी दिसेना ॥५७॥
मग पाहिलें स्वयंपाकघर । कांदे बटाटे यांचें फोतर । चुलीआंतचि राख-केर । झाडूनि नव्हता लागला ॥५८॥
पानाचा पीक कोपर्‍यांत । कपाटामागे घाण बहुत । दुमडूनि बघतां सुंदर बिछायत । कचराकागद त्याखाली ॥५९॥
म्हणे वा हो कलावंत ! बघा जरा जावोनि आंत । सारवण झालें नाही सात । दिवसापासोनि दिसतसे ॥६०॥
बाकी सगळें केलें सुंदर । परि एवढेंचि गालबोट त्यावर । ऐसें असों नये अंतर । कलेमाजीं ॥६१॥
कला असावी सर्वनिपुण । आंतबाहेर निर्मळ पूर्ण । हात फिरे तेथे लक्ष्मी धांवोन । येते मग ॥६२॥
यापरी कलेने घर सजविलें । आपुलें जीवन सुंदर केलें । परि गांव असेल बिघडलें । तरि तें सौंदर्य टिकेना ॥६३॥
काळया शरीरावरि कोड । तैसें दिसेल तें एकटें धेंड । म्हणोनि गांव करावें आदर्श सुघड । कलांनी आपुल्या ॥६४॥
गांवीं असावीं सेवकमंडळें । ज्यांना ’ मुखीं राम हातीं काम ’ हें कळे । अखंड चालविती कामाचें सोहळे । ग्रामसेवेसाठी ॥६५॥
श्रमदानाचे सप्ताह घेवोनि । रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी । शोषक खड्डे मोर्‍या करोनि । सांडपाणी थांबवावें ॥६६॥
रस्त्यामाजीं एकार्‍या असती । पांदण झाली निमुळती । गोखरू कांटे झुडपें वाढती । सर्व व्यवस्था लावावी ॥६७॥
डोब साचते पडती डेरे । ठीक करावें मार्गी सारें । शौचगृहेंहि नव्या प्रकारें । निर्मावी सर्वांसाठी ॥६८॥
नदी तळयाकांठची स्वच्छता । तेथे पार घाट आदींची व्यवस्था । उत्पादन वाढवाया तत्त्वता । उपयोग घ्यावा जलाचा ॥६९॥
गांवांतील मार्ग विहिरी घरें । सुंदर सजवावीं पशूंचीं कुटीरें । ठायीं ठायीं मुत्रीघरें । नाल्या करणें निर्माण ॥७०॥
सडकांचिया दुतर्फा छान । सर्वांनी करावें वृक्षारोपण । ढोले ठेवावे मधामधांतून । कचरा त्यांत टाकावया ॥७१॥
चहूं दिशांनी गांव सुंदर । वारे करोत जीवनसंचार । कोठेहि घाण घर । पाहतांना न दिसावें ॥७२॥
घरें मोडकीं असतील कोठे । सर्वांनीं जावें तया वाटें । मिळोनि करावें चोखटें । ’ हाहि आमुचा ’ म्हणोनिया ॥७३॥
घरें खिडक्यावीण अंधारीं । कोंदट दमट बसकीं सारीं । गुरांचा गोठा घराभीतरी । ऐसें राहूं न द्यावें ॥७४॥
गोटे ओटे करावे दुरुस्त । कोपरे खंडारे गैरशिस्त । राहूं न द्यावे अस्ताव्यस्त । वाकडे तिकडे ॥७५॥
हे सर्व खणोनि काढावे । दोरीलैन धरोनि नवे । मोकळेचाकळे मार्ग करावे । उल्हासवावें जनलोकां ॥७६॥
मार्गी असावा लाकूडगोटा । साफ दिसाव्या चारी वाटा । कोणी अडला असेल करंटा । त्यास वळवावें गांवाने ॥७७॥
कुंपकाटी गवती शाकार । गांवीं नसावा शक्यतोंवर । उडवे-हुडे पुंजा-केर । भलतैसा न राहूं द्यावा ॥७८॥
फास गवतगंजी कडबागूड । भूस उपणणें अथवा खळवाड । कुंभार-आवा अग्निकुंड । सुरक्षित जागा नेमाव्या त्यांच्या ॥७९॥
मेलीं जनावरें कोठेहि नेलीं । गांवभरी घाण मांसहाडें आलीं । ऐसें न व्हाया पाहिजे नेमिली । जागा उघडण्या-गाडण्याची ॥८०॥
जेथे तेथे सूचनाफलक । लाविले पाहिजेत मार्गदर्शक । शोभवावेत रस्ते चौक । थोरांचिया नांवांनी ॥८१॥
मार्गावरि अंधार पडे । तेथे प्रकाशाची व्यवस्था घडे । ऐसें करावें चहूकडे । कार्यकर्त्यांनी ॥८२॥
गांवीं शाळा निर्माण करावी । कोंडवाडयाचीहि व्यवस्था व्हावी । बाजारगुजरी अवश्य असावी । सोयीसाठी व्यवस्थित ॥८३॥
नाहीतरि गांवीं बाजार भरला । शिस्त नाही दुकानाला । कोणताहि माल कोठे ठेवला । झाला सगळा कल्लोळ ॥८४॥
लोक एकमेकांस खेटती । कांहीकांचे खिसे कांपती । नाही समजली चालरीती । माणुसकीची ॥८५॥
तरुण पाहती भलतीकडे । बोल बोलती वेडेवाकडे । चालती इकडे पाहती तिकडे । तेणें धक्के बसती लोकां ॥८६॥
कोणी मधेच माल उपणती । खुंटया गाडती गाडया सोडती । बकर्‍या-गायी मोकाट फिरती । मधेच मांडती मिरच्याहि ॥८७॥
लैन नाही दुकानांप्रति । कोणीहि कोठे माल मांडती । या सर्वांमुळे होते फजीती । घेणारा आणि देणारांची ॥८८॥
त्यांत माशांचा अवघा घोळका । कोणी म्हणेना कोणा एका । सर्वत्र पैसा कमावण्याचा झोका । चालतसे हौसेने ॥८९॥
कोणी म्हणेल ऐसें कां करतो ? दुकानदार म्हणे आम्ही कर देतो । मग आम्हांला कोण काय म्हणतो । सांगा सांगा ! ॥९०॥
ऐसें जेथे जेथे होतें । दुरुस्त करावें सगळें तेथे । प्रेमाने सांगून पाहतां सर्वानुमतें । कोणी हट्ट करीना ॥९१॥
आपुलें जेव्हा जन न ऐकती । तेव्हा सभाद्वारें करावी दुरुस्ती । सांगून पाहावें सरकारप्रति । दुरुस्त कराया गांव सारें ॥९२॥
मुख्य आपुली असावी समिति । जी सुंदर ठेवील बाजाराप्रति । वजनें, मापें, माल, जागा, पध्दति । सर्व चोख करावया ॥९३॥
सर्वांच्या पिकांचिया रक्षणा । गांवीं येऊं न द्याया वानरसेना । ऐशाहि कराव्या समित्या संघटना । नाना कार्यास्तव ॥९४॥
सर्वांगीण असावी ग्रामरचना । मनोरंजनासहित पुरावाव्यात भावना । जेणें करून ग्रामवासीयांना । आठव ना ये शहराचा ॥९५॥
व्याख्यानें कीर्तनें कलापथक । वादविवाद पोवाडे नाटकें सात्विक । ऐसी नित्य नवनवी करमणूक । गांवीं चालवावी सर्वांनी ॥९६॥
एक असावा सुंदर बाग । त्यांत मनस्वाथ्याचेंचि असावें अंग । प्रसन्नता वाढाया नाना रंग । वृक्षवेली लताकुंज ॥९७॥
त्यांत क्रीडांगणें पाळणें । बालक-युवकांचीं प्रसन्नविती मनें । जातीपातीचें विसरोनि रडगाणें । सहजभावें चालवावीं ॥९८॥
गांवीं विश्रामगृह असावें । ज्यांत पाहुणे उत्साही बरवे । सर्वांस मुक्तद्वार ठेवावें । उतरविण्यासाठी ॥९९॥
तेथे असावी सुंदर विहीर । पाणी पिण्यासि थंडगार । वचनें असावीं उदबोधक सुंदर । भिंतीवरि सर्व ॥१००॥
सुंदर करावा आखाडा । मुलें बागडती उल्हासें तडतडा । आदर्श मल्ल-खेळाडूंचा धडा । गिरवावया ॥१०१॥
सुंदर मुलांचीं शरीरें । दिसती गुलाब जैसे गोजिरे । बागचि फुलले हरेभरे । सुपुत्रांचें ॥१०२॥
सुंदर असावें वाचनालय । नाना ग्रंथ ज्ञानमय । करावया सुबुध्दीचा उदय । गांव-लोकीं ॥१०३॥
काय चाललें जगामाजी । कळावें गांवीं सहजासहजीं । म्हणोनि वृत्तपत्रें असावीं ताजीं । आकाशवाणीहि त्याठायीं ॥१०४॥
तैसेंचि असावें हस्तलिखित मासिक । अक्षर गांवाचें व्हाया सुरेख । लेखनचित्रादि कलांचें कौतुक । वाढेल गांवीं ॥१०५॥
सहज कळावे विचार आणि वृत्त । म्हणोनि फळा असावा चौकांत । ती जणूं ज्ञानेश्वराची भिंत । ज्ञान देई सर्वांसि ॥१०६॥
अक्षरशत्रूंना सामर्थ्य यावें । म्हणोनि प्रौढशिक्षण चालवावें । घराघरावरि नंबर द्यावे । नामपाटी लावोनिया ॥१०७॥
गुराढोरांचीं औषधें जाणती । साह्य द्यावें त्या ग्रामीणांप्रति । अनुभूत नुसखे लोकगीतादि किती । संग्रह त्यांचा करावा ॥१०८॥
गांवचें आरोग्य असावें उत्तम । सर्व प्राणीमात्रासि लाभावें क्षेम । म्हणोनि चालवावें आरोग्यधाम । गांवामाजी ॥१०९॥
आपुल्याच गांवची वृक्षवल्ली । कंदमुळें आणोनि औषधें केलीं । निसर्ग-उपचारासहित दिलीं । पाहिजेत वैद्यें ॥११०॥
चालवावें ऐसा वैद्यांप्रति । सर्पादि विषें उतरविती । घाव बुजविती हाड जुळविती । औषधें ऐसीं अनुभवोनि ॥१११॥
जेथे पुरुषांचा दवाखाना । तेथे हवी सूतिकागृहाचीहि योजना । दोहोंचीहि आवश्यकता ग्रामजना । भासतसे अत्यंत ॥११२॥
गांवचे वैद्य गांवच्या सुईणी । गांवें घ्याव्या तयार करोनि । नवनवीं ज्ञानसाधनें देवोनि । सर्वतोपरीं ॥११३॥
गांवीं असावें पोस्टस्थान । त्वरित कळावया वर्तमान । परस्परांचा व्यवहार पूर्ण । पत्रोपत्रीं चालावया ॥११४॥
ऐशा सर्वचि सुखसोयी । लोक करूं शकतील निश्ययी । स्वावलंबी राहूनि सर्वहि । देतील जेव्हा सहकार्य ॥११५॥
प्रत्येकाचा कितीतरि वेळ । श्रमशक्ति आणि बुध्दीचें बळ । व्यर्थ जातसे तें उपयोगी सकळ । लावितां गांव सुखी होई ॥११६॥
ऐसें गांव होतां आदर्शपूर्ण । शहराहूनीहि नंदनवन । सर्वांचें करील आकर्षण । सुंदर जीवन तुकडया म्हणे ॥११७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । स्वावलंबी ग्रामनिर्माणकला-कथित । तेरावा अध्याय संपूर्ण ॥११८॥

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥


सविस्तर सारांश – ग्रामनिर्माणकला

ग्रामगीतेच्या तेराव्या अध्यायाचे नाव “ग्रामनिर्माणकला” असे आहे. या अध्यायात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आदर्श गाव कसे निर्माण करावे, ग्रामविकासाची दिशा काय असावी आणि ग्रामजीवन सर्वांगीण समृद्ध करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. ग्रामरक्षण आणि ग्रामशुद्धी यांनंतर ग्रामनिर्माण ही पुढची नैसर्गिक पायरी असल्याचे ते स्पष्ट करतात.

तुकडोजी महाराजांच्या मते गाव ही केवळ लोकांची वस्ती नसून एक जिवंत सामाजिक संस्था आहे. गावातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक संस्था आणि प्रत्येक सार्वजनिक व्यवस्था यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो. त्यामुळे ग्रामनिर्माण म्हणजे केवळ इमारती, रस्ते किंवा भौतिक सुविधा उभारणे नव्हे, तर सुसंस्कृत, सुसंघटित आणि स्वावलंबी समाज निर्माण करणे होय.

या अध्यायात ते सांगतात की आदर्श गावाचा पाया स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, श्रम, शिस्त आणि सहकार्य यांवर उभा असतो. गावातील लोकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे, सामूहिक निर्णय घ्यावेत आणि सार्वजनिक कामांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. लोकांच्या सहभागाशिवाय ग्रामनिर्माणाची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकत नाही.

तुकडोजी महाराज ग्रामविकासासाठी नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करतात. गावातील रस्ते, पाण्याची व्यवस्था, शेती, बाजारपेठ, शाळा, सार्वजनिक स्थळे आणि आरोग्यसुविधा यांचा विचारपूर्वक विकास करणे आवश्यक आहे. अनियोजित वाढीमुळे अनेक समस्या निर्माण होतात, तर योग्य नियोजनामुळे गाव अधिक सुबक आणि कार्यक्षम बनते.

या अध्यायात शिक्षणाला विशेष स्थान दिले आहे. सुशिक्षित ग्रामस्थच गावाच्या प्रगतीचा पाया असतात. शिक्षणामुळे अज्ञान दूर होते, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो आणि लोक आपल्या अधिकारांबरोबरच कर्तव्यांचीही जाणीव ठेवू लागतात. म्हणून प्रत्येक गावात ज्ञानप्रसार आणि लोकशिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे.

तुकडोजी महाराज आर्थिक स्वावलंबनावरही भर देतात. गावाने आपल्या गरजांसाठी शक्य तितके स्वतःवर अवलंबून राहावे. शेती, पशुपालन, लघुउद्योग, हस्तकला आणि स्थानिक उत्पादन यांचा विकास केल्यास गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम बनते. स्वावलंबी गाव हेच खऱ्या ग्रामनिर्माणाचे लक्षण आहे.

या अध्यायात श्रमाला सर्वोच्च प्रतिष्ठा दिली आहे. ग्रामनिर्माणासाठी प्रत्येकाने स्वतः श्रम केले पाहिजेत. श्रमदानामुळे केवळ विकासकामे होत नाहीत, तर लोकांमध्ये मालकीची भावना, एकता आणि आत्मविश्वास निर्माण होतो. गावाच्या प्रगतीत प्रत्येकाचा सहभाग असणे आवश्यक आहे.

तुकडोजी महाराज सामाजिक समतेवरही भर देतात. जात, पंथ, संपत्ती किंवा सामाजिक स्तर यांच्या आधारावर भेदभाव न करता सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. ग्रामनिर्माणाचे कार्य सर्वांचे आहे आणि त्याचा लाभही सर्वांनाच मिळाला पाहिजे. सामाजिक ऐक्याशिवाय ग्रामविकास अपूर्ण राहतो.

या अध्यायात युवकांच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन विकासकार्य, जनजागृती, स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक सुधारणा यांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. युवक हे ग्रामनिर्माणाचे प्रमुख शिल्पकार आहेत, असे तुकडोजी महाराज मानतात.

तसेच स्त्रियांच्या सहभागालाही ते महत्त्व देतात. कुटुंब, संस्कार, शिक्षण आणि सामाजिक जीवन यांमध्ये स्त्रियांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे ग्रामविकासात त्यांना समान संधी आणि सन्मान मिळाला पाहिजे.

अध्यायाच्या शेवटी तुकडोजी महाराज स्पष्ट करतात की आदर्श गाव हे केवळ भौतिक सुविधांनी नव्हे, तर आदर्श नागरिकांनी घडते. ज्या गावात स्वच्छता, शिक्षण, नैतिकता, सहकार्य, स्वावलंबन आणि सेवाभाव असतो, ते गाव खऱ्या अर्थाने समृद्ध आणि प्रगत बनते.

अध्यायाचा मुख्य संदेश

“ग्रामनिर्माण म्हणजे केवळ गावाचा भौतिक विकास नव्हे, तर स्वच्छ, सुसंस्कृत, शिक्षित, स्वावलंबी आणि संघटित समाजाची निर्मिती होय. श्रम, सहकार्य, नियोजन, शिक्षण आणि सामाजिक समता यांच्या आधारावरच आदर्श गाव उभे राहू शकते. प्रत्येक ग्रामस्थ हा ग्रामनिर्माणाचा शिल्पकार आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Scroll to Top