श्री अष्टविनायकस्तोत्रं महात्म्य

श्रीगणेशाय नमः ।

॥ श्री अष्टविनायकस्तोत्रम् ॥

स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदः
बल्लाळस्तु विनायकस्तथ मढे चिन्तामणिस्थेवरे ।
लेण्याद्रौ गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे
ग्रामे रांजणसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् ॥

इति श्री अष्टविनायकस्तोत्रं सम्पूर्णम् ।


माहात्म्य

ॐ गँ गणपतये नमः ।
ॐ नमो श्री गजवदना । गणराया गौरी नंदना । विघ्नेशा भवभय हरणा । नमन माझे साष्टांगी ॥ नंतर नमिली श्री सरस्वती । जगन्माता भगवती । ब्रह्मकुमारी वीणावती । विद्यादात्री विश्वाची ॥ नमन तैसे गुरुवर्या । सुखनिधान सद्गुरुराया । स्मरूनी त्या पवित्र पाया । चित्त शुद्ध जाहले ॥ थोर महात्मे संतजन । बुधगण आणि सज्जन । करून त्यांसी नमन । ग्रंथरचना आरंभिली ॥ अष्टविनायकाचे मंगल स्तोत्र । आणि त्याचे माहात्म्य पवित्र । दोन्ही याच ग्रंथी एक । मिलिंद माधवे रचिली ॥ अष्टविनायकांची आठ नावें । एक एक नाम मनी जपावे । आणि चरणी नम्र व्हावे । नमन भावे करूनि ॥

मोरगांवस्थित मयुरेश्वराय नमः ।
सिद्धटेकनिवासी सिद्धिविनायकाय नमः ।
पालीक्षेत्रस्य बल्लाळेश्वराय नमः ।
महडवासी वरदविनायकाय नमः ।
थेऊरेश्वर चिंतामणी गणेशाय नमः ।
लेण्याद्री स्वामी गिरीजात्मकाय नमः ।
ओझरनिवासी विघ्नहराय नमः ।
रांजणग्रामाधीपती शंकर वरदाय नमः ॥

नंतर होऊनी स्थिरचित्त । बैसुनी आसनी ध्यानस्थ । स्मरतो मनी गिरीजासुत । विविध रुपी गणेश ॥ मूळारंभा गजानना । गणाधीशा प्रसन्न वदना । ब्रह्मरुपा मूषकवाहना । महोत्कटा गणपती ॥ चिंतामणी गणेश्वरा । ज्ञानरूपा मयुरेश्वरा । जगत्पालका परशुधरा । ॐकारा श्री चतुर्भुजा ॥ वक्रतुंडा लंबोदरा । धुम्रवर्णा सकल भयहारा । देवदेवेषा सिद्धीवरा । महाबला हेरंबा ॥ सुंदरवदना एकदंता । विकटा गंधर्व पूजिता । सुमुखा सांबसुता । मंगलमूर्ती मोरया ॥ नामे तूझी सहस्र । अशी अष्टरूपे परी । नटलासी आठ ठिकाणी । अवतरलासी भक्तजनां कारणे ॥ एक एक ते देवस्थान । स्वयंभू पुण्यक्षेत्र महान । करता स्मरण घेता दर्शन । इच्छा पूर्ण होतसे ॥ म्हणोनि व्हावे भाविक । नित्य स्मरावा गजमुख । धन धान्य ऐश्वर्य सुख । पुत्र पौत्र लाभती ॥


१. मोरगांव मोरेश्वर

ॐ गँ गणपतये नमः ।
पुणे जिल्ह्यात मोरगावी । जाऊन तेथे प्रचीती पहावी । मयुरेश्वराची थोरवी । उपासकां कळेल ॥ महिमा त्याचा फार मोठा । संकटे पळती चारी वाटा । सोडून अहंकार खोटा । कथा त्याची ऐकावी ॥ चक्रपाणी नामे राजा होता । परी त्याला पुत्र नव्हता । शौनक ऋषिने कृपा करता । पुत्र सिंधू जन्मला ॥ सिंधूने केले तपाचरण । प्रसन्न झाले सूर्यनारायण । आणि दिले अमृत भोजन । तेणे अमर झाला तो ॥ अमर होता उन्मत्त झाला । छळू लागला ज्याला त्याला । सर्व जिंकून देव लोकाला । वेढा त्याने घातला ॥ सिंधू येता देव भ्याले । जीव घेऊनि ते पळाले । श्री विष्णूंना प्रार्थू लागले । रक्षरक्ष म्हणोनि ॥ तेंव्हा उठले कमलापती । एकवटली सर्व शक्ती । आणि फेकली सिंधू वरती । गदा मोठ्या त्वेषाने ॥ सिंधू मग संतापला । तोंड लागले युद्धाला । अखेर त्याने श्री विष्णूंना । गंडकी नगरात ठेवले ॥ देव इंद्र सुरगण । कारागृही पडले डांबून । त्यांनी विनायक मूर्ती स्थापून । भक्ती भावे पूजिली ॥ ऐकून त्यांची प्रार्थना । विघ्नहर्ता गजानना । सर्वांची आली करुणा । आणि दिले वरदान ॥ त्या वरदानाप्रमाणे । सिंधूच्या नाशा कारणे । पार्वतीपोटी विनायकाने । अवतार घेतला ॥ बैसुनी मग मोरावरती । मयुरेश्वर तो गणपती । उभा ठाकला सिंधू पुढती । परशु हाती घेऊनी ॥ पाहता त्या विराट रुपाला । सिंधू राक्षस मनीं भ्याला । परशु प्रहारे कोसळला । क्षणात एका भूवरी ॥ अमृत मिळालेले सूर्याकडून । बाहेर पडता देहातून । सिंधू राक्षस गतप्राण । झाला ईश कृपेने ॥ सर्वांवरचे संकट टळले । देव जणू बंधमुक्त झाले । आनंदुनि ते म्हणाले । मयुरेश्वराय नमो नमः ॥


२. सिद्धटेक सिद्धिविनायक

ॐ गँ गणपतये नमः ।
दुसरा विनायक सिद्धटेकचा । सिद्धीदाता सर्वांचा । प्रतिपाळ करी भक्तांचा । सर्वदा सर्वतोपरी ॥ कथा त्याची बहू गोड । अलौकिक आणि अजोड । मना लागो सदा ओढ । पठणाची आणि श्रवणाची ॥ ब्रह्मदेवा गर्व झाला । सृष्टी तो निर्मू लागला । नाना संकटे त्या वेळेला । उभी समोर राहिली ॥ ब्रह्मदेव मनी उमजला । गणपतीला शरण गेला । अखंड जप सुरु केला । श्री गणेशाय नमः ॥ विनायक झाला प्रसन्न । दिधले प्रत्यक्ष दर्शन । आणि दिले वरदान । विघ्ने दूर पळाली ॥ गणेश म्हणाला ब्रह्मदेवाला । कार्यारंभी आठवी मला । सर्व कार्ये नेईन सिद्धीला । स्मरण मात्रे सर्वदा ॥ ऐकुन त्या वचनाला । धीर आला ब्रह्मदेवाला । नमन करुनी गणपतीला । विश्वरचना आरंभिली ॥ जाता ऐसा काही काळ । श्रीविष्णूंच्या कानाजवळ । दोन राक्षस विक्राळ । निर्माण झाले अवचित ॥ एक मधू कैटभ दुसरा । सर्वां होता त्यांचा दरारा । इंद्रा चंद्रा कुबेरा । थरकांप सुटतसे ॥ विष्णू उठला क्रोधाने । आणि त्या राक्षसांशी त्याने । अटीतटीचे चुरशींने । मल्लयुद्ध आरंभिले ॥ राक्षस होते कपटी मोठे । घेऊन रूप खोटेनाटे । डावपेच ते उफराटे । श्री विष्णूंशी खेळती ॥ सज्जनाशी असावे सज्जन । दुर्जनाशी असावे दुर्जन । हीच सत्यनिती समजून । वागावे सर्वदा ॥ म्हणून श्री विष्णूने काय केले । मल्लयुद्ध ते थांबवले । आणि आपण रूप घेतले । गायक गंधर्वाचे ॥ ऐकून त्याचे गोड गीत । पशु-पक्षी मानव समस्त । डोलू लागले झाले मोहित । प्रत्यक्ष श्री शंकर ॥ गंधर्व रुपी भगवान । सांगून सर्व वर्तमान । म्हणे प्रभो द्यावें वरदान । राक्षसा मारावया ॥ तेंव्हा म्हणे कैलासपती । अरे तू वेडा किती । पूजीला नाहीस गणपती । यश कैसे मिळेल ॥ यशदाता तो गजानन । तयासी जा तू शरण । झाल्यावरी तो प्रसन्न । सुयश तुला मिळेल ॥ ते ऐकून श्री विष्णूने । सिद्धीक्षेत्री शुद्ध मनाने । श्री गणेशाय नमः जपाने । तपश्चर्या आरंभीली ॥ प्रसन्न झाला गणपती । श्रीविष्णुनां झाली वरप्राप्ती । त्या राक्षसांवरी मागुती । प्रतिहल्ला चढविला ॥ हां हां म्हणता अखेरीस । बलाढ्य ते दोन्ही राक्षस । मुकले आपल्या प्राणास । विजयी झाले श्री विष्णू ॥ जिथे ही घटना घडली । ती भूमी पवित्र झाली । श्री विष्णूंना सिद्धी मिळाली । म्हणुनी नाव सिद्धटेक ॥ नगर जिल्ह्यात ते आहे क्षेत्र । प्रेक्षणीय आणि पवित्र । वास करत असे तिथे । श्री सिद्धीविनायक ॥


३. पाली बल्लाळेश्वर

ॐ गँ गणपतये नमः ।
आता तो तिसरा गणपती । बल्लाळेश्वर प्रसिद्ध अती । यथा शक्ती यथा मती । स्तवन त्याचे करावे ॥ कुलाबा जिल्हा सुधागड तालुका । पाली नामे ग्रामी एका । पाहावे तिथे विनायका । मनोभावे भजावे ॥ आहे सुरस त्याची कथा । भक्तीभावे ती पठण करता । किंवा श्रद्धेने परिसता । पुण्य लाभ होतसे ॥ एक पतिव्रता साध्वी होती । तिचे शुभ नाम इंदुमती । कल्याणशेट तिचा पती । दोघे सुखे नांदती ॥ भगवंताच्या कृपेने । त्यांना नव्हते काही उणें । परंतु त्यांच्या दुर्दैवाने । निपुत्रिक होते ते ॥ अनेक केली व्रत वैकल्ये । नवस सायासही बहू केले । परी इच्छित नाही साध्य झाले । अनेक वर्षे तयांचे ॥ इंदूमती एकदा माहेरी गेली । तिथे गणपतीची कथा ऐकली । त्या योगे प्राप्ती झाली । दिव्य पूत्र रत्नाची ॥ सुंदर गोंडस गोड बाळ । नाव तयाचे बल्लाळ । घेउनी या जप माळ । गणेश चिंतन करीतसे ॥ छोटे छोटे मित्र जमवून । करीतसे गणपती पूजन । आणि भजनी रंगून । तल्लीन खास होतसे ॥ नाही भूक नाही तहान । गणेश भक्ती रात्रंदिन । इतर लोक ते पाहुन । आठ्या कपाळा घालती ॥ म्हणती या द्वाड बल्लाळे । सर्व पोरांचे केले वाटोळे । याच्याच भिकार छंदामुळे । पोरे आमुची बिघडली ॥ ऐकून अशा तक्रारी । बल्लाळ पिता संतापला भारी । मुलाला बांधून मारी । गणेश पूजा उधळोनी ॥ सुकुमार त्या बाळ बल्लाळा । मार तो असह्य झाला । कळवळून बेशुद्ध पडला । तेंव्हा देव धावला ॥ गणपतीने प्रत्यक्ष येऊन । बल्लाळाला दिले दर्शन । मस्तकी वरदहस्त ठेऊन । सहस्र आशीर्वाद दिले ॥ बल्लाळाचा जो ईश्वर । तोचि झाला बल्लाळेश्वर । त्याच नावे त्या जागेवर । विराजतो श्री विनायक ॥


४. महड वरदविनायक

ॐ गँ गणपतये नमः ।
आता तो चवथा गणपती । काय वर्णावी त्याची महती । कुलाबा जिल्ह्यात महड क्षेत्री । वरदविनायक वसत असे ॥ प्राचीन काळी मगध देशी । एकदा घटना घडली ऐसी । राजप्रासादी श्राद्धासी । जमले सर्व ऋषीमुनी ॥ आमंत्रीले होते राजाने । तपोनिधी बहू आदराने । त्यात गृत्समदाचा । अत्रीने अपमान केला ॥ अत्री म्हणे हे गृत्समदा । तुझा जन्म पवित्र न कदा । ऐकून ते खदा खदा । सभा सर्व हसली ॥ माते चे पापा चरण । ते तुझ्या जन्माचे कारण । म्हणुनी जगती हीन । तूला मानिती ॥ ऐकूनि अत्री चे ते वचन । गृत्समद झाला मनी खिन्न । सहन न होता अपमान । क्रोधे निघाला सत्वरी ॥ गृत्समद आला माते पाशी । मम जन्मकथा म्हणे सांग मशी । प्रश्न पडला त्या मातेसी । आता काय सांगावे ॥ परी तिने केले सत्य कथन । म्हणे पाप घडलें माझ्या कडून । आता मला मनापासून । पश्चाताप होत असे ॥ गृत्समद महामुनी । शाप वाणी वदला वाणी । म्हणे काटेरी बोर होऊनी । राहशील ह्या भूवरी ॥ सत्य झाली शाप वाणी । गृत्समद निघाला तेथूनी । आणि गेला घोर काननी । पापक्षालनाप्रित्यर्थ ॥ पुष्पक नाम शांत । एकांत दुर्गम स्थान । तिथे केले तपाचरण । शुष्कपर्ण भक्षूनी ॥ खडतर ते महातप । मुखी विनायकाचा जप । प्रगट झाला आपोआप । यथाकाळी गणपती ॥ म्हणे वत्सा तू धन्य धन्य । तुला झालो मी प्रसन्न । हवे असेल ते घे मागून । संदेह मनी नसावा ॥ गृत्समद म्हणे भगवान । पवित्र व्हावे हे वन । भक्तांच्या इच्छा करण्या पूर्ण । तूच येथे राहावे ॥ गणपती म्हणे तथास्तु । गणानां त्वाम् मंत्राचा कर्ता तू । हे निबिड अरण्य परंतु । पावन झाले तुझ्यामुळे ॥ कथा अशी ही पुण्यदायक । महडचा वरदविनायक । भक्तांचा असे प्रतिपालक । नमन भावे करावे ॥


५. थेऊर चिंतामणी गणेश

ॐ गँ गणपतये नमः ।
पाचवा गणेश आठातील । पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील । त्याची कथा आता पुढील । ओव्यात असे वर्णिली ॥ इंद्राने फसविले अहिल्येसी । तेंव्हा संतापले गौतमऋषी । शाप दिला पत्नीसी । आणि कामांध इंद्राला ॥ अहिल्या क्षणात शिळा झाली । इंद्राची कांती काळवंडली । सर्वांगाला भगे पडली । आणि सुटली दुर्गंधी ॥ नंतर सर्व देवांनी । गौतमाना केली विनवणी । त्यांची प्रार्थना ऐकुन । दिला त्यांनी उःशाप ॥ परस्री गमन पाप मोठे । इंद्राने केले कर्म खोटे । शांती तयाला आता कोठे । मिळणार नाही कधीही ॥ तथापि करता गणेश पूजन । तयाचे ध्यान आणि स्मरण । होईल पापाचे क्षालन । गणपती च्या कृपेने ॥ तिकडे इंद्र भोगिता पीडा । झाला होता गोप किडा । लोळे धरणी वरी गडबडा । हाय हाय म्हणोनी ॥ सर्व देव तिथे गेले । आणि ते इंद्राला म्हणाले । गौतमांनी शाप मुक्त केले । उःशाप तुला देऊनी ॥ गौतमांची उःशाप वाणी । त्याला सांगितली सर्वांनी । लागता गणेश भजनी । दुःख दूर होईल ॥ इंद्राची दशा पाहुन । कळवळले बृहस्पती मनी । त्यांनी इंद्राच्या कानी । गणेश मंत्र उपदेशीला ॥ इंद्राने मग काय केले । गणपती स्तवन आरंभीले । यथावकाश पूर्ण झाले । इंद्राचे मग मनोरथ ॥ गणपती तेथे प्रत्यक्ष आले । तेंव्हा भगांचे डोळे झाले । इंद्राचे रूप पालटले । सहस्राक्ष झाला तो ॥ चिंतिलेले देतो तो चिंतामणी । थेऊर क्षेत्री आहे अजूनि । संकटी तो येई धावुनि । मंगल करी भक्तांचे ॥ तयाचे चरणी ठेऊन माथा । गावी गणेशगौरव गाथा ।


६. लेण्याद्री गिरिजात्मक

ॐ गँ गणपतये नमः ।
या पुढे आहे गोड कथा । सहाव्या गणपतीची ॥ जिल्हा पुणे तालुका जुन्नर । तिथे केले डोंगरा वर । स्थान आहे मनोहर । लेण्याद्री नामे प्रसिद्ध ॥ त्याची आहे मोठी ख्याती । हिमालय कन्या पार्वती । एके काळी बैसली होती । तेथील एक गुहेत ॥ गणेश व्हावा पुत्र आपुला । असा तिने ध्यास घेतला । भाद्रपद शुद्ध चतुर्थीला । मूर्ती एक घडविली ॥ मृत्तिकेची मूर्ती सानूली । दिव्य तेजे झळकू लागली । हा हा म्हणता समाधी लागली । तप उग्र महान ॥ पाहून ती असीम भक्ती । संतोषला महागणपती । माती ची मंगलमूर्ती । सजीव पहा जाहली ॥ म्हणे माते उघडी लोचन । जगन्माता तू महान । तुझे कराया समाधान । बालरूप झालो मी ॥ सत्य वाणी आता ऐक । देव भक्तांचा सेवक । तू जननी मी बालक । चरण तुझे वंदितो ॥ बालगणेशा पाहूनी । पार्वती झाली हर्षित मनी । आनंदाश्रू तिच्या लोचनी । तरळू तदा लागले ॥ पार्वती चे अंतःकरण । वात्सल्य प्रेमे आले भरून । दाही दिशांनी स्वर्गातून । पुष्पवृष्टी जाहली ॥ माता पार्वती महासती । पुत्र तिचा महागणपती । भक्तिभावे तया प्रति । सर्व देव वंदिती ॥ पुढे काही काळ गेला । बाल गणपती मोठा झाला । विघ्ने गेली लयाला । त्याच्या कृपाप्रसादे ॥ असुर क्रूर राक्षस गण । आले गणपती वरी चालून । परी त्यांचे निर्दालन । केले त्याने सर्वदा ॥ असती कोणी पापी दुष्ट । जाणुनी तयाचे कपट । केले तयांना नष्ट । महाशौर्य दाविले ॥ यम शेष आदी करून । गर्वाने गेले जे जे फुगून । करता तयांचे गर्व हरण । पदी लीन झाले ते ॥ गणपती च्या बाल लिला । लेण्याद्री येथे बहू झाल्या । म्हणून त्या भूमीला । पावित्र्य प्राप्त जाहले ॥ गिरिजेचा जो आत्मज । तयाचे नाव गिरिजात्मज । त्याच नावे त्या जागेवर । विराजतो श्री विनायक ॥


७. ओझर विघ्नहर

ॐ गँ गणपतये नमः ।
तालुका तोच जुन्नर । त्यातील गाव ओझर । तिथे आहे विनायक । तो सातवा ॥ पुण्यदायक त्याची कथा । भक्तिभावे ती पठण करता । किंवा श्रद्धेने परिसता । पुण्यलाभ होतसे ॥ एकदा इंद्राच्या दरबारी । नारदमुनीची आली स्वारी । कळ लावूनी । मौज स्वये पहातसे ॥ म्हणे त्या हिमालयावर । यज्ञ चालला आहे थोर । देवदेवता आणि इतर । जमले तेथे सर्वही ॥ राजा नामे अभिनंदन । सर्वा करी हविर्भाग अर्पण । तुझे मात्र त्याला स्मरण । होत नाही कधीही ॥ अरे केवढा अपमान । करितसे कसा तू सहन । छे छे नारायण नारायण । मी आपला जातसे ॥ ऐकून ते वर्तमान । इंद्र झाला क्रोधायमान । कराकरा दात ओठ चावून । हात पाय आपटी ॥ त्याने मग काय केले । सत्वर काळाशी बोलाविले । आणि त्याला सांगितले । यज्ञ नष्ट कराया ॥ असेल त्याचा नाश करणे । सौंदर्याचा शत्रु होणे । जिविताला मृत्यु देणे । हेच काम काळाचे ॥ म्हणून काळ आनंदला । आणि तो विघ्नासुर झाला । वायू वेगे धावत गेला । हिमालयाच्या दिशेने ॥ विघ्नासुर तो महागुंड । लाथेने फोडले होमकुंड । यज्ञ मंडप तो प्रचंड । क्षणांत केला उद्ववस्त ॥ जे जे असती सज्जन । तयाशी छळती दुर्जन । परी त्यांचे निर्दालन । देव स्वये करीतसे ॥ सत्कार्यात विघ्न आले । तेंव्हा सर्व देव भ्याले । हात जोडून प्रार्थु लागले । धाव पाव विनायका ॥ तेंव्हा काय चमत्कार झाला । पार्श्व आणि दिपवत्सला । ह्यांच्या पोटी जन्म घेतला । गणपतीने झडकरी ॥ पार्श्व पुत्र तो गणेशावतार । युद्धाला झाला तयार । देवांना घेऊन बरोबर । संग्रामासी निघाला ॥ काळपुरुष तो विघ्नासुर । रुप पालटी वारंवार । सर्व देव खरोखर । भय भीत झाले ॥ तेव्हा आपल्या अंकुशाने । प्रहार केला पार्श्वपुत्राने । एक क्षणात विघ्नसुराने । याचना केली दयेची ॥ पार्श्वपुत्र म्हणजे गजानन । हे काळाने जाणले पूर्ण । म्हणुन तयाचे चरण । वंदिले म्हणे क्षमस्व ॥ गौरीनंदना हे गणराया । मी तुझ्या पडतो पाया । मजवरी करावी दया । भक्तवत्सला विनायका ॥ भक्त तुझा मी आजपासून । तुझीच आज्ञा पाळीन म्हणून । माझे नाव धारण करून । उद्धार माझा करावा ॥ अभय देऊन विघ्नासुरासी । विघ्नेश नाम घेतले आपणासी । तेणे सकल देवांसी । संतोष जाहला ॥ भाद्रपद शुद्ध चतुर्थी । पुण्य वेळा मंगल तिथी । देवांनी ती मंगलमूर्ती । ओझर ग्रामी स्थापिली ॥ तेव्हा पासून तो विघ्नहर । विघ्ने दूर करी सान थोर । विद्या आणि बुद्धी अपार । सर्व भक्तांसी देतसे ॥


८. रांजणगाव महागणपती

ॐ गँ गणपतये नमः ।
रांजणगाव हे आठवे क्षेत्र । विनायकाचे स्थान पवित्र । आहे ते शिरूर तालुक्यात । कथा त्याची पवित्र ॥ एकदा त्या त्रिपुरासुराला । गजाननाने वर दिधला । तेणें तो मत्त झाला । आणि केली पुंडाई ॥ देवावरी केली स्वारी । देव मंडळी भ्याली सारी । सामर्थ्यांत त्याची बरोबरी । कोणीही करिना ॥ इंद्राच्या राजधानीत शिरला । आपण इंद्रपदी बैसला । अमरावती नगराला । राक्षसांनी व्यापले ॥ एवढा मोठा कैलास । गदागदा हालवून त्यांस । भोळा सांब महेश । पिटाळून लावला ॥ त्रिपुराचा दुसरा हस्तक । दुष्ट पापी आणि हिंसक । तयाने तर पाताळलोक । दुःखावर्णी लोटला ॥ शांतता सारी नष्ट झाली । जनता दारिद्रयाने गांजली । तिन्ही लोक भरली । पाप कर्मे अपार ॥ ऐसे असुर मातले । पावित्र्य पुण्य लया गेले । अनीती पाप वाढले । राक्षस राज्य जाहले ॥ देव गंधर्व मानव सकळ । झाले विकल । आणि दुर्बल । जीवन झाले असह्य ॥ महादेव तो शंकर । पुढें झाला तदनंतर । गणेशा प्रार्थूनि सादर । युद्धा सिद्ध जाहला ॥ त्रिपुराचे राक्षस सैन्य । आणि ते असंख्य शिवगण । यांचे महायुद्ध भयाण । सुरू झाले तेधवा ॥ नाना परीची नाना शस्त्रे । अनंत आयुधे आणि अस्त्रे । अग्निज्वाला पेटती पलिते । याविण दुजे न दिसे ॥ गडद धुरांच्या लोळांनी । सूर्यही गेला झाकळोंनी । रणभेरीच्या गर्जनांनी । दिशा दाही व्यापिल्या ॥ होता होता अखेरीस । त्रिपुरासुर आला जेरीस । राक्षस सैन्याचा नाश । पूर्णपणे जाहला ॥ ठार झाला त्रिपुरासुर । विजयी झालें श्रीशंकर । आनंदी आनंद ब्रह्मांडभर । साजरा झाला सर्वत्र ॥ रांजणगावी शंकराने । गणेश पूजीला शुद्ध मनाने । आणि त्याच्या कृपेने । त्रिपुरासुर मारिला ॥ म्हणोनि ते गणपती स्थान । जगती झाले पवित्र पावन । तो आठवा गजानन । नमिला मिलिंद माधवे ॥


फलश्रुतिः

ऐसे अष्टविनायक कैवारी । मस्तक ठेवीता चरणावरी । झडकरी कल्पवृक्षापरी । इच्छा पूर्ण करतील ॥ आठवितो त्या डोळे मिटूनी । दर्शन घेतो मनीच्या मनी । लोटांगणे सहस्र घालूनि । मागणें हेचि मागतो ॥ देवाधिदेवा दया करी । संकट निवारूनी सुखी करी । तव कृपेची मजवरी । छाया असो अखंड ॥ आप्त स्वकीय सुखी असो । चिंता क्लेष मुळी नसो । लक्ष्मी सरस्वती घरी वसो । शांती नांदो सर्वदा ॥ प्रसन्न व्हाव्या रिद्धीसिद्धी । प्राप्त व्हावी अपार बुद्धी । आयुष्य आरोग्य समृद्धी । लाभो देवा सर्वदा ॥ धन धान्यादी संपत्ती । भाग्यशाली गुणी संतति । या सर्वासह वाढो कीर्ती । जगतामाजी उदंड ॥ भूत पिशाच समंध बाधा । जादूटोणा अघोरी विद्या । या पासून रक्षावे सर्वदा । शत्रूनाश करावा ॥ द्वीपाद चतुष्पाद प्राणी । तसेच नोकर चाकर आणि । आश्रित असतील कोठे कोणी । सर्वा अभय असावे ॥ कफ वात पित्त दोष । अष्टव्याधी ज्वर सर्प विष । हे सर्व व्हावें निःशेष । गोड नामामृते तुझ्या ॥ सुखकर्ता तू दुःखहर्ता । विघ्नविनाशक विद्यादाता । भवसागरी ह्या तूंचि त्राता । नमन माझे साष्टांगी ॥ कोणी असो धनार्थी । कोणी असो विद्यार्थी । कोणी असो लग्नार्थी । किंवा पुत्रार्थी । वा असो कोणी ॥ करता भावे हा ग्रंथ पठण । श्री गजानन होइल प्रसन्न । मनीची इच्छा करील पूर्ण । सत्य सत्य वाचा ही ॥


ॐ श्री गजाननयाय नमः । इति श्री अष्टविनायक स्तोत्रं च माहात्म्य संपूर्णम् ।
॥ श्री गजाननार्पणमस्तू ॥

॥ शुभम् भवतु॥

ॐ गँ गणपतये नमः ।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Scroll to Top